मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

Trapped - भाग ८


आधीच्या भागाच्या लिंक्स 
भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 


भाग सहावा 
 http://patil2011.blogspot.in/2016/11/trapped.html

भाग सातवा
http://patil2011.blogspot.in/2017/01/trapped.html

परस्वामी खूप विचारात पडला होता. त्याचं मनुष्यदेहातील वास्तव्य संपुष्ठात येऊन त्याला त्याची मूळ काया प्राप्त झाली होती. परंतु मनुष्यदेहातील वास्तव्याच्या काळातील विचार मात्र त्याचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हते. सुक्ष्मरुपात आपल्या मूळ देहाबाहेर पडण्याची कला त्यानं आत्मसात करुन घेतली होती. ह्या सर्व प्रकरणात आपल्या प्रजातीचा प्रचंड रोष त्यानं ओढवून घेतला होता. त्याच्या हालचालीवर त्याची प्रजात जरी लक्ष ठेऊन असली परस्वामी महबुद्धिमान होता. ह्या पहाऱ्यातुन त्याला जे काही मोजके क्षण मिळायचे त्यावेळी तो योगिनीवर लक्ष ठेवण्यासाठी फेरी मारायचा. आताच्या ह्या प्रसंगानंतर आपली एक चुक त्याच्या ध्यानात आली होती. योगिनीची मागच्या काळातील स्मृती त्यानं तात्काळ नष्ट करायला हवी होती. ही चूक लक्षात येताच त्यानं तातडीनं तिची स्मृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण ते काही त्याला जमलं नव्हतं आणि तो स्वतःवर खूप संतापला होता. 

योगिनी दिवसभर अगदी घाबरलेल्या मनःस्थितीत होती. परस्वामी आभासी रुपात आपल्या भोवती वावरतो आहे ही जाणीवच तिला हादरवुन टाकणारी होती. नवस्वामी कालपासुन अगदी प्रेमानं जरी वागत असला तरी मागच्या काही महिन्यांत जे काही घडलं ते त्याला सांगण्याची तिला अजिबात हिंमत होत नव्हती. परस्वामी मनुष्यदेहातून निघुन जाण्याआधी शेवटच्या दिवसात त्यानं तिच्यावर जो काही सुखाचा वर्षाव केला होता, तो सुद्धा ती विसरू शकत नव्हती. मी, माझं भावनिक जीवन आणि वास्तवातील जीवन सर्व काही ह्या दोन स्वामीमध्ये Trapped झालं आहे! ती स्वतःशीच पुटपुटली. पण ह्या दोघांचीही प्रेमळ बाजु सुद्धा तिनं पाहिली होती आणि त्यामुळे ह्यातील कोणीही आपल्याला अथवा आर्यनला धोका पोहोचवणार नाही अशी आशा ती बाळगुन होती. पण आपणा दोघांना नसला तरी हे दोघं एकमेकांच्या जीवावर बेतणार नाहीत हे कशावरून हा प्रश्न तिच्या मनात प्रकट झाला. आणि ह्यात परस्वामीचा जीव म्हणजे नक्की काय हे तिला समजेनासं झालं होतं. ह्याउलट परस्वामी नवस्वामीविषयी सर्व काही जाणुन होता आणि नवस्वामीचं ह्या सर्व प्रकाराविषयीचं अज्ञान त्याला परस्वामीची सहज शिकार बनवु शकणार होतं. बराच विचार करुन करुन योगिनी थकली. आर्यनच्या रडण्याने तिचं लक्ष आपल्या विचारसाखळीतून उडालं पण नवस्वामीला सर्व प्रकार संध्याकाळी सांगुन टाकावा ह्या निष्कर्षाप्रती ती येऊन पोहोचली होती. 

सायंकाळ झाली तशी योगिनीच्या मनातील धाकधुक वाढू लागली होती. नवस्वामी आपली कहाणी कशी स्वीकारेल ह्याविषयी तिच्या मनात खूप धाकधुक होती आणि त्याचबरोबर परस्वामीने आपल्यावर शिंपडलेल्या सुखाच्या क्षणांशी आपण प्रतारणा करणार ही भावना तिला बोचत होती. 
नेहमीच्या वेळी नवस्वामी परतला. कॉफीचं प्रमाण एव्हाना योगिनीला जमु लागलं होतं. नवस्वामीचा सकाळचा प्रसन्न मूड अजुनही कायम होता. जेवणं वगैरे आटोपली. आर्यन नेहमीप्रमाणं खेळून झोपी गेला आणि मनाचा हिय्या करुन योगिनीनं हाक मारली, "स्वामी!"

नवस्वामीच्या चेहऱ्यावरील भाव पहिल्या काही मिनिटांत वेगानं बदलत होते. आधी योगिनीविषयी सहानुभूती, भय आणि असुया आणि मग संताप अशा क्रमानं विविध भावनांनी त्याचा ताबा घेतला होता. संतापाच्या एका क्षणी त्यानं टेबलावरील पाण्याचा ग्लास जोरानं भिंतीवर फेकून मारला. त्याच्याजवळ जाण्याची हिंमत योगिनीजवळ नव्हती. बराच वेळ असाच गेला. नवस्वामी खुर्चीवर क्रुद्ध होऊन बसला होता आणि योगिनी हतबल होऊन बिछान्यावर! शेवटी नवस्वामीनं तोंड उघडलं. "तरीच मला काही कळत नव्हतं! ऑफिसातील बऱ्याच गोष्टी मला अधुनमधून नव्यानव्या वाटायच्या, तुही बदलेली वाटायचीस आणि आर्यन तर मला बराच वेळ पूर्ण अनोळखीच वाटायचा!" नवस्वामी आपलं मन मोकळं करत होता. "छे ! कोणी परका माझ्या देहात स्वामी म्हणून इतका काळ वास्तव्य करुन गेला आणि तुझ्याशी संसार करुन गेला!" नवस्वामीच्या मनातील संताप पुन्हा उचंबळुन येत होता. 

आता मात्र योगिनी आपल्या जागेवरुन उठली. नवस्वामीचा हात हातात घेऊन म्हणाली, "स्वामी मी पूर्णपणे हतबल होती ह्या साऱ्या प्रकरणात!" नवस्वामीनं आपल्याला काहीसं सावरलं होतं. "ठीक आहे!" नजरेनंच त्यानं योगिनीला सांगितलं. "स्वामी - अजुन एक गोष्ट सांगायची राहिली - आज सकाळी हे सारं झालं त्यावेळी आर्यन त्याच्याशी नजरेनंच संवाद साधून खिदळत होता!" नवस्वामीचं डोकं आता बऱ्यापैकी ताळ्यावर आला होतं. "तो समजा परत आला तर?" त्यानं जणु काही योगिनीच्या मनातीलच प्रश्न विचारला होता. 
"आपण शब्दांशिवाय एकमेकांशी संवाद साधुयात!" योगिनी म्हणाली. इतक्या सगळ्या प्रकारानंतरही नवस्वामीच्या मनात योगिनीविषयी प्रेम, आदर दाटुन आलं. झोपायला जाताना योगिनीने घडयाळाकडं नजर टाकली. रात्रीचे दोन वाजले होते. 

योगिनीला बराच वेळ झोप लागत नव्हती. नंतर कधीतरी तिचा डोळा लागला. डोळा लागुन थोडा वेळच झाला असावा इतक्यात आर्यनच्या चुळबुळीने तिला जाग आली. आर्यन खिडकीच्या दिशेनं पाहुन हासत होता. योगिनी भयभीत झाली असली तरी तिनं ह्या शक्यतेवर विचार करुन ठेवला होता. पायाच्या अंगठ्यानेच तिनं नवस्वामीला उठवलं. काहीशा त्रासिक मुद्रेनं उठलेला नवस्वामीनं योगिनीकडे पाहिलं. तिचा इशारा त्याला कळला. त्याची नजर खिडकीकडं गेली. तिथलं परस्वामींच अस्तित्व त्याला समजलं. योगिनी आणि नवस्वामी एकमेकांकडे पाहत होते. नक्की काय करायचं हे दोघांपैकी कोणालाही  समजत नव्हतं. 

योगिनीला न जाणवलेली एक गोष्ट नवस्वामीला जाणवत होती. त्याच्या हृदयाच्या कप्प्यात एक वेगळीच धकधक त्याला जाणवत होती. परस्वामी आपल्या शरीरात काही त्याच्या अस्तित्वाची खूण ठेऊन गेला की काय? त्याच्या मनात नवीन शंकेनं प्रवेश केला!
(क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...