मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १ जून, २०१६

Fast Tracking



जून उजाडला! सरणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक शालेय जीवनातील मनात दडलेल्या जूनच्या आठवणी जुन होत असल्या तरी अजुन मनात दडुन बसल्या आहेत. वर्गशिक्षिका कोण असणार ह्याची उत्सुकता मे महिन्याच्या सुट्टीच्या शेवटच्या आठवड्यात अगदी उचल धरुन यायची. आता रम्य आठवणींचं ते S.S.C. बोर्डची लोकमान्यता अगदी ओहोटीस लागली. बहुतांशी सर्वजण C.B.S.E, I.C.S.E अथवा I.B. बोर्डात आपल्या मुलांना प्रवेश देऊ लागलो.

थेट मुद्द्याकडे! ह्या C.B.S.E, I.C.S.E अथवा I.B. बोर्डांनी शालेय जीवनात आमुलाग्र बदल घडवुन आणला. ही बोर्ड होती आधीपासुनच वेगळी आणि त्यात त्यांनी बदलत्या काळानुसार अजुनच बदल घडवुन आणला. जणु काही ह्यात शिकणारा प्रत्येक मुलगा / मुलगी CEO, आघाडीचा कलाकार, खेळाडू बनणार अशा धाटणीचे शिक्षण, अतिरिक्त कलाकुसर आणि मुख्य म्हणजे अशी मनोवृत्ती जोपासण्याचा प्रयत्न ह्या शाळा करताना दिसतात.

ह्या सर्व शैक्षणिक संस्थांनी १० आणि १२ पर्यंतच्या शिक्षणाचं स्वरुप आमुलाग्र बदलवुन टाकलं. प्रामुख्यानं IIT किंवा Regional Colleges मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी योग्य अशा पद्धतीच्या प्रवेश परीक्षा सद्यकाळी आपला प्रभाव वर्षोगणिक वाढवत असल्याचं चित्र आपणास दिसतं. परंतु १२च्या विज्ञान शाखेच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांपैकी कितीजण ह्या IIT किंवा Regional Colleges मध्ये प्रवेश मिळविण्यासाठीउत्सुक आहेत किंबहुना त्यांच्यासाठी ह्या संस्था सुयोग्य आहेत ह्याचा विचार होताना दिसत नाही.

होतंय काय कि आपण आपल्या मुलांच्या क्षमतेचा आणि त्याहुन महत्वाचं म्हणजे ह्या उच्चशिक्षणादरम्यान सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या दबावाला तोंड देण्याच्या क्षमतेचा विचार करताना दिसत नाही. व्यावसायिक जीवनात एक संज्ञा वापरली जाते - Fast Tracking! एखाद्या विशिष्ट व्यावसायिक गरजेचे  (Requirement) नजिकच्या काळातील बाजारमूल्य खुपच जास्त असल्याची भावना जर उच्चपदस्थ व्यक्तींच्या मनात निर्माण झाली तर ह्या requirement ला एका प्रोजेक्टच्या रूपात आणुन त्याला Fast Tracking वर टाकलं जातं. ह्यात बऱ्याचशा गोष्टी ज्या नेहमी एकामागोमाग एक अशा केल्या गेल्या असत्या त्या आता समांतर स्वरुपात केल्या जातात. सर्वसाधारण प्रोजेक्टला मिळावयास लागणाऱ्या परवानग्या, त्यावर काम करणारे अभियंते मिळविण्यासाठी ज्या ठरलेल्या मार्गाचा वापर केला जातो त्यापेक्षा ह्या लाडक्या बाळास खास वागणूक देऊन हे बाळ झटपट मार्केटमध्ये आणलं जातं कारण विशिष्ट वेळेला ते मार्केटमध्ये असणं आवश्यक असतं.  

आपण आपल्या मुलांना पण Fast Tracking वर टाकतोय! ह्या Fast Tracking वर फक्त पहिल्या काही स्थानकांपर्यंत आपण त्यांना सपोर्ट करु शकतो त्यानंतर मात्र जरी ती आपल्यासोबत घरी राहत असली तरी त्यांची स्थानक पुढे गेलेली असतात. Pyramid च्या संकल्पनेनुसार ह्यातील फक्त काहीजणच हे fast tracking संपुर्ण कारकिर्दीत सुरु ठेऊ शकतात. इतरांच्या बाबतीत गाडी इतका वेग पकडते की त्यांना त्या वेगासोबत धावणं शक्य होतं नाही आणि मग ३५ - ४० च्या आसपास कधीतरी ते ह्या गाडीतुन बाहेर फेकले जातात.

मुद्दा हाच! आपल्या मुलांना fast tracking वर टाकण्याआधी आपण ह्या सर्वासोबत किती काळ धावू शकु ह्याचा विचार करा! स्वतःशी प्रामाणिक राहा! आपलं S.S.C. बोर्ड आणि आयुष्यभर शांतपणे करु शकणाऱ्या नोकऱ्या ह्यांचंसुद्धा स्वतःच महत्व आहे. ह्या मार्गाने जाणारी लोकसुद्धा आनंदात आयुष्य जगु शकतात. आजुबाजूला डोळसपणे पहात राहा! पुढील काळात कोणता पेशा निवडणं योग्य राहील ह्याचाही सतत मागोवा घेत राहा. आणि हो महत्वच म्हणजे आयुष्यभर केवळ एकच पेशा निवडुन त्यायोगे उदरनिर्वाह करण्याचा काळ झपाट्याने मागे पडत चालला आहे ह्याचीसुद्धा जाणीव ठेवा विशेषकरुन जर तुम्ही आपल्या मुलाला त्या राजधानीच्या मार्गावर सोडणार असाल तर!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...