मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ६ जून, २०१६

इंटरनेट ऑफ द .. - भाग २





नारदमुनी मोठ्या आशेने महाराष्ट्र देशी अवतरले खरे पण लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या सर्व निर्मात्यांनी त्यांना जवळजवळ ठुकरावूनच लावलं.

"आमचं व्यवस्थित चाललंय! सासु, सुना, सासरे, नणंद, जाऊ, दीर, प्रियकर हे घटक एका बाजूला, प्रेमळ, खाष्ट, धूर्त वगैरे स्वभावछटा दुसऱ्या बाजुला घेऊन मनाला येईल तशा व्यक्ती आणि स्वभावछटा ह्यांच्या जोड्या बनवायच्या. बेस्टचा बसस्टॉप, रिक्षावाला, ज्यूसवाला अशी पात्रं घुसवायची. त्यात उत्तर भारतीय व्यक्तिरेखा घुसावायच्या कि मग पुरुषमंडळी सुद्धा रस घेऊन पाहतात मग हे नवीन खूळ हवाय कोणाला!"  एकंदरीत सर्वांच्या बोलण्याचा सारांश होता.

 "बाकी तुम्हांला रस असेल तर आम्ही तुम्हांला आमच्या मालिकेत घ्यायला तयार आहोत!" असं सांगायला मात्र ते विसरले नाहीत.

भगवान विष्णु स्वर्गलोकातून नारदमुनींची ही सारी धडपड पाहत होते. शेवटी त्यांना नारदमुनींची दया आली.

नारदमुनी अगदी हताश होऊन त्या शेवटच्या लोकप्रिय निर्मात्याच्या ऑफिसातून बाहेर पडत होते. त्यांनी बनविलेल्या यादीतील सर्व लोकप्रिय निर्मात्यांची कार्यालये भेट देऊन झाली होती. लिफ्टला गर्दी होती आणि म्हणुन त्यांनी जिन्याने खाली उतरण्याचे ठरविलं. स्वर्गलोकी भगवान विष्णुंना कसं सामोरं जायचं ह्याची मोठी भिती त्यांच्या मनात दाटून राहिली होती. एक दोन मजले उतरल्यावर अचानक त्यांचं लक्ष त्या मजल्यावरील एका जुनाट कार्यालयाकडे गेले. "वि. वि. सामंत - मराठी निर्माता" अशी धुळीने काहीशी माखलेली पाटी त्यांच्या नजरेस पडली. नारदांच्या मनात कोणता विचार आला हे फक्त भगवान विष्णुच जाणोत!

पुढील अर्धा तास सामंत आणि नारदमुनी ह्यांची चर्चा अगदी खोलवर रंगली. नारदमुनींच्या हेतुविषयी खात्री पटल्याने सामंत ह्यांनी आपली संहिता त्यांच्या हातात सोपवली.

भाग १

सन २०२५
मालिकेचा युवा नायक अनिल हा एका अत्याधुनिक भारतीय बँकेत अधिकारी पदावर काम करतोय. त्याची आई सुनंदा ही त्याच लग्न जमवायच्या खटपटीत आहे. सकाळ होतेय. अनिलचा भ्रमणध्वनी गेले दहा मिनिटं त्याला उठवायचा निष्फळ प्रयत्न करतोय. अनिलला वेक अप कॉलच्या कोणत्या ट्युन्स आवडत नाहीत हे त्याच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या वैतागलहरी बरोबर पकडताहेत. ह्या वैतागलहरींना पकडून त्यांचं विश्लेषण अनिलच्या भ्रमणध्वनीच्या गजरापर्यंत पोहोचविण्याचं काम भ्रमणध्वनीच "वैतागपकड" ऍप बरोबर करतंय. शेवटी न राहवून भ्रमणध्वनीचा गजर त्याच्या बॉसचा आवाज ऐकवतो. आता मात्र अनिल नाईलाजाने उठतो.

अनिलच्या जिमप्रशिक्षकाने पाठविलेला त्याचा आजचा नाश्ता सुनंदाताईच्या भ्रमणध्वनित केव्हाचा येऊन पोहोचला होता. भ्रमणध्वनीने घरातील फ्रीजला संदेश पाठविला होता. १३७ ग्रॅम ओट्स आणि ३२१ मिली दुध अशी सुचना फ्रीजच्या सुचनाफलकावर झळकली होती. ही सुचना पाहताच सुनंदाताईचे बीपी थोडं वाढलं. लगेचच त्यांच्या मोबाईलने फ्रीजला आगाऊपणा कमी करण्याची सुचना दिली. फ्रीजने तात्काळ ती मानुन "एक वाटी साजुक तुपातील शिरासुद्धा ह्याला पर्याय होऊ शकतो" असा संदेश झळकावला. लगेचच सुनंदाताईच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले. आणि त्या शिऱ्याच्या तयारीस लागल्या. तुप संपत आल्याचं कळताच फ्रिजच्या पोटात गोळा आला आणि त्याने तात्काळ रस्त्यापलीकडील सुपरमार्केटला अर्धा किलो तुपाची ऑर्डर देण्याची तयारी चालविली. त्याची ही धडपड सुनंदाताईच्या भ्रमणध्वनीने ओळखली. "तुला वेड लागलंय का? " सुनंदाताईच्या भ्रमणध्वनीने त्याला खरमरीत संदेश पाठविला. "तो भैय्या ५०० मीटर अंतरावर आहे - त्याला लगेचच कळवितो मी!" सुनंदाताईच्या भ्रमणध्वनिने गेल्या महिन्यातील आठवण लक्षात घेऊन पुढाकार घेतला.
शिऱ्यात तूप टाकायची वेळ यायला आणि प्यारेलाल तूप घेऊन दाराची बेल वाजवायला एकच गाठ पडली. "किती गुणांचं माझं फ्रीज!" सुनंदाताईच्या कौतुकाच्या ह्या शब्दांनी त्यांचा भ्रमणध्वनी मात्र संतापाने लालेलाल झाला! "अरे चिडक्या! तुझं c.p.u.किती तापलंय बघ!"थंडगार फ्रीजने भ्रमणध्वनीच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं. 

साजुक तुपाचा प्रसन्न गंध अनिलपर्यंत येऊन पोहोचला तसं त्याने आपल्या तयारीचा वेग वाढविला. न्याहारीला प्रसन्न मुद्रेने बसलेल्या अनिलला पाहून सुनंदाताईच्या मनात अजुन एक विचार डोकावला. अनिलचे पिता मोहन अनिलवर पाळत ठेऊन होते. त्याची माधुरी नावाच्या मुलीशी सोशल मीडियावर ओळख जरा जास्तच वाढली आहे असं त्यांनी सुनंदाला सांगितलं होतं. सुनंदाताईने एक पाऊल पुढे टाकुन माधुरीचा पत्ता शोधून काढला होता. आज सायंकाळी अनिल ऑफिसातून परत येताना त्याची कार माधुरीच्या घराच्या आसपास बंद पाडण्याचा संदेश देण्याचा आदेश देण्याची विनंती त्यांनी मोहनरावांना केली होती. ही कार मोहनरावांनीच अनिलला भेट दिली असल्याने हे कारस्थान ते करू शकत होते. "पण ती दीडशहाणी कार माझी सुचना सहजासहजी ऐकेल असं मला वाटत नाही!" मोहनरावांनी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करुन पाहिला.

(क्रमशः)

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...