मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १० एप्रिल, २०१६

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ३

आज रविवार २७ मार्च. सहलीचा तिसरा दिवस. रविवार असला तरी आज संकष्टी चतुर्थी! आज सात वाजताचा वेक अप कॉल चक्क कॉल म्हणुन फोनवर आला. सहलीत दोन प्रकारचे दिवस असायचे. पहिला प्रकार म्हणजे असे दिवस ते हॉटेल सोडायचं असायचं आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्या दिवशी स्थळदर्शन करुन पुन्हा त्याच हॉटेल / रुमवर परत यायचं असायचं. अर्थातच दुसरा प्रकार जरा शांततामय असायचा. बॅग्स मधील  बाहेर काढलेले कपडे पुन्हा कोंबुन बॅग्समध्ये भरायचं दडपण नसायचं. 

सकाळ अगदी प्रसन्न होती. रुमच्या खिडकीतुन सुंदर नजारा खुणावत होता. 

ह्या खिडक्यांवर अचानक आवाज झाला म्हणुन पाहायला गेलो तर माकडं खुलेआम भटकत होती. त्यांना काही खुणावण्याचा अयशस्वी प्रयत्न करुन आम्ही आवरायच्या उद्योगाला लागलो. नाष्टा नेहमीप्रमाणे झकास होता. पोहे, दही पराठा, ब्रेड, फ्रुट प्लेट वगैरे वगैरे. 

सकाळी ९ वाजता सर्वांची पावले कॅम्प्टी धबधब्याला भेट देण्यासाठी बसकडे निघाली. अर्थात बस हॉटेलच्या दारात उभी नव्हती. बस पकडण्यासाठी स्टॅंडवर जाणं क्रमप्राप्त होतं. स्टॅंडवर मोजक्या उपलब्ध जागेत पार्किंग करण्यासाठी वाहनांचा गोंधळ उडला होता. बस क्रमांक १ ला कशीबशी पार्किंगची जागा मिळाली होती. बस क्रमांक १ मधील प्रवासी बसुन ती बस पुढे गेली की मग खाली वळणावळणावर कोठे तरी उभ्या असलेल्या बस २ ला वर बोलवायचं असा आधीचा बेत होता. पण मग ह्यात वेळ गेला असता म्हणुन मग काही अंतरापर्यंत बस क्रमांक १ मध्ये २ बसचे प्रवासी बसवायचे (कोंबायचे) असं ठरविण्यात आलं. आदल्या रात्रीच सर्वांची ओळख झाल्याने ह्या प्रकारात सर्वांनी स्वखुशीनं सहकार्य दिलं. मुंबई पुणेकर चौथ्या सीटवर असला काही प्रकार होता. 
सचिन पुढे एकटाच चालत गेला. त्याला वाटेवर घेतलं. एका वळणावर थोडी अधिक जागा बघुन मग बस क्रमांक २ च्या प्रवाशांना त्यांच्या बसमध्ये जाऊ देण्यात आलं. आता आमची बस अगदी प्रशस्त वाटू लागली!! हा रस्ता तसा वळणावळणाचा असणार होता. सावधानगिरीचा उपाय म्हणुन संशयास्पद व्यक्तींना Vomiting Bags चे वाटप करण्यात आले. बऱ्याच अंतरावर रस्त्यावर चालणाऱ्या विक्रांतला बसमध्ये घेण्यात आलं. वाटेवर एका विशिष्ट गुलाबी प्रकारच्या फुलांचं (बुरांश - buransh) दर्शन झालं. ह्या फुलापासून बनविलेला ज्यूस अगदी चवदार आणि आरोग्याला उत्तम असतो अशी माहिती आम्हांला आतिशने पुरवली. ह्या रस्त्यावरुन जाताना JW Marriott चे सुद्धा नयनरम्य दर्शन झालं. 




कॅम्प्टी धबधब्याचा बराच गवगवा कालपासुन चालला होता. त्यात उतरायचं असलं तर स्विमिंग पेहराव घेऊन चला वगैरे वगैरे! त्यामुळे का कोणास ठाऊक माझ्या मनात ह्या धबधब्याविषयी बऱ्याच आशा उत्पन्न झाल्या होत्या. ब्रिटीश अधिकारी ह्या ठिकाणी त्यांचा कॅम्प भरवत आणि त्यात खासे अधिकारी चहा घेण्यासाठी ह्या धबधब्याजवळ येत म्हणुन ह्याचे नाव  कॅम्प्टी!!
रस्त्यावरील काही अशीच छायाचित्रे!




पुन्हा एकदा बस थेट कॅम्प्टी धबधब्यापर्यंत पोहोचली नाही. अरुंद रस्त्यामुळे दोन्ही बस आधीच थांबविण्यात आल्या. आणि आम्ही वीणा वर्ल्डचा झेंडा घेऊन मोठ्या निर्धाराने पुढे चालणाऱ्या सचिनच्या मागे मुकाट्याने चालु लागलो. वाटेत ह्या धबधब्याचे प्रथम दर्शन झालं. 


 
 "प्रथम तुझं पाहता विसरलो भान मी!" वगैरे परिस्थिती अजिबात नव्हती. स्पष्ट सांगायचं झालं तर ह्या धबधब्याने निराशा केली. मुंबई - पुण्याच्या लोकांनी अनेक मोठमोठे धबधबे पाहिले आहेत. त्यापुढे हा धबधबा फारसा आकर्षक नव्हता. वरील दोन फोटोत एक पक्षी वगैरे टिपायचा प्रयत्न केला गेला आहे! तो दिसत नसल्याने मी हे खास वर्णन करुन सांगत आहे! थोडं पुढे चालुन मग विक्रेत्यांच्या बाजारातुन वाट काढत आम्ही मुख्य स्पॉटवर पोहोचलो. इथंसुद्धा ह्या धबधब्याचे दर्शन फारसं काही आकर्षक नव्हतं. 

 
फारसं आकर्षक ठिकाण नसलं तरी आरडओरड करायची, सेल्फी वगैरे काढायची हल्ली पद्धत आहे. बरेच पर्यटक ह्या पाण्याच्या तळ्यात उतरुन चित्रविचित्र आवाज करीत होते आणि फोटो काढत होतो. आम्ही आवाज वगैरे नाही काढले पण काळाला सुसंगत असा सेल्फी काढला. 


 

धबधब्यावरुन आठवण झाली ती दहा वर्षापुर्वीच्या (२००६) च्या मे महिन्यातील अजुन एका धबधब्याच्या ठिकाणच्या सहलीची! कालाय तस्मे नमः!


 आतिश आणि सोहम!
 
मला पकडलंच आहे तर घ्या हवे तितके फोटो काढुन असा भाव चेहऱ्यावर असणारा सोहम!

 

 मुख्य पर्यटन स्थळात दम नसला की मग त्यात कृत्रिमरित्या जबरदस्तीने आकर्षण निर्माण करावी लागतात. असलाच काहीसा प्रकार इथं पाहायला मिळाला. थोडं अजुन वरती जाऊन पारंपारिक पेहरावात फोटो काढायची संधी आम्हांस उपलब्ध करुन देण्यात आली. मला इथं वीणा वर्ल्डच्या चहात रस होता. बिनसाखरेचा चहा, कॉफी वगैरे प्रकार करता करता मग एकदाचा चहा आला. तोवर मी सोहम प्राजक्ताने घेतलेल्या आईसक्रीम कोनवर समाधान मानुन घेतलं. आमच्या बसमध्ये ठाण्याचे नवविवाहित भोळे दांपत्य होतं. ह्या पेहरावात फोटो काढण्याचा त्यांनी फोटो काढले. त्यांच्यासोबत तारकर कुटुंबियांनी सुद्धा ह्या पारंपारिक पेहरावात आपले फोटो घेतले. मला दिसलेली एक पारंपारिक गढवाली वेशातील युवती!


बाजूला एक केबल कार होती. ती एका खासगी तरणतलावाकडे जात होती आणि तिथं अजिबात कोणी नव्हतं. तिथं जाण्यासाठी दाम मोजावे लागत होते म्हणुन बहुदा ही स्थिती. पण तिचा तरणतलाव मात्र चांगला दिसत होता.




 परतताना सोहमने एक गॉगल खरेदी केला. हे लोक अधुनमधून असे गॉगल खरेदी करत असतात. त्यातील काही टिकतात तर काही खराब होतात. घराची साफसफाई करायला घेतली की अशा खरेद्या हमखास बाहेर निघतात आणि मग त्या त्या ठिकाणच्या आठवणी हमखास जागृत होतात. उन्हं वाढली होती आणि बसपर्यंतचा परतीचा रस्ता जरा जास्तच लांब वाटत होता. बस जरी लांब थांबल्या असल्या तरी कारना मात्र जवळपर्यंत येण्यास परवानगी होती आणि त्यामुळे तिथं सावळागोंधळ माजला होता. 

जेवण्यासाठी आम्ही परत आलो ते इम्पेरिअल स्क्वेअर ह्या उपहारगृहात. ते Brentwood Hotel च्या साखळीतीलच उपहारगृह होतं. 






 तारकर आणि आम्ही एका टेबलावर बसलो होतो. श्रिया आणि सोहम ह्यांची आता चांगली दोस्ती होऊ लागली होती. आमची संकष्टी विसरून सचिन तारकर आम्हां सर्वांच्या हिशोबाने चिकन घेऊन आले. पण मग आमचा ठाम नकार ऐकुन त्यांनी मोठ्या सहनशीलतेने ते सर्व स्वतःच संपविल! जेवताना सचिन आणि मिनल ह्यांनी मानसरोवर वारी केलेल्या काही जणांच्या कथा ऐकवल्या. ती वारी करणाऱ्या लोकांना कसं दिव्य अनुभवाची पप्रचिती येते हे ऐकून आम्ही भारावून गेलो. पण ह्या साठी मात्र नक्कीच कणखर तब्येतीची गरज आहे. 

दुपारची जेवण आटोपली आणि आम्ही सायकल स्टॅंडवर पोहोचलो. इथे माणुस ओढून नेणारी सायकल होती आणि त्यात मागे दोघा दोघा जणांनी बसायचं होतं. खरतर हा सुद्धा न पटण्यासारखा प्रसंग! परंतु कंपनी बागेत जाण्यासाठी दुसरा कोणता उपाय नव्हता. ह्या लोकांना मोटारीने ओढल्या जाणाऱ्या सायकली द्यायला हव्यात जेणेकरून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर गदा येणार नाही अशी रास्त सुचना तारकर ह्यांनी मांडली. कोणत्याही वाहनात बसलं आणि आजुबाजूला ओळखीची मंडळी तशाच वाहनात बसलेली दिसली की सोहमच्या मनात (आणि त्याच्यासोबत हल्ली माझ्या मनात सुद्धा!) शर्यतीची भावना निर्माण होते. आम्ही सर्वात शेवटी सायकलीत बसलो. बहुदा सोहमच्या हलक्या वजनामुळे का असेना पण आमच्या सायकलवाल्याने बऱ्याच जणांना ओवरटेक केलं. मधल्या अधिक चढणीच्या भागात आम्ही खाली उतरलो. काही अंतर चालुन पुन्हा बसलो. इतका प्रयत्न करुन सुद्धा तारकर पिता, कन्येच्या सायकलीला अगदी शेवटपर्यंत मागे टाकण्यात आम्हांला यश आलं नाही. 







कंपनी बाग अगदी आकर्षक होती. विविध फुलांनी, झाडांनी नटलेली! तिथं प्रवेशद्वाराजवळ उभा असणारा सचिन अगदी कडक चेहऱ्याने आम्हांला बाहेर पडण्याची वेळ देत होता. आम्हांला ३:१५ वेळ दिल्यावर आमच्या मागच्यांना त्याने ३:२० ची वेळ दिली. त्यामुळे त्याच्याकडे नाराजीने पाहिल्यावर त्याने चेहऱ्यावर मिश्किल भाव आणले. कंपनी बागेतील विविध फोटो! इथला पहारेकरी मात्र अगदी कडक होता! मध्येच फोटो काढण्यासाठी आम्ही हिरवळीवर पाऊल टाकलं तर त्याने अगदी जोरात शिट्टी मारून आम्हांला सक्त ताकीद दिली. 









 बाहेर पडताना आम्हांला वीणा वर्ल्ड खास पॉपकॉर्न देण्यात आले. मला हा प्रकार फारसा झेपत नाही त्यामुळे सोहमला दोन पुडे मिळाले. मधल्या भागात माकडांचा धोका असल्याने हे पुडे काही काळ माझ्या बॅगेत गेले.सायकलमधुन उतरून आम्ही थेट रोपवेच्या रांगेत उभे राहिलो. दोन केबलकार होत्या. सुरुवातीला त्यांची गती अगदी कमी वाटत होती. त्यामुळे रांग अगदी मंदगतीने पुढे सरकत होती. ह्या रांगेत वीणा वर्ल्डच्या लोकांचेच प्राधान्य जास्त होतं. कधीकाळी न्यु जर्सीत पाहिलेल्या कडक हिवाळ्याच्या जोरावर मी मसुरीत स्वेटरची गरज भासणार नाही असा तर्क काढला होता. पण इथं ह्या रांगेत उभं असताना ह्या निर्णयाचा मनोमन पश्चात्ताप मला होत होता. काही काळाने आमचा नंबर लागला. 

केबलकारने वर गेल्यावर गनहिल पॉइंट होता. ह्या ठिकाणच्या नावाची व्युत्पती कशी झाली ह्याची कहाणी सचिनने विशद केली. ब्रिटीश येऊन इथं तोफांचे बार काढीत वगैरे वगैरे! थंडीने एव्हाना मी कुडकुडत होतो. त्यामुळे अगदी मोकळ्या भागात जायचं वगैरे मी धाडस केलं नाही. इथं आम्हांला चहा कॉफी आणि सर्वांची प्रिय मैगी देण्यात आली. नेहमीसारखं इथं पैसे देऊन दुर्बिणीने लांबवरच्या पहाडातील ठिकाणे पाहण्याचा कार्यक्रम होता. बऱ्याच वेळा आपल्याला इथं दिसत काही नाही पण तो माणुस जे काही सांगतो ते दिसल्याचं आपण उगीचच डोकं हलवून कबुल करीत राहतो. इथं सुद्धा तो लोकांना गढवाल जिल्ह्यातील गावं वगैरे दाखवत होता. आणि ती लोक सुद्धा मान हलवून हो हो म्हणत होती! तिथं नेमबाजीचा खेळ जोरात सुरु होता. गिरीश भोळे ह्यांनी आपल्या अप्रतिम नेमबाजीची चुणूक दाखविली. सोहमने एका खेळात झुझू जिंकला. आणि घरातील माझ्या व्हिलन लोकांच्या संख्येत एकाची भर पडली.

इथं एक टुकार शॉपिंग मॉल होता. बहुदा मला जास्तच थंडी वाजत असल्याने ह्या गन हिल पॉइंटवरील सर्व वर्णनात काहीशी नकारात्मकता जाणविण्याची शक्यता आहे. थंडीच्या प्रभावाने प्रभावित मी बाकी कोणासाठी न थांबत परत येण्याच्या रांगेत उभा राहिलो. खाली उतरल्यावर सचिनने आम्हांला मॉल रोड / कुलरि मार्केटचा रस्ता दाखवला आणि तिथुन पुढे हॉटेलात कसं जायचं ते सांगितलं. मी झटपट मॉल रोड किंवा कुलरि मार्केट मध्ये दुकाने पालथी घालू लागलो. शेवटी एका ठिकाणी टर्टल नेकचा एक स्वेटर मिळाला. "बाबा हा तुम्हांला फारसा काही ठीक दिसत नाही! घेऊ नकात!!" सोहमचे हे म्हणणे ऐकण्याच्या पलिकडे मी थंडीच्या प्रभावाने गेलो होतो. हा स्वेटर घातल्यावर माझ्या वावरण्यात अगदी आत्मविश्वास बहरून आला. हा रस्ता अगदी पायाखालचा आहे अशा अविर्भावात आम्ही संचार करू लागलो. ह्या रस्त्यावर मोमो चांगले मिळतात असे आम्हांस सांगण्यात आलं होतं. संकष्टीच्या दिवशी उकडीच्या मोदकाशी दिसण्यात साधर्म्य असणारे हे मोमो खाण्याचा मोह आम्हांला आवरला नाही. चव काही फारशी ठीक नव्हती त्यामुळे आम्ही अधिक मोमोमय होण्याचा मोह आवरला. ह्या ठिकाणाहुन नक्की हॉटेलात कसं पोहोचायचं ह्याविषयी काहीशी अनिश्चिती होती. पण ठाकुर आणि भोर कुटुंबियांच्या ठोस नैतिक पाठिंब्याच्या जोरावर कॅप्टन प्राजक्ता ह्यांनी पुढाकार घेत आम्हांस हॉटेलापर्यंत पोहोचवलं. 

आज भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्यांच्यात अगदी महत्वाचा अंतिम साखळी सामना होता. मैक्सवेल ह्यांच्यावरील प्रेमापायी सोहमची भारताच्या क्रिकेट संघाविषयी असलेली निष्ठा काहीशी डळमळीत झाली होती. ह्याचा सुगावा सर्वांना लागला होता. त्यामुळे सर्वजण सोहमच्या मागे लागले होते. जेवणाच्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला काही प्रमाणात काबूत आणण्यात यश मिळालं होतं.  दोन डावांच्या मधल्या भागात सचिन ह्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची आम्हांस माहित दिली. उद्या आमचं प्रस्थान नैनितालसाठी होणार होतं. हा एकंदरीत प्रवास ३६० किमी इतका होता. जवळपास बारा तासाचा! त्यात उत्तराखंडात राजकीय घडामोडींना वेग येऊन तेथील लोकनिर्वाचित सरकार कोसळलं होतं आणि त्यामुळे तिथं राष्टपती राजवट लागू झाली होती. डेहराडून भागात समजा काही निदर्शनं झाली तर बस अडकायला नको म्हणुन सकाळी लवकर निघणं अत्यावश्यक आहे ह्याची आठवण सचिनने करुन दिली. केवळ हॉटेलचे किचन साडेसातच्या आधी उघडत नसल्याने ह्या आधी आपण निघू शकत नसल्याचं त्याने सांगितलं. जेवण नेहमीप्रमाणे सुरेख  होतो. आजची खीर तर अप्रतिम! सचिन निवेदन करताना एक सरप्राईज आहे असं म्हणाला होता. पण नंतर काही आमच्या लक्षात राहिलं नाही आणि मग खोलीत परत गेल्यावर काही वेळाने सौ. भिसे ह्यांनी बेल वाजवली. आज त्यांचा वाढदिवस होता! वीणा वर्ल्डने तो मसुरीला साजरा करुन एक चांगलं औचित्य साधलं होतं. नितीन भिसे स्वाती भिसे ह्यांना वाढदिवसाचा केक भरवितानाचे हे छायाचित्र !



उद्याचा ३६० किमीचा प्रवास आणि युवराजचा संघर्ष ह्याच्या गडबडीत पाटील कुटुंबियातील दोन जण भारताच्या डावातील १५ - १६ षटके झाली असता झोपी गेले. आणि त्यांनतर मी जे अनुभवलं ते स्वर्गीय होतं! विराट कोहलीची ही इनिंग आयुष्यभर लक्षात राहील! Hats off to you Virat!!

(क्रमशः) 

आधीच्या भागांच्या लिंक्स 

http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_9.html 

http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post.html 

1 टिप्पणी:

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...