मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

भावनाकल्लोळ!

प्रत्येक वर्षाच्या शेवटी मला काहीसं भावनाविवश व्हायला होतं. म्हणजे आयुष्यातील एक वर्ष संपलं, शांततेचा आणि पूर्णत्वाचा शोध सुरूच राहिला. हल्लीचं गडबडीच आयुष्य पाहता भावनाविवश व्हायला सवड मिळणं ही सुद्धा एक चैनच म्हणायला हवी. ही चैन मला ह्या आठवड्यात परवडली. 

आयुष्यात पंचविशी - तिशीपर्यंत कसा अगदी उत्साहपूर्ण काल असतो. आपल्याजवळ आयुष्यात भव्य दिव्य करण्यासाठी अगदी अफाट वेळ आहे अशी भावना मनात व्यापून राहिलेली असते.त्यामुळे एक विशिष्ट मार्गच धरून ठेवायला पाहिजे असला विचार क्वचितच मनात येतो. त्यामुळे ह्या कालावधीत मनाला आवडतील असे निर्णय घेतले जातात. थोड्या कालावधीत एखादा निर्णय न आवडल्यास त्याहून पूर्णपणे वेगळा असा दुसरा निर्णय सुद्धा घेतला जातो. पण त्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत आयुष्याच्या तिशीच्या आसपास किंवा विवाहानंतर काहीसा बदल घडून येतो. माणसाचे प्रथम प्राधान्य हळूहळू स्थैर्याच्या शोधाकडे वळत जातं. काही कलंदर लोक असतात ती आयुष्यभर आपल्या मर्जीने वागत राहतात. 

जगात समस्या अनेक आहेत. मुंबईसारख्या शहरात राहायचं झालं तर बऱ्याच वेळा तुम्हांला सर्व जग हे समस्यांनी भरल्याचा भास होऊ शकतो. आणि मग आपण आपलं आणि आपल्या जीवाभावाच्या माणसांचं आयुष्य सुखमय करण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्याला कितपत अर्थ आहे असा विचार मनात येतो. अशा वेळी तुम्ही दोन प्रकारे विचार करू शकता. एक म्हणजे संपूर्ण जगाच्या समस्या मला सोडवायच्या आहेत. किंवा मला फक्त माझ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून माझा संसार सुखाने चालवायचा आहे.  ह्यातील कोणतीही एक टोकाची भुमिका घेणं हे चुकीचं! आपली सद्यस्थिती लक्षात घेता त्यानुसार स्वार्थ आणि समाजकारण ह्यात समन्वय साधावा.ज्यावेळी अगदीच असुरक्षित वाटू लागतं तेव्हा फक्त आपल्या संसारावर आणि त्यातील समस्यांवर लक्ष केंद्रित करावं. अशा वेळी समस्या सोडविल्या जाण्याची शक्यता वाढीस लागते. 

हल्ली ऑफिसात सर्वांनाच भन्नाट कामं असतात.  अगदी एका वेळी वेगवेगळी २५ - ३० कामं तुमच्या समोर आ वासून उभी ठाकलेली असतात. प्रत्येक कामाच्या बाबतीत ते आदर्शपणे पूर्ण करण्याची एक पद्धत आपल्या मनात असते. पण बऱ्याच वेळा ते शक्य नसतं आणि त्यामुळे अगदी अंगाशी आलं की ते काम कसबसं पूर्ण करून दिलं जातं. आताशा एक नवीन पद्धत रूढ होत चालली आहे. कामाचा मूळ गाभा कशाही रुपात पूर्ण झाला असो पण अंतिम स्वरुपात ते जेव्हा सादर केलं जातं तेव्हा त्याचं प्रदर्शनी रुप अगदी आकर्षक बनवलं जातं. ह्या आकर्षणीकरणाच्या अट्टाहासापायी मूळ मुद्दा बऱ्याच वेळा गायब गेला जातो किंवा मूळ मुद्द्यात काही ठोस जीव नाही ह्या बाबीपासून यशस्वीपणे लक्ष खेचलं जातं. 

मुलांना आयुष्यात सर्वोत्तम गोष्टी लाभाव्यात म्हणून घरातील आईवडील सतत कष्ट करीत राहतात. म्हटलं तर मराठी समाजाची ही परंपरा आहे. पण जर मी कुटुंबासाठी दीर्घकाळ उपलब्ध राहायला हवा असू आणि ते सुद्धा माझ्या सर्वोत्तम क्षमतेनिशी तर अधुनमधून मलादेखील माझ्या आवडीने फुरसतीचे क्षण मिळाले पाहिजेत ही बाब पालकांनी आपल्या मुलांना सांगायला हवी. हल्लीच्या युगात मुलांमध्ये स्वकेंद्रित दृष्टीकोन निर्माण होण्याची दाट शक्यता असते अशा वेळी त्यांना दुसऱ्यांच्या आवडीनिवडीची, त्यांना आवश्यक असलेल्या "स्पेस" ची योग्य वेळी जाणीव करून द्यायला हवी. 

कॉलेजात असताना खास मित्र म्हणायचा, "कॉलेजात प्रत्येकाला एक तरी आवडती कन्यका असावी! मग अभ्यासात काहीतरी चांगलं करून दाखविण्याचा प्रयत्न केला जातो!". मध्यंतरी बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर डोळे मिचकावून तो म्हणाला, "कॉलेजात काय अजुनही प्रत्येकाला एक तरी आवडती कन्यका असावी!" ही आठवण सांगायचं कारण म्हणजे आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला भेडसावणारी एक तरी समस्या असतेच. आणि मग त्या समस्येचे रूप कसेही असो आपल्या दृष्टीने ती सर्वात गहन समस्या बनून राहते. त्यामुळे जोवर आपल्या समस्यांकडे तटस्थपणे पाहण्याची क्षमता आपण विकसित करत नाहीत तोवर आपलं काही खरं नाही.आपण स्वतःवर आणि स्वतःच्या प्रतिमेवर खूपच प्रेम करतो आणि तेच आपल्या चिंतेचे मूळ बनून राहते असं मला बऱ्याच वेळी आढळून आलं आहे. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गोष्टी गेल्यांस सर्व काही विसरून जावे आणि मस्तपैकी गाणी ऐकत बसावे. 

आमचा समाज सोमवंशीय क्षत्रिय समाज. वसई, विरार, केळवा, माहीम, वाणगाव, चिंचणी, बोर्डी ह्या भागात प्रामुख्याने वास्तव्य करून राहणारा. शेतजमिनेचे काहीसं पाठबळ लाभलेला. आर्थिक स्थिती फारशी श्रीमंतीकडे झुकणारी नसली तरी प्रचंड उत्सवप्रिय आणि बरीच नातीगोती जपणारा! त्यामुळं होतं काय की वर्षातील बराच काळ आमच्या समाजातील लोक समारंभात दंग असतात. लग्नाला दीड दोन हजार लोक उपस्थित असणं ही नित्याची बाब, त्यात आदल्या दिवशी मुहूर्ताला सुद्धा किमान पाचशे लोकांना आमंत्रण. ही आमंत्रण सुद्धा इतकी जोरदार की समजा आमंत्रण करून एखादा उपस्थित राहिला नाही की मग यजमानांचा रोष पत्करावा लागणार. त्यानंतर बारसे वगैरे सुद्धा धुमधडाक्यात करण्याची पद्धत. आता त्यात वाङ्निश्चय ह्या कार्यक्रमाची भर पडली आहे. हा कार्यक्रम सुद्धा जवळजवळ लग्नाइतक्याच धुमधडाक्यात साजरा होतो. ह्या कार्यक्रमात किंवा मुहूर्ताच्या दिवशी रसिक मंडळीसाठी सोमरसपानाची खास सोय करण्याची पद्धत रुजू झाली आहे. आता एकाने केलं की दुसरा करणार आणि मग काही दिवसात ही प्रथा म्हणून रूढ होणार. 

मुळच्या शेतीप्रधान असलेल्या ह्या आमच्या समाजातील मागच्या एक दोन पिढ्यांनी शिक्षणक्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली. पण ह्या प्रगतीचा प्रसार अजून दूरगामी झाला नाही. ज्यांच्यापर्यंत ही शैक्षणिक प्रगती पूर्णपणे पोहोचली नाही त्यांनी सणासमारंभाचा सोस कमी ठेवावा अशी माझी नम्र विनंती!

एकंदरीत शिक्षणावर अवलंबून असणारा मध्यमवर्गीय समाज एका स्थित्यंतरातून जात आहे. म्हटलं तर तसा तो नेहमीच जात असतो असा गेले काही वर्षांचा इतिहास सांगतो. पण हल्ली एक मोठा फरक जाणवू लागला आहे आणि तो म्हणजे समाजातील बहुसंख्य मध्यमवर्गीय जनतेला शाश्वततेची हमी देणारं, दिशा दर्शविणारं नेतृत्व अस्तित्वात नाही. ह्यात मला कोणतही राजकीय विधान करायचं नाहीयं. आपलं जीवन इतकं गतिमान बनलं आहे की कोणालाही पुढील १०-१५ वर्षे मी ह्याच एका क्षेत्रात नोकरीला असेन किंवा मी हाच नोकरीधंदा करत राहीन असे छातीठोकपणे सांगता येत नाही. ह्या अशाश्वततेमुळे लोक हपापलेल्याप्रमाणे पैसा कमावायच्या मागे लागल्याचं दिसतं. ४० -४५ च्या आसपास एखादं पर्यायी क्षेत्र पोटापाण्यासाठी निवडायची वेळ आपणा सर्वांवर येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या गोष्टीसाठी एक समाज म्हणून आपण तयार आहोत का हा लाखमोलाचा प्रश्न. आणि एखादा चाळीशीतील माणूस पर्यायी व्यवसायाच्या शोधात सहा महिने घरी बसला तर त्याला आपण विविध प्रश्न विचारून सतावणार नाही ह्याची हमी देऊ शकू का?

समाजात अजून एक बाब प्रकर्षाने जाणवते. तंत्रज्ञानाने दैनंदिन जीवन इतकं व्यापून टाकलं आहे आणि ह्या तंत्रज्ञानाशी ज्यांना जुळवून घेता आलं नाही अशा वयोवृद्ध पिढीला त्यामुळे काहीसा न्यूनगंड निर्माण झाला आहे. परंपरेनुसार वयोवृद्ध पिढी तरुण पिढीच्या उत्साही आणि क्वचितच बेतालपणाकडे झुकणाऱ्या वागण्यावर अंकुश ठेवण्याचं काम करीत असे. परंतु काहीसा आत्मविश्वास गमावलेली ही ज्येष्ठ नागरिकांची पिढी तरुण पिढीला काही लगाम घालत नसल्याने तरुण पिढी काही प्रमाणात बेताल सुटली आहे असं काही काळ वाटत होते. परंतु तंत्रज्ञानाचा हा अतिरेक एव्हाना तरुण पिढीतीलच काही लोकांना खटकू लागल्याने तेच हळुहळू ह्याला आवर घालत आहेत असे आशादायी चित्र दिसू लागले आहे. 

इंग्लिश माध्यमातील शाळांचा सर्वत्र प्रसार झाला आहे. वागण्यात, सभाधीटपणात आणि पोशाखाच्या बाबतीत मुलं अधिकाधिक स्मार्ट बनत चालली आहेत. पण गणित, भाषेचे व्याकरण ह्या सारख्या विषयात मातृभाषेत शिकणारी मुले ज्या सहजतेने प्रभुत्व गाजवत असत ते मात्र आज अभावानेच दिसत आहे. 

एखाद्या विषयावर सखोल अभ्यास करून मग आपलं मत बनविणे किंवा मांडणे ह्यात सर्वसामान्य जनता दिवसेंदिवस खूप मागे पडत चालली आहे. त्यामुळे सोशल मीडियातून उपलब्ध झालेल्या वरवरच्या माहितीवरून आपलं मत बनविण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. आणि त्यामुळे इतिहासातील थोडंसं सत्य घेऊन मग त्याला चकचकीतपणाचा मुलावा देऊन आकर्षक ऐतिहासिक चित्रपट वगैरे बनविण्याचे धाडस हल्ली प्रचलित झालं आहे. 

सोशल मीडियाद्वारे मित्रमंडळी, नातेवाईक लोकांशी सतत संपर्कात राहण्याचं काहीसं दडपण सर्वांवर वाढीस लागलं आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात अधूनमधून बरेच व्यत्यय येत राहतात. आणि सखोलपणे एखादा विषय अभ्यासण्याची, एखाद्या पुस्तकाचे, गाण्याचे खोलवर रसग्रहण करण्याची संधी दवडण्याची शक्यता निर्माण होत चालली आहे. 

प्रवासाची आवड समाजात वाढीस लागली आहे ही एक उत्तम गोष्ट झाली आहे. ह्यामुळे जगभरातील उत्तमोत्तम गोष्टी, प्रथा हळूहळू आपल्या समाजात रूढ होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. 

आहाराविषयी अधिकाधिक लोक जागरूक होत चालले आहेत. आणि दैनंदिन आहारात शाकाहार, पालेभाज्या ह्यांचं प्रमाण वाढीस लागलं आहे. परंतु आठवडाभर दाखविलेली शिस्त समारंभात किंवा साप्ताहिक सुट्टीच्या वेळी बाहेर हॉटेलात जाऊन केलेल्या आहारामुळे वाया जाण्याच्या शक्यता वाढीस लागल्या आहेत. मद्यपानाचे वाढते प्रमाण हा ही एक जबरदस्त चिंतेचा विषय होत चालला आहे. ह्यात काही एक वर्ग असा आहे की जो मद्यपान किती आणि कधी करायचं ह्यावर पूर्ण नियंत्रण ठेऊ शकतो. पण बाकीचे लोक मात्र आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहेत असंच म्हणावं लागेल.

शांतपणे ब्लॉग पोस्ट्स लिहायची चैन संपली. उद्या सुट्टीचा शेवटचा दिवस! परवापासून नवीन वर्ष आणि कामाच्या व्यापात पुन्हा एकदा गढून जाणं ओघानेच आलं. दरवर्षी जरा स्मार्टपणे काम करण्याचा निर्धार मी करतो जो पहिले काही दिवस टिकतो. ह्या वर्षी तसला काही निर्धार करायचा नाही हाच निर्धार मी केलाय. आदित्य म्हणून जे काही योग्य वाटतंय ते करायचं आणि आयुष्याच्या एका नवीन वर्षाला सामोरं जायचं हाच नववर्षाचा संकल्प!

आपल्या सर्वांना २०१६ वर्ष सुखासमृद्धीचं जावो ही शुभेच्छा! आपण माझ्या ब्लॉगला दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आपला हा लोभ असाच कायम राहावा ही विनंती! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...