मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

स्व - अनुभव - फक्त दुसऱ्यांच्या नजरेतून!!


 
निसर्गतः बहुतांशी स्वकेंद्रित असलेले आपण स्वतःच्या अनुभवांची चिंता वाहण्यात इतके गर्क असतो की आपल्या अस्तित्वाने, बोलण्या चालण्याने, लिहिण्याने दुसऱ्यांना कसे अनुभव मिळतात हे बऱ्याच वेळा आपल्या खिजगणतीत सुद्धा नसते. 
काही माणसं फक्त साधी माणसं असतात. ती दैनंदिन व्यवहार करण्यापलीकडे काही करत नाहीत. एकंदरीत मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ह्या माणसांच्या अस्तित्वाने फरक पडला नाही असेही विद्वान म्हणू शकतात. पण ह्या साध्या माणसांची एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते आणि ती म्हणजे ह्या साध्या माणसांवर बाकीच्यांना खास लक्ष दयावे लागत नाहीत. ती भोळी भाबडी आपले नित्यक्रम सहजरीत्या पार पाडतात. बऱ्याच वेळा ही साधी माणसे अनेकांना आपलं ध्येय साध्य करायला मदत करीत असतात. एखाद्या मोठ्या खेळाडूला सरावासाठी तासनतास नेट्समध्ये गोलंदाजी करणारा सामान्य गोलंदाज, मोठ्या कलाकाराबरोबर चित्रपटातील गाण्यात बाजूला नाचणारी extra मंडळी अशी अनेक उदाहरण देता येतील. 
लेखाच्या मूळ मुद्द्याकडे! आपल्या दररोजच्या जीवनात आपण आपला जीवनसाथी, मुलं, आईवडील, भाऊबहिण, नातेवाईक ह्यांच्या संपर्कात येतो. आपल्या संस्कृतीचे आपल्या आईवडिलांनी / मोठ्या माणसांनी आपणास संस्कार दिलेले असतात. काहींना हे संस्कार मिळतात काहींना मिळत नाही. काही जणांना त्याऐवजी ह्या जीवनसंघर्षात कसं तगून राहायचं ह्याचे धडे परिस्थिती देते. अशा लोकांना स्वतःच्या वागण्यातून दुसऱ्यांना कसा अनुभव मिळतो ह्याचा विचार करण्याची चैन परवडत नाही. 
ज्यांना आपल्या वागण्यातून दुसऱ्याला कसा अनुभव मिळतो ह्याचा विचार करण्याची संधी परिस्थितीने दिले असते त्यातील फारच कमी लोक असा विचार करत असतात. ह्या अशा वागण्याची ह्या लोकांच्या म्हणण्यानुसार कारणे अनेक असतात. 
१) माझे ध्येय खूप मोठं आहे. ते साध्य करण्याऐवजी मी दुसऱ्याचा विचार करून कसा चालेल. 
२) मला अनेक प्रकारच्या लोकांबरोबर व्यवहार करावे लागतात. कसं वागल्याने त्यातील प्रत्येकाला बरं वाटेल हे माहित करून घेणं कठीण आहे. त्यापेक्षा ह्याचा विचारच न केलेला बरा!
३) माझ्या मनाची कोण पर्वा करतं का? मग मी दुसऱ्यांची का करू? 


आता आपण हे पाहूयात की दुसऱ्यांच्या जीवनात निखळ आनंद पसरवणारे ह्या पृथ्वीवर कोण आहेत? 
वैयक्तिक जीवनात माता, पिता, अपत्य, काही नातेवाईक तर सामाजिक जीवनात कलाकार (गायक, चित्रकार, शिल्पकार, अभिनेता, लेखक वगैरे वगैरे), सुंदर स्त्री / पुरुष, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत ही मंडळी जनांच्या जीवनात आनंद पसरवत असतात. काहीच्या व्यवसायातील कृतीने हा आनंद निर्माण होतो. तर काही वेळा काही मंडळी पैशाच्या मोबदल्याची आशा न बाळगता हा आनंद निर्माण करीत असतात.   
पुन्हा  एकदा सर्वसामान्य लोकांच्या जीवनात डोकावूयात 
१> आपल्या श्रीमंतीचं, विविध परदेशातल्या ठिकाणच्या भेटींचे सतत सोशल मिडिया मध्ये प्रदर्शन करणारी व्यक्ती स्वानंद हा केंद्रबिंदू ठेऊन वागत असते. ह्या प्रदर्शनाने ज्यांना ह्या गोष्टी साध्य होणे शक्य नाही त्यांच्या मनात काहीशी अतृप्तीची भावना निर्माण होणे शक्य आहे ह्याचा विचार केला जात नाही. ह्याउलट निसर्गाची, पक्षी प्राण्यांची सुरेख चित्रे लोकांसोबत शेअर करणारी व्यक्ती सर्वांना निखळ आनंदाची अनुभूती देते. कारण ह्यातील श्रीमंती निसर्गाची असते आणि त्या व्यक्तीच्या मनाच्या मोठेपणाची!
२> सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर ज्यांना मानाची जागा हवी असते अशा काही व्यक्ती असतात. ९९ टक्के ही त्यांची वैयक्तिक गरज असते तर १ टक्का ही समाजाची गरज असते. आपली वैयक्तिक गरज भागवत असताना त्यांच्या हातून जर काही सत्कृत्य होत असेल तर कोणी खेद मानू नये. 
सार्वजनिक जीवनात स्वतःची टिमकी वाजवणारी काही मंडळी असतात. जोवर स्वानंद ह्या भावनेसाठी ही टिमकी वाजवली जाते तोवर ठीक असते पण ज्या क्षणी दुसऱ्याच्या मनात असूया, राग निर्माण करण्यासाठी ही टिमकी वाजवली जाते तेव्हा हा एक क्लेशदायी अनुभव बनतो. 
३> मला सार्वजनिक ठिकाणी कोणी भाव देत नाही किंवा मला हल्लीच्या दिखाऊ दुनियेची तत्व पटत नाहीत म्हणून स्वतःभोवती दुःखाचा कोष विणून बसणारी मंडळी ही दुसऱ्यांच्या दृष्टीने काहीही चांगला अनुभव निर्माण करीत नाहीत. ह्यातील काही जणांना सहानुभूती हवी असते तर काहींना ती सुद्धा नको असते.
४> पोस्ट्च्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काही मंडळी अगदी भोळी असतात. स्वतःचे हित न पाहता ती एक साधं आयुष्य जगत असतात. हे आयुष्य जगताना अधूनमधून कळत नकळत त्यांच्या हातून परहित साधलंही जात असत.

शेवटी आपण आपल्या ह्या भूतलावरील अस्तित्वाने दुसऱ्याला कसा अनुभव देतो ह्याचा हिशोब कोठेतरी मांडला जात असेल काय? अगदी खेचूनच धरलं तर ह्या संकल्पनेला पाप पुण्य असंही म्हटलं जाऊ शकतं. देव काही स्वर्गात बसले नाहीत, आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा त्याचाच अवतार आहेत. केवळ हा हिशोब कोठेतरी मांडला जात असेल म्हणून लोकांशी चांगलं वागणं चूक की बरोबर? जाऊ देत डोक्याला खूप त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...