मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

IT मधल्या रात्रपाळ्या

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र बाहेरून फार आकर्षक वाटते किंबहुना वाटायचं. परंतु त्यातही बऱ्याच वेळा घी देखा लेकीन बडगा न देखा अशी स्थिती असते.  रात्री उशिरापर्यंत थांबणे, किंवा बिकट परिस्थिती उदभवल्याने पूर्ण रात्र कार्यालयात घालविण्यास भाग पडणे असले प्रसंग वारंवार येतात. हल्ली काही सुदैवी लोकांना घरून कार्यालयाचे काम करण्याची सुविधा (?) मिळाल्याने, रात्री बेरात्री घरच्या सकट सर्वांना उठवून मग कार्यालयाचे काम करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होते.

रात्रपाळीची माझी गाठ प्रथम ९८ साली सीप्झ मध्ये Y२K प्रोजेक्टवर  काम करताना पडली. सुरुवातीला कंपनीने एकदम १०० लोकांना त्या प्रोजेक्टवर घेतले खरे परंतु सर्वांसाठी संगणक नव्हते, त्यामुळे आमच्यासारख्या सुदैवी लोकांची निवड रात्रपाळीसाठी झाली. पहिल्या काही दिवसात मेनफ्रेमची लिंक नव्हती आणि त्यामुळे आम्ही आज्ञावली मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये बदलून ठेवत असू. ह्यात काय साध्य होतंय हे फक्त आमच्या व्यवस्थापकालाच कळत असावे. परंतु त्याला आव्हान करण्याचे धारिष्ट्य आम्ही दाखविले नाही.

दुसऱ्या आठवड्यापर्यंत लिंक आली. प्रत्यक्ष मेनफ्रेमवर काम करण्याची संधी मिळतेय ह्याचा आम्हा पामरांना कोण आनंद झाला. तो काळ वेगळा होता. लोक मेनफ्रेमचा थोडाफार अभ्यास करीत, जमल्यास एखाद्या कंपनीत तीन चार महिने काम करीत आणि मग काहीसा अनुभव फुगवून दाखवून अमेरिकेला पळ काढीत. त्यामुळे आपल्या सोबत काम करणारा आपला सहकारी किती दिवस आपली सोबत करणार आहे हे समजावयास वाव नसे. लिंक आल्यावर मला मेनफ्रेममध्ये असलेल्या काही JCL / PROC चे पृथ्थकरण करून त्याची नोंद एक्सेल मध्ये करण्यास सांगण्यात आली. अशाच एका अशुभ शुक्रवारच्या रात्री (ज्या वेळी बाकी दुनिया FRIDAY NIGHT चा आनंद उपभोगत होती) मी आणि माझा सहकारी किरण, अजून पाच दहा सहकाऱ्यांसोबत दुःखी अंतकरणाने, मनात आमच्या व्यवस्थापकाचे गुणगान करीत हे पृथ्थकरण करीत होतो. त्यावेळी बहुधा एक्सेलमध्ये ऑटोसेव पर्याय (जो तुम्ही एक्सेल मध्ये उतरविलेली माहिती थोड्या थोड्या वेळाने कायमस्वरूपात उतरवितो) उपलब्ध नव्हता. रात्रीचे जेवण दहा वाजेपर्यंत आटोपले. मी माझ्या अननुभवी स्थितीमुळे अजून एकदाही उतरविलेली माहिती सेव केली नव्हती. गप्पाटप्पा आणि अधूनमधून काम असला प्रकार चालला होता. तीनच्या आसपास डोळे पेंगुळाय़ला लागले. आणि मग तो दुर्भाग्यपूर्ण  क्षण आला. मी चुकून एक्सेल बंद करण्याच्या कळीवर क्लिक केले. 'पामरा तुला तुझी गेल्या सहा तासातील धडपड कायमस्वरूपी करायची आहे का?' एक्सेलने मला विचारलं. आयुष्यात काही क्षण किंवा काळ असे येतात की ज्यावेळी आपल्या कृतीवर आपले नियंत्रण नसतं, कोणती तरी बाह्य शक्ती आपले नियंत्रण घेते. माझेही असेच झाले, किंवा सोप्या शब्दात झोपेने माझ्यावर अंमल बजावला होता त्यामुळे मी नाही म्हणून मोकळा झालो. एक्सेलने ते वर्कबुक बंद करताच माझी झोप खाडकन उतरली, आपल्या हातून काय चूक घडली हे ध्यानात आले. आता पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नव्हता. बाकी आपल्या हातून मोठी चूक झाल्यास आपण पेटून उठतो आणि ती चूक निस्तरायचा प्रयत्न करतो. माझेही तसेच झाले. मी झोपेचा विचार सोडून देवून गेल्या सहा तासातील काम पुढील तीन तासात पुन्हा आटोपले.

हळूहळू काम वाढत चालले होते. आज्ञावली लिहायची, तिचे एकक परीक्षण (युनिट टेस्टिंग) करायचे हा प्रकार सुरु झाला. प्रियु आणि रमाकांत असे आमचे वरचे बॉस होते. त्यांचे १०० जणांच्या संघावर बारीक लक्ष असायचे. एखादी मूर्खपणाची चूक झाल्यास त्यातील एक अपराध्याला सर्वांसमोर ओरडे पण मग दुसरा काही वेळाने त्या चूककर्त्याची समजूत घाली. प्रियु सकाळी साडेनऊच्या सुमारास ऑफिसात येत . आणि रात्री बऱ्याच उशिरापर्यंत थांबे. सीप्झची दारे रात्री १२ वाजता बंद होत आणि सकाळी पावणे सहाच्या सुमारास उघडत.  प्रियु पावणेबारा पर्यंत ऑफिसात थांबणे हे नित्याचे असे. परंतु त्यापलीकडे ते ऑफिसात थांबले की आम्ही बेचैन होत असू! न जाणो त्यांना सीप्झच्या गेटवरून घरी जाऊ नाही दिले तर? एकदा खरोखर तसे झालेही परंतु प्रीयुंनी मग एक दोघांना फोन करून आपली (आणि आमची सुद्धा) सुटका करून घेतली. प्रियु साधारणतः अकरा वाजता सर्व फ्लोअरवर चक्कर मारीत आणि सर्वांचे स्टेटस विचारीत. सुरुवातीला असेच एकदा त्यांनी मला आणि दहा पंधरा जणांना स्टेटस विचारलं. मग ते घरी निघून गेले. त्या दिवशी पोरे टाईमपासच्या मूड मध्ये होती आणि मी ही! बहुधा प्रीयुंना घरी झोप लागत नसावी.  पहाटे चार वाजता माझा फोन खणखणला. प्रियु फोनवर होते. "आदित्य आपण कोठवर आलो आहोत?" ११ वाजल्यापासून काही केलेच नाही तर माझी काय प्रगती होणार? मी अकरा वाजताचेच स्टेटस ऐकवण्यास सुरुवात केली. दीड मिनिटातच समोरून आवाज आला, "बॉस, ये तो ग्यारा बजे का स्टेटस है, जावो अभी काम करो!" मी पूर्ण शरणागती पत्करली.

आमच्यात कलाकार लोक होतेच. त्यातील मनीषला प्रियुचा आवाज बऱ्यापैकी जमे. मग त्याने रात्री दीड दोनला पब्लिकला स्टेटस विचारणारे फोन करण्यास सुरुवात केली. अर्धेअधिक लोक त्यात फसले जात आणि मनीषला स्टेटस देत. मनीष सुद्धा त्यांना झाडून घेत असे. असेच एकदा त्याने रविकृष्णला फसविले. रवीचा संताप संताप झाला. रवीच्या दुर्दैवाने पुढील दोन तीन दिवसात खरोखर प्रियुचा फोन आला. रवीने त्यांना मनीष समजून आपला सर्व राग त्यांच्यावर काढण्यास सुरुवात केली. पुढील संभाषण आठवले की मला अजूनही जोरदार हसू येते. आधी सिंहाच्या आवेशाने संभाषण सुरु करणारा रविकृष्णा शेवटी अगदी गोगलगाय बनून गयावया करू लागला होता.

रात्री बारा वाजता चहावाला येई. त्याभोवती आम्ही एकत्र जमू आणि चहा, बिस्किटे अशा मेनूचा आनंद घेत असू. जनतेने मग गाणी संगणकावर आणून टाकली. R D बर्मनची 'पन्ना कि तमन्ना है' वगैरे गाणी वाजवली जात. ती गाणी ऐकताना मेनफ्रेमच्या हिरव्या - काळ्या स्क्रीन कडे पाहत काम करण्याचा आनंद काही औरच असे. तीन साडेतीन वाजता अमेरिकतील संघ घरी निघून जाई. मग आम्हीसुद्धा चार चार खुर्च्या एकत्र लावून साधारणतः अंधारातील जागा पाहून  झोप काढीत असू. सकाळी सहा वाजले की मी सीप्झच्या गेटकडे धाव घेई आणि रिकाम्या विरार लोकल पकडून वसईला परतत असे. कधी कधी ह्यातही धमाल येई. काहीजण (पुन्हा रविकृष्णा आलाच!) SHORT PANT वर झोपित. असेच एकदा मंडळी SHORT PANT आणि गंजी अशा वेशात निद्राधीन झाली होती . त्यावेळी सकाळी काही मुली कामानिमित्त सात वाजताच ऑफिसात आल्या. त्यांना पाहून रविकृष्णा लज्जेने चुरचुर झाला! त्या मग बाजूला गेल्यावर "तुम लोगको मेरेको उठाने को नही होता क्या?" असे म्हणत त्याने आम्हाला फैलावर घेतले!
गेले ते दिन गेले! अशाच पुढील काही आठवणी पुढच्या भागात!

मागील भागात रंजूचा उल्लेख करायचा राहून गेला. जसजसे एकक परीक्षण प्रगतावस्थेत गेले तसतशा  काही क्लिष्ट समस्या पुढे येऊ लागल्या. मग रंजूला पाचारण करण्यात आले. आता रात्रपाळीत तीस चाळीस लोक धडपडत असायची आणि रंजूसाहेब एका संगणकावर कारचा खेळ खेळत असायचे. सुरुवातीला मला रंजुची आणि त्याच्या मेनफ्रेमवरील करामतीची माहिती नव्हती. आणि त्यातच रंजूचे आगमन झाल्यावर पहिले काही दिवस काहीच प्रश्न उदभवले नाहीत. त्यामुळे ह्या माणसाला खेळ खेळण्यासाठी इथे का बोलावलं असा मला प्रश्न पडायचा. बाकी तो कारचा खेळ मात्र उत्तम खेळायचा. मग एकदा आमचा एक संघ एका समस्येत अडकला. आता DB२ टेबल लोड होत नव्हते की nomad प्रोग्रॅम चालत नव्हता हे नक्की आठवत नाही. पण दिवसभर संघ अथक प्रयत्न करीत होता. रंजूचे रात्री नऊच्या सुमारास आगमन झाले. पाच दहा मिनिट त्या समस्येकडे त्याने पाहिलं. मग आपल्या डेस्कवर गेला. एक कारची शर्यत खेळला. त्यावेळी त्याच्या डोक्यात त्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचं ह्याचा विचार चालू होता हे नक्की. मग ती शर्यत जिंकून आल्यावर गडी त्या प्रश्नावर बसला. दोन तीन प्रकारे प्रयत्न झाले आणि मग दहा मिनिटात तो प्रश्न सुटला होता. रंजूविषयी माझा आदर दुणावला होता. कोणत्याही क्षेत्रात मेहनत वगैरे ठीक असते पण अफाट गुणवत्तेला पर्याय नसतो ह्याची नोंद मी त्यावेळी केली.
रंजू खट्याळ होता. आपल्या खट्याळपणासाठी तो मेनफ्रेमच्या रेक्स ह्या भाषेचा वापर करायचा. रेक्समध्ये मेक्रो लिहून आम्हा गरीब आत्म्यांचा तो छळ करायचा. मेनफ्रेममध्ये लॉगऑन करताना किंवा मध्येच कधीही आमची हिरवी काळी स्क्रीन अचानक मोठमोठ्या संदेशांनी भरून जायची. मग आम्ही समजायचो की रंजूची आमच्यावर वक्रदृष्टी झाली आहे. एकदा त्याने असाच एकाला संध्याकाळच्या वेळी मेसेज पाठवला की मेनफ्रेमचे TSO सेशन  आता पाच मिनिटात बंद होणार आहे. तो बिचारा गरीब जीव खुशीने सर्व तयारी करून घरी जायला तयार होवून बसला.  सेशन बंद होण्याची वाट पाहत! एव्हाना ही बातमी शंभर जणांच्या संघाला पोहाविण्याची काळजी रंजुने घेतली होती त्यामुळे सर्वजण गालात हसत त्या गरीब जीवाकडे बघत होते. मग काही वेळाने त्या गरीब जीवाने (रमेश) बाकीच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आणि सर्वत्र हास्यकल्लोळ पसरला!
कालांतराने Y२K प्रोजेक्ट संपलं. मग मी इंग्लंडला गेलो तिथे सुदैवाने रात्रपाळी करण्यापर्यंत वेळ आली नाही. शनिवारी मात्र जावं लागायचं. तिथे त्या मजल्याच्या दुसऱ्या भागात  त्या वित्तीय संस्थेचे कॉलसेंटर सुद्धा होते. एकदा त्यांचा दुभाषा आला नव्हता आणि पाकिस्तानातून क्रेडीट कार्डच्या चौकशीसाठी एक कॉल आला. मग तेथील एक गौरवर्णीय ललना माझ्याकडे आली आणि तिने मला तो कॉल घेण्यासाठी बोलाविले. अस्मादिक धन्य झाले! बाकी तो कॉल मात्र मी कसाबसा निभावला.
मधली काही  वर्ष रात्रपाळीशिवाय गेली. ०३-०४ साली मी फ्लोरिडात गेलो. तिथे एक मोठे प्रोजेक्ट प्रोडक्शनमध्ये  जायचं होत. त्याचं सर्व प्रकारचं परीक्षण आम्ही सहा - सात महिने करीत होतो. त्यातील शेवटचा एक महिना implementation डे (अंमलबजावणीचा दिवस) च्या दिवशी कराव्या लागणाऱ्या कृतींचा क्रम आणि त्यासाठी जबाबदार व्यक्तींची नेमणूक हे ठरविण्यात गेला. ही एकूण अंमलबजावणी ३६ - ४२ तास चालणार होती. प्रथम युरोप, मग अमेरिका आणि मग आशिया - ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे ही अंमलबजावणी करण्यात येणार होती. ह्यात कोणत्याही महत्त्वाच्या क्षणी जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आज्ञावली आणि माहितीभांडार ह्यांना कसे पूर्वपदावर आणायचे ह्याचेही नियोजन करणे आवश्यक होते. कितीही नियोजन केले तरी ही (पूर्वपदावर आणण्याची) वेळ येऊ नये ही प्रार्थना आम्ही करीत होतो. माझी नेमणूक शुक्रवारी आणि शनिवारीच्या रात्रपाळीसाठी करण्यात आली होती. थोडक्यात म्हणजे मी आघाडीचा आणि शेवटचा फलंदाज होतो.
शुक्रवार संध्याकाळ सात ते शनिवार पहाट चार अशी माझी शिफ्ट होती.  माझ्याबरोबर गॅरी होता. गॅरी तसा प्रेमळ माणूस होता. त्याच्याकडे आणि त्याच्या एका मित्राकडे विविध प्रकारच्या चॉकलेटचा मोठा साठा असे . माझ्या अमेरिकतील वास्तव्यातील प्रत्येक दिवशी तो तीन - चार चॉकलेट माझ्या आणि आम्हा काही जणांच्या डेस्कवर आणून ठेवी. आणि ही चॉकलेट न खाल्ल्यास तो नाराजी व्यक्त करी. त्यामुळे सुरुवातीला मी दररोज ती खात असे. पण नंतर कंटाळा आल्याने मी ही चॉकलेटस खणात ठेवून घरी नेऊन ठेवण्यास सुरुवात केली. घरी मोठा चॉकलेटचा डबा भरला. मला काही काळाने गॅरी तसला म्हणजे गे असल्याचे एका मित्राकडून कळाले. मला मोठा धक्का बसला. परंतु त्याचे ऑफिसातील वागणे चारचौघासारखे होते. त्यामुळे चिंता न करण्याचे आम्ही ठरविले.
आमची सुरुवात थोडी अडखळत झाली. काही सुरुवातीचे जॉब अबेंड (अयशस्वी) झाले. परंतु आम्ही त्यातील समस्या सोडवून पुढे मार्गक्रमणा सुरु ठेवली. मग IMS माहितीभांडार रूपांतरण करण्याची वेळ आली. कोट्यावधी रेकॉर्ड असलेले हे माहितीभांडार. ज्यावेळी त्याचे रूपांतरण करण्याचा क्षण येतो तेव्हा भलेभले तणावाखाली येतात. तुम्ही भले आधी कितीही परीक्षण केले असो, प्रोडक्शन ते प्रोडक्शन! तिथे डेटाच्या असंख्य शक्यता (combination) असतात. त्यातील काही जर परीक्षणात समाविष्ट झाल्या नसतील तर बोंब लागली म्हणून समजाच! अशा सगळ्या वाईट विचारांना बाजूला सारून आम्ही देवाचे नाव घेत हे जॉब सुरु करण्याची सूचना दिली. जसजसे हे जॉब व्यवस्थित धावू लागले तसतसा आमचा जीव भांड्यात पडला. हे जॉब एकूण अडीच तीन तास चालले. जॉब चालू असताना आम्ही काही फारसे करू शकणार नव्हतो.  मध्ये पिझ्झा येवून गेला. आमच्या मोठ्या डायरेक्टर बाईचे रात्री दोन वाजता  आगमन झाले. एकंदरीत काम व्यवस्थित चालल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पहाटे चारच्या सुमारास दुसऱ्या फळीचे आगमन झाले. त्यांना माहिती हस्तांतरित करून आम्ही निघालो. मला गॅरीने घरी सोडण्याची तयारी दर्शविली. काहीशा धाकधुकीतच मी त्याच्या गाडीत बसलो. त्याने सुखरूपपणे घरी सोडल्यावर मी देवाचे आभार मानले.
बाकी मग अंमलबजावणी यशस्वी झाली. सर्वत्र आमचे कौतुक वगैरे झाले.
०५ साली मी न्यू जर्सीला एका  भाड्याने कार देणाऱ्या कंपनीच्या संगणक विभागात दाखल झालो. बाकी काम तसे ठीक होते. अचानक एका निवांत संध्याकाळी विविध रेंटल स्टेशनच्या उत्पन्नाचे शहर, जिल्हा, विभाग ह्यानुसार वर्गीकरण करून माहिती साठविणारा डेटाबेस करप्ट झाल्याची चिन्हे दिसू लागली. ऑनलाईन आणि  बेच (हे नीट टाईप होत नाहीय) अशा दोन्ही प्रोसेस आचके देऊ लागल्या. हा उत्पन्न नोंद ठेवण्याचा डेटाबेस असल्याने ही नक्कीच आणीबाणीची वेळ होती. आम्ही सर्व एकत्र येऊन नक्की कोठे प्रश्न निर्माण झाला असावा ह्याचे विश्लेषण करू लागलो. अशा विश्लेषणात ही स्थिती टेस्ट रिजन मध्ये निर्माण करता येणे ही मोठी बाब असते. आमचा अमेरिकन व्यवस्थापक देखील आमच्या मागे येवून आम्ही काय करतो आहोत हे पाहू लागला. दुर्दैवाने आमचे सर्व अंदाज चुकत होते . त्या डेटाबेसमध्ये ही माहिती रात्रीच अपडेट होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे घरी जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे कंपनीचा VP सुद्धा येवून बसला. तो  मुळचा इंग्लिश. परंतु गेले वीस वर्षे अमेरिकेत ह्या कंपनीत होता. आणि सुरुवातीच्या दिवसात त्याने  ह्या आज्ञावलीवर काम केले होते. त्यामुळे तोसुद्धा आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन आम्हाला विविध प्रोग्रॅम उघडायला सांगू लागला. ह्या प्रोग्रॅमच्या ह्या पराग्राफमध्ये बघा वगैरे वगैरे. दुर्दैवाने ते ही उपयोगी पडत नव्हते. बाकी इंग्लिश आणि अमेरिकन लोकांचे संबंध सलोखा, जिव्हाळा ह्या सर्व संज्ञांना कोसभर दूर ठेवणारे. त्यामुळे आमचा व्यवस्थापक आणि हा VP ह्यांचे एकमेकाला चिमटे काढीतच होते. शेवटी मग  एक मोठा कॉल झाला आणि बेच प्रोसेस तशीच पुढे दामटवायचा निर्णय घेण्यात आला. मध्येमध्ये जॉब अबेंड करीत होता पण शेवटी आम्ही सकाळपर्यंत ती प्रोसेस संपविली.  आता डेटाबेस अधिकच भ्रष्ट झाला होता आणि  पुढील काही दिवस, आठवडे तो सुधारेपर्यंत देशभरातून येणाऱ्या चौकशीसत्राला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट होते. आणि झालेही तसेच! आणि हो रात्री अकराच्या सुमारास मागवलेला पिझ्झा खाण्याची सुद्धा फारशी इच्छा आम्हाला झाली नव्हती.
ह्याच कंपनीत रेंटल स्टेशनचे नंबर साठवणारा एक डेटाबेस होता. त्याची व्याख्या काहीशी चुकीची केली गेल्यामुळे तो एका वेळी मर्यादित नंबर साठवू ठेवू शकत असे. त्यामुळे दरवर्षी आम्ही न वापरात असलेले नंबर आणि त्यासंबंधीची माहिती उडवून टाकून तो नंबर नवीन ठिकाणच्या रेंटल स्टेशनला देत असू. हा नंबर खरोखरच वापरात नाही ह्याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा करीत असू. परंतु कधीतरी गोंधळ व्हायचाच! ही माहिती उडविण्याची प्रक्रिया संध्याकाळी ज्यावेळी डेटाबेस थोडी शांतता अनुभवत असेल अशा वेळी अमलात आणली जायची. अशाच एका डिसेंबर महिन्यातील थंडीच्या दिवशी आम्ही ही  प्रक्रिया संध्याकाळी सहाच्या सुमारास चालू केली. सुरुवातीला सारे काही आलबेल होते. सर्व काही नियोजनानुसार चालले होते. त्यामुळे आम्ही आठ वाजायच्या सुमारास घरी परतलो. सर्व रस्ते बर्फाच्छादित होते. पण नंतर मग अबेंड यायला सुरुवात झाली. अर्ध्या तासातच आम्हाला कळून चुकले की उडविलेल्या स्टेशनपैकी एक स्टेशन खास उपयोगातील होते. त्याचा बिसनेस काही वेगळ्या कारणासाठी उपयोग करायचे. हे उडविल्यामुळे बराच गोंधळ माजला. आम्ही आपापल्या गाड्या घेवून आठ मैलावरील ऑफिसात परतण्याचा निर्णय घेतला. शून्याखालील तापमानात रात्री दहा वाजता घराबाहेर पडणे हा नक्कीच आनंददायी अनुभव नव्हता. आणि गाडी जोरात पळविली तर जागोजागी दिसणाऱ्या पोलिसांचा धाक वाटत होता. ऑफिसात पोहोचल्यावर त्या स्टेशनला परत डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे उत्तर फारसे कठीण नसल्याचे जाणविले. तरीही ते उत्तर अंमलात आणण्यासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागल्या. त्या परवानग्या घेवून, त्या स्टेशनला समाविष्ट करून सर्व काही आलबेल होण्याची खात्री करेपर्यंत सकाळचे चार वाजले होते. यशस्वी होवून सकाळी घरी परतण्याचा आनंद काही औरच होता. मग दुसऱ्या दिवशी हे स्टेशन उडविण्याची ज्याने परवानगी दिली होती त्याचा आमच्या व्यवस्थापकाने व्यवस्थित समाचार घेतला!
अशा ह्या काही गमती जंमती! आपणास आवडल्या असाव्यात ही आशा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...