मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

शक्तिमान विरुद्ध बुद्धीजीवी


कधी मला प्रश्न पडतो की मनुष्यजातीने बनविलेल्या नियमांत कसकसे बदल होत गेले असतील आणि ते कसे विकसित होत गेले असतील. म्हणजे बघा ना प्रथम बळी तो कान पिळी असाच नियम असणार. असेच मानव सर्व स्त्रोतांवर अधिकार गाजवीत असतील. मग ते शिकार असो की जमीन असो. बाकीचे त्यांचा अधिकार मान्य करून, शक्तीमानाने आपला हक्क गाजविल्यावर उरलेसुरले जे काही मिळेल ते आपले भाग्य असे समजून जीवन कंठीत असतील. मग हळूहळू ह्या गांजलेल्या लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढू लागला असेल. त्यांना कळून चुकले असेल की आपण बहुसंख्य आहोत आणि शक्तिमान अल्पसंख्य आहेत. तसेच शक्तीमानाला सुद्धा कळून चुकले असेल की अहोरात्र शक्तीच्या जोरावर सत्ता गाजविणे कठीण आहे. एक गाफील क्षण सुद्धा आपल्याला महागात पडू शकतो.

तत्कालीन शक्तीमानांकडे बुद्धी कमी असावी, त्यामुळे बहुसंख्य बुद्धीजीवांनी आपल्याला अनुकूल अशी नियमावली बनविण्यात पुढाकार घेतला असावा. ही सर्व नियमावली बनवून अमलात आणल्यावर शक्तीमानांना एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. परंतु आता उशीर झाला होता. बुद्धीजीवांनी पोलीस, न्यायालये अशी सुरक्षा कवचे बनविली होती आणि शक्तीमानांचे पंख झटून टाकले होते. काही काळ असाच गेला. शक्तीमानांना बळाचा वापर करायच्या कमी संधी मिळत गेल्या परंतु थोडा मोकळा वेळ मिळाला. कधी नव्हे तो त्यांनी विचार करायला सुरुवात केली. उघड स्वरूपात कायदा हाती घेणे शक्य नाही हे सत्य त्यांनी स्वीकारले. मग त्यांनी शत्रू गटातील काही सीमारेषेवरील बुद्धीजीवांशी हातमिळवणी केली आणि कायद्यातील पळवाटा शोधून काढल्या. आता हे शक्तीमानांना कायद्याच्या कचाट्यात पकडणे कठीण जावू लागले. बुद्धीजीवी वर्ग सुद्धा पवित्र राहिला नाही त्यातील बहुसंख्याने शक्तीमानांचे कायद्याशी उघड शत्रुत्व पत्करता आपला स्वार्थ साधण्याचे धोरण स्वीकारले.

मनुष्यजातीत सदैव evolution होत राहिले आहे. शक्तिमान आणि बुद्धीजीविंचा संघर्ष चालूच आहे. सध्या म्हणायला गेले तर कायद्याचे राज्य आहे पण आतून शक्तीमानच राज्य गाजवितात. हीच वेळ आहे बुद्धीजीवींना मनन करण्याची आणि आपल्या डावपेचात बदल घडवून आणण्याची. पण बुद्धीजीवी वर्ग त्याच्या शुद्ध स्वरूपात अस्तित्वात राहिलाच नसेल तर?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...