मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

फ्लोरिडातील आक्रमक पक्षी ते बोरिवलीतील चिमणी घरटे



२००३ सालची गोष्ट. कंपनीने माझी फ्लोरिडात कामानिमित्त नेमणूक केली होती. मी सहकुटुंब गेलो होतो. अमेरिका हा देश तसा राहण्यासाठी उत्तम परंतु नव्याने जाऊन राहणाऱ्या माणसांना सुरवातीच्या कालावधीत काही कठीण गोष्टींचा मुकाबला करावा लागतो. जसे की क्रेडीट हिस्टरी नसल्याने क्रेडीट कार्ड न मिळणे, स्वतःचे घर लगेच मिळते परंतु ते पूर्णपणे रिकामी असणे वगैरे वगैरे. त्यात अजून एका बाबीचा समावेश करता येईल आणि ती म्हणजे स्वतःचे वाहन आणि लायसन्स मिळण्यास वेळ लागणे.


थोडे विषयांतर, अमेरिकेत एकोणीसशे साठ - सत्तरीच्या आसपास स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांच्या जीवनावर अपर्णा वेलणकर ह्यांचे एक सुंदर पुस्तक 'फोर हिअर ओर टू गो' हे मी माझ्या मित्राच्या शिफारसीमुळे वाचले. मध्यमवर्गातून आर्थिक अडचणीचा मुकाबला करणारी मराठी पिढी हिम्मत करून अमेरिकेत पोहोचते. कष्ट करण्यास बिलकुल मागे न पाहणाऱ्या ह्या पिढीच्या विविध यशोगाथा लेखिकेने समर्थपणे रेखाटल्या आहेत. ह्यात जसे नोकरीत यशस्वी झालेले लोक आहेत तसे व्यवसायातील सुद्धा. नियमाला अपवाद म्हणून अमेरिकेत व्यावसायिक दृष्ट्या अयशस्वी झालेल्या कुटुंबाची कथाही लेखिकेने वर्णिली आहे. मुले मोठी होतानाची ह्या पिढीचा मानसिक संघर्षही आपल्याला वाचायला मिळतो. लक्षात राहिली ती एका अत्यंत यशस्वी व्यावसायिकाच्या पत्नीने लेखिकेकडे व्यक्त केलेली खंत! सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात नवरा एकदम साधा, रसिक होता. परसदारी मोगरीचे रोप लावून पहिल्या घरात गृहप्रवेश करण्याइतका रसिक. पुढे मात्र तो हरवतच गेला तो त्याच्या स्वप्नात, आणि त्याच्या महत्वाकांक्षेत! हे सारे यश तर मिळाले परंतु माझ्यासाठी त्याला कधी वेळच मिळाला नाही. माझ्या मर्यादित वेगात मी मात्र तशीच राहिले. फरफटल्यासारखी त्याच्यामागे ओढली गेले. आता तो थोडा स्लो डाउन करतोय, घरात वेळ काढतोय परंतु आता आमच्या तारा का कोणास ठाऊक जुळतच नाहीयेत! बघा जमले तर पुस्तक मिळवून वाचा!


असो तर माझ्या अशा सुरुवातीच्या दिवसात मी बसने ऑफीसला जायचो. अमेरिकत बसने प्रवास करणारे लोक फार कमी. तर बस थांबा आणि ओफीस ह्यामध्ये काही अंतर होते. वेस्टन इथल्या ह्या ऑफीसच्या आसपास दाट झाडी होती. दुसर्याच दिवशी डोक्याच्या जवळून एक मोठा पक्षी (कावळ्याच्या दुप्पट आकाराचा) गेल्याचा भास झाला. योगायोगाने तो उडत गेला असेल अशी मी समजूत करून घेतली. दुसर्या दिवशीही तोच प्रकार. मग मी हळूच नव्याने ओळख होत असलेल्या सहकार्यांकडे हा विषय काढला. त्यावेळी एक आश्चर्यकारक सत्य पुढे आले हे पक्षी आपल्या विणीच्या मोसमात आपल्या लहान पिल्लांविषयी अत्यंत जागरूक असतात. रस्त्याने मनुष्य क्वचितच जात असल्याने त्यांना मनुष्यांची सवय नसते. त्यामुळे हे कधीतरी जाणारी माणसे आपल्या घरट्यावर हल्ला तर करणार नाहीत ना ह्या भीतीने ते माणसांवर हल्ला करतात. त्यानंतरचे अजून एक दोन आठवडे मी बसने प्रवास केला तेव्हा कधी लांबचे वळण घेवून तर कधी डोक्यावर छत्री घेवून मी दिवस काढले.


ह्यावर्षी बायको आणि मुलाने चिमणीघरटे आणून बोरिवलीच्या घरी बसवायचा हट्ट धरला. घरटे आणून बसविणार्या माणसाने आम्हास व्यवस्थित समजाविले. पावसाळ्यात चिमण्या काही ह्यात येणार नाहीत. पावसाळा संपल्यानंतर त्या बहुदा येतील. मुलगा बराच अधीर झाला. चिमण्या बर्याच वेळा घरट्यात डोकावून जायच्या पण नंतर काही दिवस गायब व्हायच्या. नाताळच्या सुट्टीत आम्ही बोरिवलीला नव्हतो आणि परत आल्यावर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. चिमण्यांचे एक पूर्ण कुटुंब (मुलाच्या भाषेत टकलू पिल्लांसाहित) वास्तव्यास आले होते. ह्या आठवड्यात मुंबईत पडलेल्या मस्त थंडीच्या अशाच एका प्रसन्न सकाळी आई बाबा चिमणीचा काढलेला हा फोटो.
http://3.bp.blogspot.com/-mXhLshkIlgk/UPvlyhTfnDI/AAAAAAAAANQ/GN2eDzUgZfw/s320/Sparrow.jpg


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...