मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

संवाद कला



मनुष्यजातीला संवादकला बऱ्याच काळापूर्वी अवगत झाली. संवादाचा मूळ हेतू दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी लागणाऱ्या एकमेकांच्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या गरजेशी निगडीत होता. सुरुवातीला प्राथमिक अवस्थेत असणारी ही संवादकला काही जणांनी मग अगदी चांगल्या प्रकारे पारंगत केली. एखादा ज्ञानी मनुष्य आणि संवादकला यांचा दुधशर्करा योग काही जणांत जुळून आला. अशा लोकांनी आपल्या विद्वत्तेने मोठ्या जनसमुदायास प्रभावित करण्याचे काम उत्तमरीत्या पार पाडले. पुढे काळ बदलला. ज्ञानी माणसांव्यतिरिक्त अजून काही जणांनी सुद्धा संवादकला हस्तगत केली. ह्यात दोन प्रकार आले, पहिल्या प्रकारातील लोकांनी संवादात गोडवा आणण्याची कला हस्तंगत केली. समोरच्या माणसाचे संवेदनशील मुद्दे ओळखून त्याभोवती त्यांना आवडेल असे संभाषण करून त्यांच्याकडून आपल्याला हवे तसे काम करून घेण्यात ह्या लोकांनी यश प्राप्त केले. समोरच्या माणसाला आपण यात फसले जातो हे कळूनसुद्धा आपली स्तुती करून घेण्याचा मोह अनावर होत असल्याने ती माणसे ह्या पहिल्या प्रकारातील माणसांकडे वारंवार जातात. दुसऱ्या प्रकारातील लोकांनी जड शब्दांचे जंजाळ उभे करण्याची कला पारंगत केली. समोरची माणसे ह्या माणसांच्या शब्दसामर्थ्याने दिपून जातात, आणि मग संभाषणाचा मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. त्यामुळे ही माणसे आपल्याला हवा असणारा मुद्दा मान्य करून घेत. संभाषण पूर्ण झाल्यानंतर काही काळाने समोरचा माणूस भानावर येतो आणि मग त्याला कळते की आपली काही प्रमाणात फसवणूक झाली आहे. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली असते. आता ही माणसे कालांतराने शहाणी होतात आणि ह्या दुसऱ्या प्रकारातील माणसांशी सावधपणे वागू लागतात. ह्या दोन्ही प्रकारातील माणसांपासून थोडे सावध राहून वागावयास हवे कारण ही माणसे कमी प्रयत्नांत यश प्राप्ती करू इच्छितात. ह्या दोन्ही प्रकारातील माणसांपैकी काही जण आपले हे चातुर्य घरापर्यंत घेवून येतात आणि मग सर्वांसाठी बिकट परिस्थिती निर्माण होते.
बाकी वैयक्तिक जीवनात आपण संवादाला हवे तितके महत्त्व देत नाहीत असे मला वाटते. पूर्वीच्या पिढीतील कुटुंबांमध्ये, बऱ्याच प्रमाणात पिता -पुत्र, पती-पत्नी ह्या नात्यांत संवादांची कमतरता आढळून येत असे. ह्यातील प्रभावी घटकाने (पती, पिता) आपल्या नात्याचा प्रभाव कायम राहावा म्हणून हा उपाय योजला असावा असे मला वाटते. कालांतराने कमी संवादाची जागा विसंवादाने घेतली. बाहेरच्या लोकांशी बोलताना / वागताना असणारा समजूतदारपणा घरातील लोकांशी मात्र गायब होताना काही व्यक्तींच्या बाबतीत दिसतो. सुसंवादात अडथळे आणणारे घटक म्हणजे कार्यालयीन काम, दूरदर्शन, माहिती मायाजाळ, मॉल इत्यादी इत्यादी.. ह्या पातळीवरील संवादासाठी आपल्या जवळच्या माणसासाठी खास वेळ काढण्याची इच्छा असणे हा प्रभावी घटक बनतो.
अजून एक पातळी असते ती मित्रांमधील संवादाची. ह्यातील काही जीवाभावाच्या मित्रांना सततच्या संवादाची गरज नसते. कितीही कालावधीनंतर ते एकमेकाला भेटले तरी लगेच पूर्वीइतक्या तन्मयतेने एकमेकांशी संवाद साधू शकतात. याउलट काही जीवाभावाचे मित्र केवळ दोघांनीही संवाद साधण्याचा प्रयत्न न केल्याने दुरावतात. तसाच एक विशेष संवाद पूर्वी असायचा तो दोन प्रियकारांमाधला जो नजरेच्या माध्यमातून चालायचा. कधीही न बोलता प्रेम केवळ नजरेतून व्यक्त केले जायचे. इंटरनेट आले आणि हे सर्व दुर्मिळ संवाद प्रकार एकदम नष्ट झाले.
संवादाच्या पुढील पातळीत एक कुटुंब हा एक एकक बनतो. मग दोन कुटुंबांमधील संवाद हा चर्चेचा मुद्दा बनतो. पूर्वी असलेले दोन कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध सध्या झपाट्याने कमी होताना दिसतात. ह्यात दुसऱ्याच्या वैयक्तिक जीवनात आपण अडथळा तर आणीत नाही आहोत नाही ना ही भिती प्राथमिक कारण असते. केवळ सुरुवातीचा पुढाकार न घेतल्याने हे संबंध प्रगत होत नाहीत. अशा पातळ्या पुढे वर वर जातात, एका समाजातील विविध कुटुंबांचा संवाद, दोन समाजातील संवाद, दोन राष्ट्रातील संवाद..एका विशिष्ट पातळीच्या पुढे संवाद राखण्यासाठी काही माणसांची नेमणूक केली जाते. अशा माणसांच्या कुशलतेवर त्या पातळीवरील ( उदा. दोन राष्ट्रांतील) संवादांची यशस्विता अवलंबून असते.
बाकी सर्व मनुष्यजात दोन प्रकारच्या संवादासाठी फार पूर्वीपासून प्रयत्नशील आहे.पहिला म्हणजे मनुष्य आणि सर्वशक्तिमान देव ह्यांतील संवाद आणि दुसरा म्हणजे मनुष्य आणि अंतरिक्षातील अजूनही न सापडलेल्या दुसऱ्या सजीवांशी संवाद! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...