मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

महाविद्यालयीन आवार मुलाखत (कॅम्पस इंटरव्यू)


आयुष्यातील अनुभवांची आणि त्या अनुभवाद्वारे मनात निर्माण होणाऱ्या भावनांची विविधता अफाट असते. आयुष्यात आपण विविध प्रसंगातून जात असतो. प्रत्येक प्रसंगात विविध भूमिका असतात. काही प्रसंग आपल्या आयुष्यात परत परत येतात, आपली भूमिका मात्र बदललेली असते. अशा वेळी मन सहजच मनातील आठवणींना शोधत बऱ्याच वर्षामागे जाते. अशीच एक आठवण कॅम्पस इंटरव्यूची!
कॅम्पस इंटरव्यू हा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील महत्वाच्या घटकापैकी एक! महत्त्वाचा कशासाठी बघायला गेले तर प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा! काहींना कौटुंबिक जबाबदारी पेलण्यासाठी लवकरात लवकर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे आवश्यक असते, काहींना आपल्या यशस्वी शैक्षणिक कारकीर्दीवर एखाद्या मोठ्या कंपनीच्या नोकरीच्या ऑफरची मोहर असणे आवश्यक वाटते. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा! काळाप्रमाणे ह्यातसुद्धा काही बदल घडून आले आहेत. पूर्वी ह्या मुलाखती देणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये असणारी नम्रतेची भावना हल्ली काहीशी ओसरली आहे. किंवा स्वतःला आत्मविश्वासपूर्ण दाखविण्याचा जो प्रयत्न केला जातो तो करताना नम्रता झाकली जात असावी. आत्मविश्वासाचे दोन प्रकार असतात. ज्ञानी, अभ्यासपूर्ण विद्यार्थ्याचा खराखुरा आत्मविश्वास आणि ज्ञानाचे पाठबळ नसतानाचा आणलेला आत्मविश्वासाचा आव! मुलाखत घेणाऱ्याला आपल्या अनुभवाच्या जोरावर ह्या दोन प्रकारातील फरक जाणून घेणे फारसे अवघड नसते.
एकंदरीत कॅम्पस इंटरव्यू बऱ्याच स्थितीतून जातो. सुरुवात होते ती कंपनीच्या स्वतःची माहिती देणाऱ्या सत्रापासून. बऱ्याचदा ह्यासाठी पॉवरपॉईट सादरीकरण केले जाते. मायक्रोसॉफ्टचे एक्सेल गणिती लोकांसाठी, वर्ड कवी-लेखकांसाठी तर पॉवरपॉईट जादुगार लोकांसाठी आहे असे कधीकधी मला वाटून जाते. समोरील श्रोते / प्रेक्षक वर्गाला भारावून टाकण्यासाठी पॉवरपॉईटचा वापर केला जातो. कंपनीने सादर केलेली ही माहिती पाहून बरेच जण भारावून जात असले तरी 'ह्यात माझ्यासाठी काय?  (what is in  it for me? ) असा प्रश्नसुद्धा काही जणांना पडतो. ह्यानंतर मुलाखत घेणाऱ्या गटाची ओळख करून देण्यात आली. मी ह्याच विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे हे कळल्यावर विद्यार्थांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
कंपनीच्या सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाते. ह्या लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी गुणांची विशिष्ट पात्रता असणे आवश्यक असते. लेखी परीक्षेत विविध विषयातील  (तांत्रिक, गणिती, बुद्धिमत्ता, भाषा) विषयातील विद्यार्थ्यांचे ज्ञान आजमावले जाते. ह्यात वेग आणि अचूकता ह्यांचे योग्य मिश्रण हा महत्त्वाचा घटक असतो.
लेखी परीक्षेनंतर त्याची तपासणी चालू असताना विद्यार्थ्यांना चार गटात विभागून त्यांना व्यवस्थापक गटांशी चर्चा करण्याची संधी देण्यात आली. ह्यात व्यावसायिक जगाविषयी अधिकाधिक माहिती मिळविण्याचे विद्यार्थांचे औत्सुक्य दिसून आले. काळानुसार विद्यार्थी अधिकाधिक धीट होत चालले आहेत हे ही जाणवले.
लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामुहिक चर्चेसाठी (group discussion) एकत्र बोलावण्यात आले. दोन्ही बाजूसाठी हा एक थोडा अधिक सावधानी बाळगण्याचा प्रसंग असतो. सहभागी होणार्याने मुद्देसूद, मोजके  बोलायला हवे आणि बोलताना दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि त्यांच्या मताचा आदरही केला पाहिजे. परीक्षकाने पहिल्या काही क्षणातच आपले मत बनवता कामा नये आणि दिलेल्या कालावधीत सर्व सहभागी उमेदवारांनी दिलेल्या परीक्षण घटकावर कशी कामगिरी बजाविली ह्याचे मुद्देसूद विश्लेषण करावयास हवे. स्मरणशक्ती पणाला लागते ह्या प्रसंगात!
मध्येच काही वेळ मोकळा मिळतो. महाविद्यालयाची चक्कर मारण्याची संधी मिळते. जुन्या आठवणीना उजाळा मिळतो. प्रत्येक वर्षाचा वर्ग, प्रात्यक्षिक वर्ग, रूप बदललेले कॅन्टीन - प्रत्येकाकडे अनेक प्रसंगाचा, अनेक मित्रांच्या आठवणीचा खजाना असतो. तो धबधब्यासारखा अंगावर येतो आणि त्या ओलाव्याने मन हळवे होते. 'दिल धुंडता है फिर वही फुरसत के रात दिन' ह्या गाण्याच्या ओळी सहजच ओठावर येतात.
माझे नशीब काहीसे कमजोर होते. माझ्या वेळचे प्रोफेसर कॉलेजात असूनही त्यांच्या आणि माझ्या वेळापत्रकाच्या जुळण्याने  त्यांना मी भेटू शकलो नाही.
निवडप्रक्रियेत प्रत्येक पातळीत काही विद्यार्थी बाद होत होते. शेवटच्या वैयक्तिक मुलाखतीसाठीची यादी तयार झाली. एका दीर्घ दिवसाच्या अंतिम भागात आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी बजाविण्यासाठी विद्यार्थी तयार होते. टेबलच्या  त्या बाजूला बसून घालविलेले पूर्वीचे दिवस आठविले. उमेदवाराला पूर्ण संधी देवून मुलाखत घेणे ही एक कला असते. प्रत्येक प्रश्न विचारताना हा प्रश्न आपल्याला अंतिम निर्णय घेण्यासाठी कसा मदत करील ह्याचे अवधान राखणे आवश्यक असतेउमेदवाराच्या बाह्यरुपावरून, त्याच्या बोलण्यातील  आत्मविश्वासावरून आधीच आपले मत बनविणे चुकीचे असते. उमेदवार सुरुवातीलाच कठीण प्रश्नाने किंवा असाही गांगरला तर त्याला सावरण्यासाठी मदतही करावी. तो जास्तच उड्डाण करू लागला तर त्याला जमिनीवर आणावेअसो शेवटी रात्री वाजता अंतिम यादी निवडण्यात आली.
अंतिम निर्णय जाहीर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एका कॉन्फरन्स रूम मध्ये बोलाविण्यात आले. चेहऱ्यावरील  उत्कंठेने परिसीमा गाठली होती. काही जणांनी ह्या कंपनीची स्वप्ने पाहिली होती. त्या स्वप्नपूर्तीचा / स्वप्नभंगाचा क्षण जवळ आला होता. एकेका यशस्वी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येवू लागले. निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. बाकीच्याचा तणाव वाढत होता. शेवटच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले गेले. दोन्ही गटातील काही विद्यार्थी डोळ्यात येऊ पाहणारे अश्रू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. परंतु अश्रू बडे बेरहम असतात. त्यांनी काही डोळ्यांना व्यापून टाकलेच! काही आनंदी अश्रू होते, ह्या नोकरीने आपल्याला दिलेल्या आपल्या कुटुंबाला मदत करण्याच्या क्षमतेमुळेतर काही दुःखी अश्रू होते, इतक्या उत्तम संधीच्या इतक्या जवळ येवूनसुद्धा वंचित राहिल्याने! आभारप्रदर्शनाचे दोन शब्द झाले! यशस्वी विद्यार्थी केव्हा एकदा ही बातमी आपल्या कुटुंबियांना सांगायला मिळते ह्याच्या प्रतीक्षेत होते! आणि बाकीचे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता येणाऱ्या दुसऱ्या एका कंपनीच्या  निवडप्रक्रियेची तयारीसाठी मानसिकदृष्ट्या कसे तयार व्हावे ह्याचा विचार करू लागले होते.
जगात काही क्षणी यशस्वी होणे किती सुदैवी असते नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...