मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

शीर्षक नाही!



आठवड्याच्या उत्तरार्धात सुट्टी घेतल्याने ब्लॉगचे प्रमाण वाढले आहे. ब्लॉगच एक बर असतं, शब्दमर्यादा नसते त्यामुळे एका परिच्छेदाचा देखील ब्लॉग होवू शकतो. आला मनात विचार की लिहिला ब्लॉग. विषयाचे पण बंधन नाही. अचानक एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारली तरी कोण काही शक्यतो बोलत नाही. आपलेच मागचे ब्लॉग वाचताना थोडी गंमत येते. आपल्या मनात असे विचार आले होते ह्याचे कधी कधी आश्चर्य वाटते. कधी आपण त्या विचारांशी सहमत होतो तर कधी नाही. कधी कधी पुनुरावृती आढळते! समजा प्रत्येकाने असा लहानपणापासून ब्लॉग लिहून ठेवला तर! आपले व्यक्तिमत्व कसं बदलत गेलं याचा आढावा घेता येईल नाही? व्यक्तिमत्व म्हणजे तरी काय? प्रत्येक माणसाकडे उपजत कौशल्य आणि स्वभाव असतात. माणसाला जे लौकिकार्थाने, व्यावहारिक प्रशिक्षण मिळते त्याने माणसाच्या कौशल्यात भर पडते. स्वभावाचा मूळ गाभा कधी बदलत नाही परंतु परिस्थिती कधी माणसाला स्वभावाला आवरण घालायला लावते तर कधी माणसाच्या एखाद्या पैलूला चौखूर उधळून देते. कौशल्याच्या पायावर उभारलेला तत्कालीन परिस्थितीनुसारचा माणसाच्या स्वभावाचा प्रभावशाली पैलू म्हणजे त्याचे तत्कालीन व्यक्तिमत्व! एखाद्या व्यक्तीच्या अशा सर्व तत्कालीन व्यक्तिमत्वांची आयुष्यभराची घेतलेली सरासरी म्हणजे त्या व्यक्तीचे एकंदरीत व्यक्तिमत्व! हल्ली माणस बदलतात! म्हणजे तशी ती पूर्वीपासून बदलायची पण हल्ली जरा जास्तच बदलतात! नोकरी - व्यवसायात माणसांना यश मिळायचे प्रमाण वाढलंय. यश मिळाले की माणसांना खूप बर वाटत. काहींना इतक बर वाटत की त्यातून कधी बाहेर येवू नये असे ते ठरवतात, मग ज्या वातावरणात आपल्याला हे यश विसरावे लागेल असे वातावरण, अशा व्यक्तींना ही माणसे टाळतात किंवा त्यांच्याशी वेगळ्या प्रकारे वागतात. पण कितीही केल तरी त्यांचे मूळ व्यक्तिमत्व बदललेले नसते. असा अनुभव आपल्याला आल्यास फारसं काही वाईट वाटून घेऊ नये. एवढ्या मोठ्या दुनियेत अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात. गावस्कर आणि अनेक माजी खेळाडू क्रिकेटचे समालोचन करतात. हे समालोचन सतत २-३ तास ऐकले की १-२ सुविचार कानी पडतात. सतत अपयशी ठरणाऱ्या फलंदाजाला, गोलंदाजाला गावस्कर नेहमी 'He should go back to Basics' असा सल्ला देतात. आयुष्यातील हा एक सर्वात धडा आहे. आपापल्या व्यवसायात लागणाऱ्या मुलभूत गोष्टी ओळखणे आणि त्या सातत्याने अचूकपणे करत राहणे हा यशाचा एक उपलब्ध मार्ग आहे. परंतु त्यासाठी संयम हवा. बाकी ह्या आठवड्यात सलमान १-२ चांगली वाक्य बोलला. तो म्हणाला हल्लीच्या कलावंतांपैकी हृतिक रोशन हा सर्वोत्तम नर्तक आहे पण त्याची नृत्याच्या स्टेप्स सर्वसामान्यांना झेपणाऱ्या नसतात. माझा बेल्ट पकडून केलेला नाच कोणालाही जमतो त्यामुळेच तो जास्त प्रसिद्ध होतो. तो अजून म्हणाला की मी हल्ली जितकी मेहनत करतो तितकीच काही काळापूर्वी सुद्धा करायचो पण तेव्हा मात्र माझे चित्रपट सतत आपटले. सध्या माझी वेळ चांगली आहे इतकेच! जबरदस्त वाक्य! आयुष्यात कोण किती यशस्वी होणार हे भाकीत करण्यासाठी कोणतं गणिती सूत्र नाही. वेळ कशीही असो आपापल्या मुलभूत गोष्टी सातत्याने करत राहा हेच खरे. चला आटपत घेतलं पाहिजे! कोणी काही बोलू शकत नाही म्हणून आपली फलंदाजी सुरूच ठेवायला आपण थोडेच सचिन तेंडूलकर आहोत!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...