मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

तपोवन

महर्षींचे राजदरबारी अचानक आगमन होताच सर्वांचीच धांदल उडाली. प्रधान प्रसंगावधान दाखवून पुढे सरसावले आणि त्यांनी महर्षींना सन्मानपूर्व त्यांच्या आसनाकडे नेले. महर्षींचा क्रोध काही शांत झाला नव्हता. नजरेनेच त्यांनी प्रधानांना महाराज कोठे आहेत अशी विचारणा केली. 'महाराजांचे आगमन आता होईलच', आपल्या स्वरात जमेल तितकी आश्वासकता आणण्याचा प्रयत्न करीत प्रधान उत्तरले. प्रधानांचे नशीब बलवत्तर होते. महर्षींचा क्रोध वाढण्याच्या आतच महाराज राजदरबारी प्रवेशते झाले. महाराजांनी महर्षींना विनम्र होवून प्रणाम केला. तोवर दासींनी थंडगार पेयाचा चषक महर्षींना आणून दिलाच होता. त्यामुळे महर्षीचा राग काहीसा निवळला होता.

'आम्ही अजूनही राजपुत्र सिद्धार्थच्या आश्रमातील आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत, ही प्रतीक्षा किती काळ चालू राहणार हाच प्रश्न विचारण्यासाठी आम्ही येथवर इतका दीर्घ प्रवास करून आलो आहोत' महर्षीनी थेट विषयाला हात घातला. महाराजांना एकंदरीत अंदाज आलाच होता. त्यांची स्थिती बिकट झाली होती. महाराज्ञी शर्मिष्ठा सिद्धार्थच्या आश्रमातील वास्तव्याच्या एकदम विरोधात होत्या. सिद्धार्थसारख्या तारुण्य ओतप्रोत भरलेल्या शूर राजकुमारास आश्रमात पाठवून त्याच्या मनात संभ्रम निर्माण होण्याच्या आपल्या मनातील शंकेस प्रत्यक्षात उतरलेले पाहण्यास त्या अजिबात तयार नव्हत्या. कधी एकदा विशीत पोहोचलेला सिद्धार्थ आपली मर्दुमकी रणांगणात दाखवून आपल्या साम्राज्याचा विस्तार करतो हे पाहण्यासाठी त्यांचे डोळे आसुसलेले होते.
महाराजांच्या मनातील हे विचारचक्र महर्षींच्या तीक्ष्ण नजरेने भेदले. 'विलंबाबद्दल क्षमस्व, महर्षी - येत्या पौर्णिमेला आम्ही स्वतः राजपुत्र सिद्धार्थला घेवून आपल्या आश्रमात दाखल होऊ' महाराज उत्तरले. आपण हे उत्तर कसल्या आधारावर देत आहोत हे त्यांचेच त्यांना माहित नव्हते. अगस्त्य महर्षी अंशुमत महाराजांच्या ह्या उत्तरावर एकदम खुश झाले. मग महर्षी आणि महाराजांची  राजकक्षातील चर्चा बराच काळ सुरु होती.

आश्रमात भावी राजास काही काळ प्रशिक्षणासाठी पाठविण्याची महाराज ह्यांच्या राजघराण्याची अनेक पिढ्या चालत आलेली परंपरा होती. सिद्धार्थनेसुद्धा ह्या परंपरेने जावे अशी अपेक्षा महाराजांनी करावी ह्यात वावगे असे काहीच नव्हते. पुढील सात आठ दिवस महाराज्ञी शर्मिष्ठा ह्यांना मनविण्यात महाराजांनी घालविले. सिद्धार्थ आश्रमात राहून परत आला की साम्राज्यविस्ताराची एक जंगी मोहीम काढायची असे आश्वासन घेवूनच महाराज्ञी शर्मिष्ठेने आपली परवानगी दिली.

सिद्धार्थने युद्धकलेत बरेच नैपुण्य संपादन केले होते. त्याचे हे कौशल्य अलौकिक आहे ह्याची ग्वाही जाणकार देत होते. सिद्धार्थ बराच समंजस होता. आश्रमात जाण्याची आपल्या पित्याची आज्ञा त्याने तत्काळ स्वीकारली.

मग तो दिवस उजाडला. समारंभपूर्वक अंशुमत महाराज आणि राजपुत्र सिद्धार्थ एका सजविलेल्या रथातून महर्षींच्या आश्रमाकडे निघाले. सर्व प्रजाजन आपल्या सद्य आणि भावी सम्राटाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते आणि ह्या रथावर पुष्पवृष्टी करीत होते.
रथाने आता नगर सोडले होते आणि घनदाट वनराईत प्रवेश केला होता. सूर्याच्या किरणांना भूमीवर पोहोचण्याची क्वचितच संधी मिळत होती. वन्य प्राण्यांचेही दर्शन अधून मधून होत होते. एकंदरीत सिद्धार्थला हे वातावरण खूपच भावले होते. 

सिद्धार्थ आणि अंशुमत ह्यांच्या रथाचे आश्रमात यथोचित स्वागत झाले. महर्षी अगस्त्य आणि शिष्यपरिवाराने महाराज अंशुमताना पुष्पमाला दिल्या. स्वागत स्वीकारून आणि घटकाभर आश्रमात थांबून महाराज परतीच्या प्रवासासाठी निघाले. एकदा रथात बसल्यावर त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिले नाही. त्यामुळे दुःखी झालेली सिद्धार्थची मुद्रा महर्षींच्या नजरेतून सुटली नाही.
एका मोठ्या पर्वतराजीच्या पायथ्याशी आश्रम वसविला होता. पर्वतातून खळखळत वाहत येणारी नदी आश्रमाचे सौदर्य खुलवीत होती. आजूबाजूच्या दाट वन्य वृक्ष आणि जीवसृष्टीमध्ये हा आश्रम अगदी कसा चपलखपणे बसला होता.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सिद्धार्थचा दिनक्रम सुरु झाला. थंडगार पाण्याने स्नान करणे त्याला जरा कठीणच गेले. त्यानंतर अगस्त्य महर्षींच्या जेष्ठ शिष्यगणांपैकी एकाने नवशिष्यांना अध्ययनकक्षात नेले. दिवसभर बऱ्यापैकी असाच क्रम सुरु राहिला. अध्ययन, आश्रमातील कामात हातभार लावणे, प्रार्थना, बौद्धिक चर्चा ह्यात दिवस कसा गेला हे सिद्धार्थला कळले सुद्धा नाही. सायंकाळी सर्वांना मोकळ्या मैदानात सोडण्यात आले तेव्हा कुठे सिद्धार्थ जरा खुश झाला.
तरुण सिद्धार्थ समंजस होता. ही दिनचर्या त्याच्या आवडीची नव्हती तरीही त्याने कधीच कुरबुर केली नाही. महालातील सुखदायी जीवनातून आश्रमातील खडतर जीवनाचा प्रवास स्वीकारण्याचा त्याने मनापासून प्रयत्न चालू ठेवला. परंतु मनातील वादळांना काही तो थोपवू शकत नव्हता. ही मनातील खळबळ कोणास बोलून दाखवावी हे त्याला समजत नव्हते.
मग एक दिवशी त्याला अचानक ही संधी मिळाली. सायंकाळी सिद्धार्थ शांतपणे एका डेरेदार वृक्षाखाली बसून समोरच खेळणाऱ्या सशांच्या पिल्लांच्या जोडीकडे पाहत बसला होता. महर्षी अचानक कधी मागे उभे राहिले हे त्याला कळलेच नाही. 'कसा आहे बाळ सिद्धार्थ!' महर्षी विचारते झाले. 'सर्व काही ठीक आहे, महर्षी' सिद्धार्थ उत्तरला. 'परंतु तुझ्या मुद्रेवरून तुझ्या मनात काही विचार चालू आहेत असे जाणवते' महर्षी म्हणाले. सिद्धार्थने क्षणभर विचार केला. 'काही चुकीचे बोललो तर माफ करा महर्षी' सिद्धार्थ म्हणाला. महर्षींच्या नजरेच्या संमतीने तो बोलता झाला 'एका बलवान साम्राज्याच्या भावी सम्राटाने आश्रमात राहून हे वेद, कला, शास्त्र ह्यातील प्रशिक्षण घेण्याचे प्रयोजन काय हे मला अजूनही पूर्णपणे समजत नाहीय' महर्षींच्या चेहऱ्यावरील काहीशी खुश झालेली मुद्रा पाहून सिद्धार्थने आपले बोलणे पुढे चालू ठेवलं. 'सम्राटाने कसे आक्रमक असावे, आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याची मनीषा सदैव त्याच्या मनात असावी. बाकी कोणत्याही क्षेत्रात त्याला सल्ला लागला तर दरबारातील मंडळी आहेतच! ह्या प्रशिक्षणाने जर सम्राटाने आपली आक्रमक मानसिकता गमावली तर मात्र मोठे नुकसान होईल' सिद्धार्थने आपल्या मनातील खळबळ एका दमात बोलून दाखविली आणि त्याला काहीसं बर वाटल.
महर्षी प्रसन्न झाले. 'सिद्धार्थ, खर आहे तुझे म्हणणे. सम्राट कसा आक्रमकच असावा! पण हे राज्य निर्माण करणार ते कोणासाठी? प्रजेसाठी ना? सम्राटाला प्रजेच्या  भावनांची जाणीव असावी. त्याला आपल्या दरबारी मंडळींची पारख करता यावी. त्याला स्वतःच्या मनातील भावनांना सांभाळता यावे. मनात येणाऱ्या भावना, विचार ह्यावर कोणाचेच नियंत्रण नसत, तसे ते सम्राटाचेही नसणार. परंतु सम्राटाला मनात आलेल्या भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही. प्रत्यक्ष कृती करताना त्याला आपल्या कृतीवर लाखो लोकांचे लक्ष असणार आहे, त्यातील बरेच लोक आपल्या कृतीचे अनुकरण करणार आहेत ह्याची जाणीव असावी. एका अर्थाने पुढील एक दोन पिढीचा मार्ग तू आखून देणार आहेस. मी कोणी विद्वान नव्हे. मी आहे केवळ एक साधन, परंपरेने चालत आलेलं ज्ञान, प्रजेपर्यंत पोहोचावे ह्यासाठी आखून दिलेल्या साखळीतील मी आहे एक दुवा! जोवर ही साखळी जमेल तोवर टिकवावी, त्यानंतर पुढे कसे काय घडेल ते प्रत्येक माणसाच्या सद्सदविवेकबुद्धीवर अवलंबून राहील! इतके बोलून महर्षी आपल्या कुटीच्या दिशेने चालू लागले. महर्षींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि त्यामागे दिसणाऱ्या मावळत्या सूर्यबिंबाकडे सिद्धार्थ बराच वेळ टक लावून पाहत होता.

महर्षीबरोबर झालेल्या चर्चेनंतर सुद्धा सिद्धार्थच्या मनातील विचारांचे वादळ काही शमले नव्हते. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याचे आपले कर्तव्य परिपूर्णपणे पार पाडण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता. कालचक्र तर पुढेच चालले होते. मनात कितीही इच्छा असली तरी ते आतापर्यंत कोणीही थांबवू शकले नव्हते. काही कालावधीनंतर अध्ययनात सिद्धार्थला गोडी वाटू लागली होती. वेद, श्लोक ह्यांचे पठण करताना तो मग्न होत होता. परंतु रात्रीच्या शांत वेळी मनातील शौर्याची खुमखुमी बाहेर येत असे.
महर्षीबरोबर सिद्धार्थ आणि शिष्यगणाचा थेट संवाद क्वचितच होत असे. प्रशिक्षणाची जबाबदारी ज्येष्ठ गुरुवर्गाकडे सोपविण्यात आली होती. गुरुवर्य आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आश्रमाच्या परिसरात राहत असत.
हिवाळ्याने एव्हाना आपला जम बसविला होता. महाकाय वृक्षांनी आपला पर्णसंभार गाळून टाकला होता. सिद्धार्थला हे वातावरण चांगलेच आवडले होते. महर्षीची परवानगी घेऊन संध्याकाळच्या मोकळ्या वेळात जंगलात जवळपास फेरफटका मारण्यास त्याने सुरुवात केली होती. त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना जंगलात जास्त आत जाण्यास परवानगी नव्हती. त्या भागात हिंस्त्र पशूंचा वावर असे.
अशाच एका संध्याकाळी सिद्धार्थ आपल्या मित्रांबरोबर सायंकाळच्या फेरफटक्याला निघण्याच्या तयारीत होता. अचानक जंगलातून एका तरुण स्त्रीचा 'वाचवा, वाचवा!' असा आक्रोश आश्रमापर्यंत ऐकू आला. क्षणभर काय करावे हे कोणालाच कळेना. तपाला बसलेल्या महर्षीना उठविण्याची कोणामध्ये हिम्मत नव्हती. इतक्यात धनुष्यबाण घेऊन बाहेर येणाऱ्या महर्षीना पाहून सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. 'सिद्धार्थ, हे धनुष्यबाण घे आणि त्या अबलेची सुटका कर!' महर्षीनी आज्ञा केली. क्षणाचाही विलंब न करता सिद्धार्थने  धनुष्यबाणासहित जंगलाच्या दिशेने सुसाट धाव घेतली.
जंगलात थोडे अंतर कापून जाताच सिद्धार्थला ते दृश्य दिसले. जेष्ठ गुरु भारद्वाज ह्यांची कन्या सीमंतिनी  एका वृक्षावर थरथर कापत बसली होती. आणि संतप्त वनराज सिंह त्या वृक्षाखाली फेऱ्या घालीत बसले होते. सिंहाची क्रुद्ध नजर सीमंतिनीवर रोखून होती. सिद्धार्थने आपला बाण धनुष्याला लावला आणि सिंहाच्या मस्तकाचा वेध घेतला. नेम अचूक होता आणि लक्ष्याच्या दिशेने वेगाने चालला होता. शेवटच्या क्षणी सिंहाने हालचाल केली व बाण त्याच्या बरगड्यात घुसला. अतिक्रुद्ध झालेल्या सिंहाचे लक्ष सिद्धार्थकडे गेले. त्या महाकाय वनराजाने सिद्धार्थ्च्या अंगावर झेप घेतली. अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने सिद्धार्थ थोडा गांगरला. परंतु राजघराण्यातील रक्त होते ते! आपल्या बलदंड बाहूंनी त्याने सिंहाचा जबडा घट्ट पकडून ठेवला. तोवर महर्षी आणि आश्रमवासी येउन पोहोचले होते. अचानक आलेल्या ह्या माणसाच्या गर्दीने वनराज विचलित झाले. सिद्धार्थच्या हातातील आपला जबडा सोडवून घेवून त्यांनी जंगलात प्रयाण केले.
सर्व आश्रमवासी सिद्धार्थाच्या चौकशीत / कौतुकात गुंतले. आपल्या पित्याच्या आश्वासक मिठीत विसावलेल्या  सतत सिद्धार्थवर खिळलेली सीमंतिनीची नजर पाहून महर्षी मात्र काहीसे चिंतीत झाले होते.  

वनराजाने मनुष्यांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ होती. आश्रमातील वातावरणात त्यामुळे थोडी खळबळ माजली होती. सीमंतिनीची चांगलीच हजेरी घेण्यात आली. सिद्धार्थ होता म्हणून वेळ निभावून गेली असे सर्वांचेच म्हणणे पडले.
इथे महाराज अंशुमताना काळजीने घेरून टाकले होते. दक्षिण सीमेवरील राजा शत्रुघ्न ह्याने सैन्याची जमवाजमव चालविली आहे अशा बातम्या हेरांनी आणल्या होत्या. शत्रुघ्न आणि अंशुमत ह्यांचे पूर्वापार वैर होते. काही काळापूर्वी अंशुमत ह्यांनी शत्रुघ्नचा पराभव केला होता. हा पराभव शत्रुघ्नच्या बराच जिव्हारी लागला होता. अंशुमत ह्याचे सामर्थ्य तसे जास्त होते, परंतु सुडाच्या भावनेने पेटलेला शत्रुघ्न आपल्याला बराच त्रासदायक ठरू शकतो ह्याची त्यांना जाणीव होती. आणि त्यातच युद्ध सुरु झाल्यास सिद्धार्थला परत बोलवा अशी भुणभुण शर्मिष्ठा ह्यांनी त्यांच्या मागे लावली होती.
राजा शत्रुघ्नचे हेर सर्वत्र पोहोचले होते. सिद्धार्थला आश्रमात ठेवण्यात आले आहे ही बातमीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. अगस्त्य महर्षींचा आश्रम तसा जंगलाच्या आतल्या भागात होता आणि तिथे जायच्या एकमेव रस्त्यावर अंशुमत राजाचे विश्वासू सैनिक पहारा ठेवून असायचे.
सीमंतिनीचा दिनक्रम ठरलेला असायचा. आपल्या मातेबरोबर पित्याची सर्व तयारी करून द्यावी. आश्रमातील पाकशाळेवर लक्ष ठेवून द्यायचे. आश्रमातील उद्यानाची सुद्धा तिने सुंदर काळजी घेतली होती. सर्व काही गोष्टी जागच्या जागी, वेळीच करण्यात तिची ख्याती होती. परंतु त्या घटनेनंतर तिचे लक्ष विचलित झाले होते. ती अधिकाधिक लक्ष आपल्या सख्यांबरोबर घालवू लागली होती.
भारद्वाज आणि त्यांचा शिष्यगण पठणानंतर अध्ययनकक्षातून बाहेर येत होता. अध्ययनकक्षातील चर्चा अजूनही चालूच होती. अचानक भारद्वाजांची मुद्रा गंभीर झाली. उद्यानातील सुकलेल्या लता पाहून ते गंभीर झाले. 'सीमंतिनी!' त्यांची ही क्रुद्ध स्वरातील हाक ऐकून वातावरण अचानक शांत झाले. सीमंतिनी धावतच बाहेर आली. पित्याची सुकलेल्या उद्यानावरील नजर तिला सर्व काही सांगून गेली. आणि तिथून निघताना शिष्यगणात असलेल्या सिद्धार्थाकडे पाहून तिला धरणीमाता दुभंगून आपल्याला पोटात घेईल  तर बरे होईल असे वाटून गेले.
सिद्धार्थचे आजवर सीमंतिनीकडे कधी लक्ष गेले नव्हते अगदी तिला सिंहाच्या तावडीतून सोडवून आणताना सुद्धा! पण आज आपल्या पित्याच्या क्रोधाने दुःखित झालेल्या सीमंतिनीला पाहून सिद्धार्थला वाईट वाटले. सिद्धार्थ क्षणभर तिच्याकडे पाहतच राहीला. श्वेतांबरा सीमंतिनीचे पिंगट केस हिवाळ्यातील शीतल वाऱ्यावर भुरभुरत होते. ह्या केसांच्या आडोश्याला आपले अश्रू लपविण्याचा त्या हरिणाक्षीचा प्रयत्न विफल ठरला होता. अचानक त्या दुःखमय डोळ्यांची आणि सिद्धार्थच्या आश्वासक नजरेची भेट झाली.
हळूहळू हिवाळा सरत आला होता. वसंत ऋतूच्या आगमनासाठी आश्रमात संगीत, नृत्य. नाट्य आणि साहित्य ह्यांच्या विविध कार्यक्रमाची तयारी जोमाने सुरु होती. सीमंतिनी आणि तिच्या सख्यांनी मिळून एका नृत्याचा कार्यक्रम बसविला होता. सिद्धार्थ मात्र आपल्या ध्येयावर अढळ निष्ठा ठेवून होता. महर्षी अगस्त्यशी त्याची वारंवार चर्चा होई. आपली आक्रमकता कायम राखून योग्य वेळी आश्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करावा ह्या निष्कर्षापर्यंत तो येऊन पोहोचला होता. त्यामुळे त्याच्या मनातील ह्या बाबतीतील वादळ काहीसे शमत चालले होते. परंतु आता एक नवीनच वादळ त्याच्या मनात निर्माण होत होते. सीमंतिनी! आश्रमात तिचे सिद्धार्थला वारंवार दर्शन होई. तिच्या विविध मुद्रा त्याला भावत होत्या. नृत्यसरावात मुख्य भूमिका अगदी सराईतपणे निभावणारी सीमंतिनी, एकदा - फक्त एकदाच उद्यानाच्या वृक्षवल्लींकडे दुर्लक्ष झालेला ओरडा अगदी मनाला लावून घेतलेली सीमंतिनी!, त्यानंतर उद्यानाचा जणू काही कायापालटच झाला होता, सर्व हरितसंपदा मोठ्या जोमाने बहरली होती. फुलांचा राजा गुलाबाची तर अनेक प्रकारची रोपे मोठ्या रुबाबात सर्वत्र बहरली होती. सीमंतिनीचा आश्रमातील वावर अगदी आत्मविश्वासपूर्व होता. जरी तिला शिष्यगणांबरोबर ज्ञानोपासना करण्याची संधी मिळाली नसली तरी पित्याच्या मुखाद्वारे येणारे ज्ञानाचे बोल ती आपल्या मनात पूर्णपणे साठवून ठेवीत असे.
आज शिष्यगणांची जरा धावपळच सुरु होती. सर्व आश्रम जरी वसंतोत्सवाच्या तयारीत मग्न असला तरी शिष्यगणाची आज तत्वज्ञानावर वादविवाद स्पर्धा होती. सर्व शिष्य अध्ययनकक्षात येऊन भारद्वाजांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत थांबले होते. परंतु भारद्वाजांची तब्येत आज काही ठीक नव्हती. त्यांनी तसा निरोप घेऊन सीमंतिनीस अध्ययनकक्षात पाठविले. ज्येष्ठताक्रमातील द्वितीय क्रमांकाच्या गुरुंनी हा निरोप स्वीकारला. ते परीक्षा तर घेवू शकणार होते, परंतु त्यांना सहायकाची गरज लागणार होती. जाण्यासाठी त्यांच्या परवानगीची वाट पाहत असलेल्या  सीमंतिनीकडे त्याचं लक्ष गेले. 'सीमंतिनी, तू माझी मदत करशील? ते विचारते झाले. द्विधा मनःस्थितीत असलेल्या सीमंतिनीने नजरेच्या एका कोपऱ्यातून सिद्धार्थकडे नजर टाकली. त्याच्या नजरेतील अस्पष्टसा होकार तिला पूर्ण कळला. 'हो, गुरुवर्य', आपले हे उत्तर आपणच दिले का ह्याचा प्रश्न सीमंतिनीला पडला.
मनुष्याचे कर्तव्य आणि त्यापासून त्याला रोखणारा मोह असाच काहीसा चर्चेचा विषय होता. सर्व शिष्य साधारणतः एकाच प्रकारचे विचार मांडीत होते. मनावर नियंत्रण ठेवून कर्तव्य पार पाडावे असा एकंदरीत त्यांच्या विचाराचा कल होता. इतका वेळ शांत असलेला सिद्धार्थ अचानक बोलता झाला, 'कर्तव्याची व्याख्या ठरविली कोणी?, केवळ आपल्या आधीच्या काळात जन्मले म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितलेली कर्तव्याची व्याख्या जशीच्या तशी स्वीकारून आपण आपल्या विकासाच्या सीमा संकुचित करीत आहोत!' त्याच्या तोंडून सीमा हा शब्द ऐकताच सीमंतिनी काहीशी सुखावली. जणू काही त्याने तिचेच नाव घेतले होते. गुरु काहीसे बावरले. शिष्यगणाकडून असला काही प्रश्न विचारला जाईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. त्यांची विचारग्रस्त मुद्रा सीमंतिनीच्या लक्षात आली. सहायकाला आता धावून जाणे भाग होते. 'कर्तव्याची व्याख्या काही अखंड कायम राहणार नाही. ह्या भूतलावर जसे विद्वान जन्माला येतील ते आपापल्या मतिनुसर ह्या कर्तव्याच्या व्याख्येत सुधारणा करतील. ज्याचे विचार काळाच्या, जनमानसाच्या परीक्षणाच्या कसोटीवर पारखून निघतील तेच विचार कायम टिकतील!' सीमंतिनीच्या मुखातील हे उद्गार ऐकून तिच्यासकट सर्व अध्ययनकक्ष आश्चर्यचकित झाला. ह्या सौंदर्यवतीला बुद्धीची सुद्धा देणगी लाभली आहे तर! सिद्धार्थ विचार करता झाला.
पहाटेची प्रसन्न वेळ होती. महाराज अंशुमत ह्यांची निद्रा पक्षांच्या मधुर किलबिलाटाने खंडित झाली. शयनगृहातील गवाक्षातून बाहेर दिसणाऱ्या ह्या प्रसन्न वातावरणाचा महाराज आनंद घेत असताना अचानक त्यांना बाहेर काहीशी गडबड ऐकू आली. महाराज तात्काळ बाहेर आले. अमात्य, सेनापती आणि खाशी मंडळी एकत्र जमली होती  काही वेळापूर्वीच खबर आली होती. शत्रुघ्न राजाने दक्षिण सीमेवरून हल्ला केला होता आणि तो राज्यात बराच खोलवर घुसला होता.
महाराजांनी सेनापतीबरोबर विचारविनिमय तत्काळ आटपला. आणि लगेचच खुद्द महाराज अंशुमत, सेनापती आणि सेना दक्षिण दिशेने कूच करू लागली. सेनापतींनी पाठविलेले निरोप एव्हाना राज्याच्या दुसऱ्या भागात असलेल्या सैन्यापर्यंत सुद्धा पोहोचले होते. इतर भागातील वीरसैनिक सुद्धा दक्षिण सीमेवर येवू लागले होते. खासे अश्वदल वाऱ्याशी स्पर्धा करीत पुढे चालले होते. महाराजांच्या डोळ्यातून युद्धज्वर ओतप्रोत भरला होता. मार्गातील प्रजा आपल्या पराक्रमी राजाचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवीत होती.
मध्यान्हीपर्यंत सेनेने बरीच मजल मारली होती. मनात शत्रूचा तत्काळ विनाश करण्याची तीव्र इच्छा असली तरी पोटातील भुकेकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. मार्गातील वनात मिळणाऱ्या फळांवर भूक भागवून आणि दाट जंगलात वाहणाऱ्या सरितेचे मधुर पाणी प्राशन करून सेना पुढे निघाली. तोवर नैऋत्य दिशेने आलेले गजदल सेनेला येवून मिळाले त्यामुळे सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले.
थोडे अंतर पुढे गेल्यावर धुळीचा मोठा लोळ आणि अश्व, गज ह्यांच्या चीत्काराचे आवाज ऐकू येवू लागले. महाराजाच्या अंगात नवीन स्फुरण शिरले. आपला रथ थेट त्या दिशेने घुसविण्याची त्यांनी आज्ञा दिली. सेनापतींनी त्यांना रोखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. रणांगणावरील परिस्थिती माहित नसताना महाराजांनी स्वतः थेट शिरू नये असे त्यांचे म्हणणे होते. परंतु महाराजांच्या अंगी समरज्वर पुरेपूर उतरला होता. सेनापतींचे म्हणणे धुडकावून लावून ते रणांगणात प्रवेश करते झाले. सेनापतींनी सद्य परिस्थितीत उपलब्ध उत्तम पर्याय म्हणून स्वतः आणि निष्णात योद्ध्यांचे कडे महाराजांभोवती निर्माण केले.
महाराजांची आधीची तुटपुंजी सेना शत्रूशी लढता लढता मेटाकुटीस आली होती. संख्येने शत्रू बराच प्रबळ होता. परंतु दस्तुरखुद्द महाराजांचे रणांगणात आगमन होताच सर्वांनाच नवा जोश आला. महाराजांनी शत्रूच्या आघाडीच्या फळीवर बाणांचा जोरदार वर्षाव केला. महाराजांच्या भात्यातील बाणांचे वैविध्य आणि वेगाचा मुकाबला करणे शत्रूला कठीण जावू लागले. महाराजांची सेना कौतुकाने आपल्या राजाचा हा पराक्रम पाहत होती. महाराजांच्या ह्या मर्दुमकीने शत्रूची आघाडीची फळी विस्कळीत झाली. त्यात निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा उठवीत महाराज आणि खासे दल आत शिरले.
अचानक झालेल्या ह्या करारी हल्ल्याने शत्रुघ्न राजा अवाक झाला होता. अंगी कुटिलता असली तरी उसने शौर्य तो आणू शकत नव्हता. एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेवून पलायन करण्याची तयारी त्याने केली आणि रथ मागे घेण्याचा आदेश दिला. शत्रुघ्नाचा परतीच्या दिशेने निघालेला ध्वजधारी रथ पाहून महाराज अंशुमत खवळले. त्यांनी भर रणांगणातून रथ शत्रुघ्नच्या दिशेने घुसविला. महाराजांचे बाण शत्रुघ्नच्या रथाला भेदून जाऊ लागले. ह्या सर्व गोंधळात महाराजांभोवतीचे सरंक्षक कवच काहीसे विभागले गेले. शत्रुघ्नचा सेनापतीने ही संधी साधली आणि त्या कपटी माणसाने युद्धातील सर्व नियम धुडकावून महाराजांच्या मस्तकाच्या दिशेने बाण सोडला. सर्व लक्ष शत्रुघ्नकडे एकवटलेल्या महाराजांच्या नजरेने आपल्या दिशेने येणाऱ्या बाणाला टिपले तोवर  खूप उशीर झाला होता. आणि …. एक महान योद्धा कपटी सेनापतीच्या बाणाने धारातीर्थी पडला!!


अचानक युद्धाचे फासे पलटले. महाराज धारातीर्थी पडले हे पाहताच त्यांची सेना एकदम बावरली. सेनापतींना सुद्धा हा मोठा धक्का होता. परंतु अशा परिस्थितीत आपल्यालाच धीराने वागले पाहिजे हे ते चांगले जाणून होते. आपल्या भावनांचा लगेचच ताबा घेवून त्यांनी आक्रमण चालूच ठेवले. 'महाराजांचा जय असो' अशी जोराने गर्जना करून ते शत्रुघ्नाच्या दिशेने चालून गेले. आता मात्र सेना मोठ्या त्वेषाने शत्रूवर तुटून पडली. आता मात्र शत्रुघ्न आणि सेनेचे उरलेसुरले अवसान गळून पडले. ज्यांना जमेल त्यांनी आपला जीव वाचवत काढता पाय घेतला. शत्रू दिसेनासा झाल्यावर मात्र सेनापतींनी आपल्या भावनांचे बंध मोकळे केले आणि मोठ्याने हंबरडा फोडला.
महाराजाच्या वीरगतीची बातमी एका कधी न भरून येणाऱ्या आघातासारखी राजवाड्यात पोहोचली. आणि ही बातमी घेवून ज्यावेळी दूत आश्रमात पोहोचला तेव्हा महर्षी अगस्त्यसारखा स्थितप्रज्ञ योगीसुद्धा सुन्न होवून बसला.

महर्षी अगस्त्य ह्यांनी सिद्धार्थला कुटीत बोलावले. 'बाळ, तुला एक दुःखद बातमी सांगायची आहे मला! महाराज अंशुमत ह्यांना रणांगणावर वीरगती प्राप्त झाली, तुला तत्काळ राजधानीसाठी प्रयाण करावे लागणार आहे.' अगस्त्य ह्यांनी मोजक्या शब्दात ही बातमी सिद्धार्थला सांगून टाकली. सिद्धार्थच्या मनात भावनांचा कल्लोळ उठला. पित्याच्या अकस्मात वियोगाचे मणांमणाचे ओझे त्याच्या मनावर दाटले. त्याच वेळी आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीची जाणीवही त्याला झाली. डोळ्यांत येऊ पाहणाऱ्या अश्रूंना त्याने मोकळी वाट करून दिली. आता भूतलावर फार कमी लोक होते ज्यांच्यासमोर आपले अश्रू बाहेर येऊ देण्याची मुभा त्याला होती.
आश्रमावर दुःखाची छाया पसरली होती. आपल्या लाडक्या राजाच्या मृत्यूचे दुःख तर होतेच आणि त्याचबरोबर सर्वांचा लाडका सिद्धार्थ आश्रम सोडून जाणार त्याचेही दुःख होते. सीमंतिनीची भिरभिरती नजर सिद्धार्थचा शोध घेत होती. सिद्धार्थला घेवून जाण्यासाठी खास रथ आणि सैनिकाचे एक खासे पथक आले होते.
काही केले तरी सिद्धार्थ भावी राजा होता. अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता त्याच्यात कोठेतरी दडली होती ती आता प्रकट झाली होती. त्याने काही क्षणातच आपले अश्रू आवरले आणि महर्षींचा आशीर्वाद घेतला. 'तुझ्यासमोर उभा असलेला आव्हानांचा पर्वत पार करण्याची क्षमता तू बाळगून आहेस, स्वतःवर विश्वास ठेव, यशस्वी भव!' महर्षी उद्गारले. महर्षी आणि सिद्धार्थ बाहेर आले तोवर सिद्धार्थचा रथ तयार होता. सर्व आश्रमवासी निरोप देण्यासाठी रांगेने उभे होते. एका क्षणात सर्व नाती बदलली होती. आता आपल्या भावी राजाला निरोप देणारी ही प्रजा असे चित्र होते. सर्वांचा निरोप घेत घेत सिद्धार्थ सीमंतिनीपाशी आला. एका नुकत्याच उमलू लागलेल्या नात्यात मोठे वादळ आले होते. 'मी तुमची वाट पाहीन' केवळ सिद्धार्थला ऐकू जाईल असा आटोकाट प्रयत्न करीत सीमंतिनी पुटपुटली. त्या दोघांतील शब्दाद्वारे झालेला हा पहिलाच संवाद होता. आणि अशा ह्या पहिल्याच संवादात आयुष्यभराची साथ निभावण्याचे आश्वासन देणारे हे शब्द उद्गारण्याचे धारिष्ट्य आपल्यात कोठून आले हे सीमंतिनीला काही कळले नाही. सिद्धार्थ आश्चर्यचकित झाला. परंतु आपल्या मनीचा भाव बोलून दाखविण्याची हे वेळ नव्हती. केवळ नजरेतून आश्वासन देण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. सीमंतिनीचे वाक्य आणि सिद्धार्थची आश्वासक नजर केवळ त्या दोघातच राहिली नव्हती. सिद्धार्थच्या मागून येणाऱ्या, एका सेनानायकाने हे एक मोठे गुपित टिपले होते.
मध्यरात्रीच्या आसपास सिद्धार्थचे राजमहालात आगमन झाले. महाराज अंशुमत ह्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रजेचा महापूर लोटला होता. सिद्धार्थचे आगमन होताच त्याला थेट तिथेच नेण्यात आले. सिद्धार्थची धीरगंभीर मुद्रा पाहून प्रजेला धीर आला. पित्याच्या निष्प्राण देहाजवळ उभ्या असलेल्या सिद्धार्थने मनोमनी हा सर्व भार सांभाळण्याचे बळ देण्याचा आशीर्वाद मागितला. आपल्या बालपणापासून आपल्याला जपणाऱ्या आणि आपले सर्व हट्ट पुरविणाऱ्या आपल्या लाडक्या पित्याची असंख्य रूपे सिद्धार्थच्या डोळ्यासमोर तरळून गेली. आपला पिता जरी शरीराने आपल्याला ह्यापुढे दिसणार नसला तरी अदृश्यपणे आपल्या आसपासच असेल अशी समजूत करून सिद्धार्थ आपल्या शोकव्याकूळ मातेची भेट घेण्यासाठी निघाला.
दुसऱ्या दिवशी महाराज अंशुमत ह्यांना अंतिम निरोप देण्यात आला. प्रजेला दुःख अनावर झाले होते. त्यानंतर शोकाचा पंधरवडा आला. सेनापतीना शोक करण्याची सुद्धा संधी नव्हती. आता कुठेच काही उणीव ठेवून चालणार नव्हते. त्यांनी सर्व सीमेवर सेनेचा चोख बंदोबस्त ठेवण्याची तजवीज केली होती. प्रधानांनी राज्यकारभार सुरळीत चालेल ह्याची तजवीज केली होती.
शोकाचा कालावधी संपल्यावर राजपुरोहित, प्रधान, सेनापती, महर्षी आणि शर्मिष्ठा ह्यांची एक बैठक झाली. राज्याला जास्त काळ राजाशिवाय ठेवून चालणार नव्हते. येणाऱ्या शुक्लपक्षातील एक शुभमुहूर्त सिद्धार्थच्या राज्याभिषेकासाठी निवडण्यात आला. बैठकीत ह्या राज्याभिषेकाच्या सर्व तयारीची आखणी करण्यात आली. सिद्धार्थला अजून काही प्रशिक्षणाची गरज असल्यास तेही देण्याची तजवीज करण्यात आली.
एकंदरीत दुःखाचे वातावरण आधी कर्तव्यभावनेकडे आणि त्यानंतर काहीशा उत्सुकतेच्या दिशेने बदलू लागले होते. राजमहालातील वर्दळ आता वेगाने वाढू लागली होती. अशा वातावरणात एके दिवशी सकाळी मुख्य हेरांचे राजमहालात आगमन झाले. शत्रुघ्नच्या नवीन कटाची त्यांनी बातमी आणली होती. महाराज अंशुमत ह्यांनी आतापर्यंत सर्व शत्रूंना आपल्या धाकात ठेवले होते. अशा सर्व पराभूत राजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न शत्रुघ्नने चालविला होता. आणि दुर्दैवाने त्यात त्याला यशही मिळत चालले होते. आतापर्यंत पाच राजे ह्या कुटील आघाडीत सामील झाले होते आणि आता शत्रुघ्न राजा प्रद्युतला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होता. आतापर्यंतच्या पाच राजांविषयी काही काळजी करण्याचे कारण नव्हते परंतु प्रद्युत सामर्थ्यवान राजा होता. त्याला ह्या कुटील कारस्थानात सामील होवून देण्याआधी हालचाल करणे आवश्यक होते आणि त्यामुळेच मुख्य हेर तातडीने राजधानीत हजर झाले होते. 

राज्याभिषेकाच्या धावपळीत हे नवीनच प्रकरण उद्भवले होते. राजा प्रद्द्युतला कसे आपल्या बाजूला वळवावे ह्यासाठी सुकाणू (हा आधुनिक मराठी राजकारणातील शब्द इथे चपलख बसत नाही हे मान्य!) समितीची लगोलग बैठक बोलावण्यात आली. राजा प्रद्द्युत आणि महाराज अंशुमत ह्यांचे काही काळापूर्वी घनिष्ट संबंध होते. परंतु मधल्या काळात काही गैरसमजामुळे ह्या संबंधात थोडा तणाव आला होता. आता हे गैरसमज दूर करणे आवश्यक होते. राजा प्रद्द्युत ह्यांना सिद्धार्थच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्याचे ठरविण्यात आले. राजा प्रद्द्युत राजनगरीत आल्यावर त्यांच्याशी विस्तृत चर्चा करून त्यांना आपल्या बाजूने वळवावे असा निर्णय घेण्यात आला. लगेचच मध्यान्हीच्या सुमारास शाही नजराणा घेवून एक खास पथक राजा प्रद्द्युतच्या राजधानीकडे निघाले सुद्धा!
राजा प्रद्द्युत भोवती शत्रुघ्न आणि कंपूने आपले जाळे विणण्यास सुरुवात केलीच होती. परंतु राजा प्रद्द्युत काही फारसा अनुकूल प्रतिसाद देत नव्हता. शेवटी शत्रुघ्नने आपला हुकुमी एक्का बाहेर काढला होता. अंशुमतच्या साम्राज्याचा पाडाव करण्यात यश आल्यास त्यातील तीन चतुर्थांश साम्राज्य राजा प्रद्द्युतच्या राज्यात सामील करण्यात येईल असा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव अगदीच फलदायी होता आणि राजा प्रद्द्युतला तो नाकारणे कठीण वाटू लागले होते. आपल्या राज्याचा इतका विस्तार झाल्यास आपल्यास महाराज ही उपाधी मिळण्यास काहीच विलंब लागणार नाही ह्याची त्यांना खात्री वाटू लागली. मनीची सुप्त इच्छा पूर्ण होण्याची संधी अशी अचानक उभी ठाकल्यामुळे ती स्वीकारावी असेच त्यांना मनोमन वाटू लागले होते.
'राजे, महाराज अंशुमतच्या नगरीतून एका पथकाचे आगमन झाले आहे.', दासीच्या ह्या उद्गाराने राजा प्रद्द्युत ह्यांचे विचारचक्र खंडित झाले. पथकाचे यथोचित स्वागत करण्यात आले. काही वेळाने राजा प्रद्द्युत आणि आणि पथकाची भेट झाली. पंडित मंदार ह्यांनी राजा प्रद्द्युत आणि महाराज अंशुमत ह्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यातील काही भेटींच्या वेळी पंडितही हजर होते. त्यामुळे त्यांनी वर्णन केलेल्या आठवणींनी राजा प्रद्द्युत जुन्या काळात पोहोचले. त्यानंतर भेट देण्यात आलेला एक मौल्यवान हिरेजडीत हार राजांच्या कलाकार मन सुखावून गेला. इतक्या सर्व आनंदी वातावरणात राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे  निमंत्रण स्वीकारणे ही केवळ औपचारिकता राहिली होती. ती राजा प्रद्द्युत ह्यांनी लगेचच पार पाडली.
काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरे! महिन्यापूर्वी शोकाकुल झालेल्या राजनगरीत आज अगदी उत्साहाचे वातावरण होते. महाराज्ञी शर्मिष्ठा ह्यांनी सर्व भावना बाजूला ठेवून ह्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात कुठलीच कमतरता राहणार नाही ह्याची जातीने दखल घेतली होती. राजमहालावर सुगंधी फुलांची तोरणे लावण्यात आली होती. रात्रीच्या वेळी सर्व राजमहाल सुरेख दिव्यांनी उजळून निघाला होता. नगरीतील सर्व रस्ते सुशोभित करण्यात आले होते. संगीत, नृत्याचे कार्यक्रम दोन दिवस आधीच सुरु झाले होते. सर्व प्रजेने सुद्धा नववस्त्रे परिधान केली होती. घरांवर तोरणे लावली होती. ह्या समारंभाचे मुख्य आकर्षणबिंदू असलेला सिद्धार्थ मात्र काहीसा निर्मोह वृत्तीने ह्या सर्व धावपळीकडे पाहत होता. राजा प्रद्द्युत आपल्या राणी आणि खास मंडळीसमवेत राजनगरीत आगमन करिता झाला. त्याच्या स्वागतात कोणतीही कसूर ठेवण्यात आली नव्हती.
राज्याभिषेकाचा सोहळा अगदी दृष्ट लागण्याजोगा झाला. राजबिंड्या सिद्धार्थला राज्याभिषेक होताना पाहून महाराज्ञी शर्मिष्ठाच नव्हे तर सर्व प्रजेच्याच डोळ्यात एकाच वेळी आनंदाश्रू आणि दुःखाश्रू उभे राहिले. साम्राज्याला अधिपती मिळाला होता. महर्षी अगस्त्यसुद्धा ह्या सोहळ्यास हजर होते. अजून एक मन राजनगरीत होते आणि बऱ्याच अंतरावर अडकलेल्या कायेतून ते सिद्धार्थच्या सुखी भवितव्याची प्रार्थना करीत होते. राजा प्रद्द्युत आणि राणी आश्लेषा ह्या समारंभात अगदी गुंगून गेले होते. दोघांच्या मनात एकच विचार घोळत होता आणि तो बोलून दाखविण्याच्या संधीची ते दोघे वाट पाहत होते. शेवटी एकदाची संधी मिळताच राणी आश्लेषा बोलत्या झाल्या, " राजकुमारी कालिंदी ह्या साम्राज्याची राणी बनावी अशी मनोमन इच्छा माझ्या मनी उत्पन्न झाली आहे!"

राज्याभिषेकाची धांदल पुढील दोन दिवस पुरली. तिसऱ्या दिवशी मात्र राजमाता शर्मिष्ठा ह्यांनी राजा प्रद्द्युत ह्यांना बैठकीस बोलावले. राजा सिद्धार्थ, सेनापती आणि प्रधान राजमहालाच्या खास दालनात बसून राजा प्रद्द्युत ह्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते. सेवकांची चाहूल लागली आणि राजा प्रद्द्युत ह्यांचे आगमन झाले.  ते एकटे नव्हते त्यांच्याबरोबर राणी आश्लेषा ह्याही होत्या. राणी आश्लेषा ह्यांची ह्या बैठकीतील उपस्थिती काहीशी अनपेक्षित आणि शिष्टाचाराला अनुसरून नव्हते. मंडळींच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आठ्या पाहून राजमातेने त्यांना नजरेनेच शांत राहण्यासाठी खुणावले. शिष्टाचाराची चैन परवडण्याची ही योग्य वेळ नव्हे हे त्या पक्के जाणून होत्या.
चर्चेस सुरुवात झाली. राजा प्रद्द्युत ह्यांच्यासमोर संधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परस्परांच्या राज्यावर आक्रमण न करणे आणि कोणा एकाच्या राज्यावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतीस धावून येणे असे ह्या संधीचे स्वरूप होते. सद्यपरिस्थिती ध्यानात घेता, राजा प्रद्द्युत ह्यांना दर वर्षी पाच सहस्त्र सुवर्णमुद्रा सुद्धा देण्यात येणार होत्या. राजा प्रद्द्युत ह्यांची खुललेली मुद्रा सर्वांच्या लक्षात सुद्धा आली. ते उत्तर देण्यास सुरुवात करणार इतक्यात राणी आश्लेषा ह्यांनी त्यांना नजरेनेच थांबविले. त्यांच्या ह्या खुणेचा अर्थ राजा प्रद्द्युत ह्यांना समजला. "हा प्रस्ताव आम्हाला मंजूर नाही", राजा प्रद्द्युत ह्यांचे हे उद्गार सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देवून गेले. प्रधानांनी तरीही प्रयत्न करून पाहिला. परंतु एकंदरीत परिस्थितीत काही फरक पडला नाही.
बैठक संपली आणि मंडळी दालनातून बाहेर निघण्यासाठी निघाली. "आम्हांला तुमच्याशी काही खाजगीत बोलायचे आहे", राणी आश्लेषा राजमाता शर्मिष्ठा ह्यांना म्हणाल्या. सर्व मंडळी बाहेर पडल्याची खात्री झाल्यावर त्या राजमातेला म्हणाल्या "ह्या प्रस्तावाची गरजच काय? ह्या दोन राजघराण्यांचे नातेसंबंध जुळावेत अशीच आमची इच्छा आहे". राजमातेला हे ऐकून काहीसा धक्का बसला. सिद्धार्थचे इतक्यात विवाहाचे वय झाले नाही असेच त्याचं मत होते. पण एकंदरीत परिस्थिती पाहता हा प्रस्ताव नक्कीच विचार करण्यासारखा होता. नवख्या सिद्धार्थला जबाबदारी पार पाडण्यासाठी एक मोठा आधार मिळणार होता. हा नातेसंबंध जुळून आला तर शत्रुघ्नसारख्या छोट्या वैऱ्याची चिंता करण्याची गरजच पडणार नव्हती. "मी, सिद्धार्थशी बोलून मग तुम्हाला कळविते", राजमातेचे उत्तर राणी आश्लेषा ह्यांना फारसे आवडले नाही. त्यांना तत्काळ होकार हवा होता.
सिद्धार्थ आपल्या दालनात विचारमग्न होऊन बसला होता. इतक्या सर्व धावपळीत सीमंतिनीचा सवडीने विचार करण्याची फुरसत त्याला जरी मिळाली नसली तरी तिचा चेहरा कायम त्याच्या नजरेसमोर तरळत असे. आज बऱ्याच दिवसांनी काहीशी सवड मिळाल्याने तो तिच्या आठवणीत मग्न झाला होता. विरहाचे दुःख काय असते हे ज्याला अनुभव येतो त्यालाच समजत. इतक्यात द्वारातून राजमातेला येताना पाहून तो काहीसा दचकला. एका क्षणात त्याने स्वतःला सावरले आणि तो राजमातेजवळ बसला.  महाराज अंशुमत ह्यांच्या मृत्युनंतर मायलेकांना एकांतात एकत्र येण्याची संधी फारच कमी मिळत असे. राजमातेने सिद्धार्थच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. सिद्धार्थला काहीस गहिवरून आले. परंतु आता असे भावनाविवश होऊन  चालणार नव्हते. राज्यकारभाराच्या घडीविषयी राजमातेने काही सल्ले सिद्धार्थला दिले. नंतर शत्रुघ्नचा विषय काढता काढता तिने गाडी हळूच राणी आश्लेषा ह्यांच्या प्रस्तावाकडे वळविली. सिद्धार्थला हे एकदम अनपेक्षित होते. एरव्ही संयमी असणाऱ्या सिद्धार्थची मुद्रा काहीशी रागीट झाली. पण लगेच त्याने स्वतःला सावरले. "मला ह्या विवाहबंधनात पडायचं नाहीय!" सिद्धार्थ म्हणाला.
दुपारच्या भोजनानंतर राजा प्रद्द्युत आणि राणी आश्लेषा ह्यांनी आपल्या राज्याकडे प्रस्थान केलं. एकंदरीत त्यांचा पाठींबा सिद्धार्थच्या निर्णयावर अवलंबून होता. वातावरणातील अनिश्चितता राजमातेला असह्य होत होती. त्यांनी पुन्हा एकदा जेष्ठ मंडळींची बैठक बोलावली. सिद्धार्थने ही बैठक टाळण्याची राजमातेकडून परवानगी मिळविली होती. राणी आश्लेषा ह्यांचा प्रस्ताव ह्या बैठकीत सांगावा कि नाही ह्याविषयी राजमातेची द्विधा मनःस्थिती होती. शेवटी त्यांनी न राहवून हा प्रस्ताव मंडळीसमोर मांडला. आणि सिद्धार्थचे उत्तरही! मंडळींना एकंदरीत धक्काच बसला. पंडित न राहवून म्हणाले "क्षमा असावी राजमाता! एकंदरीत सैन्याची जय्यत तयारी करणेच इष्ट होईल!" बैठक मग त्या तयारीला लागली. बैठक संपताच सेनापतींनी राजमातेची एकांतात भेट घेण्याची परवानगी मागितली. त्यांच्या सेनानायकाने आश्रमात ऐकलेला सीमंतिनी आणि सिद्धार्थ ह्यातील संवाद सेनापतींना सांगितला होता. हे रहस्य उघड करण्याची हीच वेळ आहे हे जाणून घेवून सेनापतींनी थोडक्यात हे सारे राजमातेला सांगितले. राजमातेसाठी आजच्या दिवसातील हा अजून एक धक्का होता.
निशेने राजनगरीवर आपला अंमल बसविला होता. राजमहालातील भोजने केव्हाच आटोपली होती. काही वेळाने सर्वजण निद्राधीन झाले. आणि मग एकदम गुप्तपणे राजबिंडा सिद्धार्थ घोड्यावर स्वार होऊन राजमहालाबाहेर पडला. त्याचा मार्ग अगदी ठरला होता. आणि निर्धारही पक्का होता. परंतु आपल्या मागावर घोडेस्वारांचे एक पथक आहे ह्याची मात्र त्याला जाणीव नव्हती. सेनापतींनी सांगितलेल्या बातमीनंतर त्याच्यावर पाळत ठेवण्याची खबरदारी राजमातेने घेतली होती. परंतु त्याचा आजच उपयोग होईल ह्याची मात्र त्यांना कल्पना नव्हती.

दाट जंगलातील निद्राधीन झालेल्या त्या आश्रमातील शांतता सिद्धार्थच्या अश्वाच्या दूरवरून येणाऱ्या टापांच्या आवाजाने काहीशी भंगली. आश्रमापासून काही अंतरावर सिद्धार्थ अश्वावरून पायउतार झाला आणि आश्रमात प्रवेश करता झाला. आश्रमाच्या प्रवेशद्वारावरील सेवकांनी त्याला थेट महर्षी अगस्त्यांच्या कुटीत नेले. अशा अवेळी सिद्धार्थचे आगमन महर्षींना सुद्धा आश्चर्यचकित करून गेले. सिद्धार्थने त्यांना आपल्या भेटीचे प्रयोजन सांगितले आणि सीमंतिनीची भेट घेवून देण्याची विनंती केली. सिद्धार्थचा निर्धार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. महर्षीनी क्षणभर विचार केला. आणि सिद्धार्थला तिथेच थांबण्याची आज्ञा केली. जसे ही भेट सर्वांच्या नजरेसमोर होवून देणे योग्य नव्हते तसेच योग्य नव्हते सिद्धार्थला भेटीशिवाय परत पाठविणे. महर्षीनी सेवकांना फळांचा रस आणण्यासाठी पिटाळले. आणि मिळालेल्या संधीत सर्वांच्या नजरा चुकवून सीमंतिनी कुटीत आली. महर्षी अगस्त्यनी त्या दोघांना कुटीतील एका कक्षात एकांतात बोलण्याची संधी दिली.
"सीमंतिनी, मी तुझ्याशी इथे विवाह करून तुला माझी पत्नी म्हणून घेऊन जाण्यासाठी आलो आहे", सिद्धार्थ बोलता झाला. स्थितप्रज्ञ असली म्हणून काय झालं, सीमंतिनीला आपल्या चेहऱ्यावरील लज्जेचे भाव लपवणे शक्य नव्हते. लज्जेने गुलाबी छटा पसरलेले तिचे गाल, खाली भूमीकडे झुकलेली तिची प्रणयिनीची नजर सिद्धार्थला सर्व काही सांगून गेली. आता कोणत्याही क्षणी सीमंतिनीच्या तोंडून होकार ऐकायला मिळेल अशीच सिद्धार्थची समजूत झाली. "महाराज," सीमंतिनीने बोलण्यास आरंभ केला. महाराज हा शब्द सिद्धार्थला खूपच खटकला. अशा ह्या क्षणी ह्या शब्दाचे प्रयोजन काय असा विचार येऊन सिद्धार्थ काहीसा रागावलासुद्धा. "आपण आपली जीवनसाथी म्हणून माझा विचार करता आहात, ही माझ्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सद्यपरिस्थितीत ह्या राज्याचे अधिपती म्हणून असलेले आपले कर्तव्य ही अधिक महत्वाची गोष्ट आहे असे मला वाटते. शत्रूने राज्याभोवती मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशा वेळी आपण विवाहबंधनात अडकून बसलात तर आपल्या तयारीत हयगय होण्याचा धोका संभवतो. आपण शत्रूचा पराभव करून आलात की मी जरूर आपल्या प्रस्तावाचा विचार करीन".
सीमंतिनीच्या ह्या शब्दांनी सिद्धार्थच्या मनात एका क्षणात अनेक भावना निर्माण झाल्या. प्रामुख्याने त्यात अपेक्षाभंग होता आणि आश्चर्यही होते. त्याला जितके आश्चर्य वाटलं त्याच्या दहा पटीने जास्त सीमंतिनीला वाटलं होत. आपण असे काही बोललो ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. इतके दिवस ज्याला अर्पण होण्याची आपण कामना मनी बाळगली त्या मनीच्या राजकुमाराने स्वतःहून आपणास मागणी घातली असताना आपण असे काही बोलू शकतो ह्याचेच तिला अति आश्चर्य होत होते. त्याच वेळी दुसर मन मात्र तिला तू हे योग्यच केलं असं सांगून तिची समजूत घालीत होते.
सिद्धार्थने मग तिथे जास्त वेळ घालविला नाही. पुढे सर्व काही अनिश्चितताच भरून राहिली होती. त्याने महर्षीचा निरोप घेवून राजनगरीकडे प्रस्थान केले. सिद्धार्थ आणि सीमंतिनी ह्या दोघांना बोलण्यासाठी महर्षीनी जरी एकांत दिला असला तरी त्यांचे बोलणे अजून कोणीतरी ऐकत होत.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात राजमाता शर्मिष्ठा उद्यानात फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या. मनावर कितीही दगड ठेवला तरी अशा काही क्षणी घातलेले सर्व बंध तुटून पडायचे. ह्याच उद्यानात महाराज अंशुमत ह्यांच्यासोबत त्यांनी किती स्वप्ने रंगविली होती. डोळ्यातील येवू पाहणाऱ्या अश्रूंना त्यांनी आता मात्र रोखले नाही. आजूबाजूला महाराजांचे अस्तित्व आहे असा राहून राहून त्यांना भास होत होता.
असाच काही वेळ उद्यानात घालवून राजमाता आपल्या दालनात परतल्या तेव्हा सेनापती त्यांची प्रतीक्षा करीत असल्याची खबर सेविकेने त्यांना दिली. सेनापतींनी त्यांना रात्रीचा सर्व वृतांत कथन केला आणि सिद्धार्थ - सीमंतिनीचे बोलणेही! प्रथम राजमातेची मुद्रा क्रुद्ध झाली. सिद्धार्थने अशी हरकत करावी ह्याचे त्यांना दुःख झाले. महर्षीच्या वागण्याचेही त्यांना आश्चर्य वाटले. परंतु ज्यावेळी सीमंतिनीचा विचार त्यांच्या मनात आला त्यावेळी मात्र त्यांना त्या कधीही न पाहिलेल्या युवतीविषयी कौतुकाची भावना दाटून आली. ज्या सुखाची ह्या भूमातेवरील असंख्य कन्या मनोकामना बाळगून आहेत ते सुख समोर उभे असताना सुद्धा जी कर्तव्याचा विचार करू शकते आणि तो विचार राजापुढे मांडू शकते, तिला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली!"


राजा प्रद्द्युत आणि राणी आश्लेषा ह्यांच्या राजमाता शर्मिष्ठा व मंडळीबरोबरच्या फिस्कटलेल्या बैठकीची खबर लगोलग शत्रुघ्नच्या वर्तुळात पोहोचली होती. शत्रुघ्नच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. भावनांची तीव्रता जोरात असतानाच त्यांचा  भडका उडवावा असे त्याचे कुटील मन त्याला वारंवार सांगू लागले. कुटील मनाचे सांगणे ऐकत शत्रुघ्न आपल्या पथकाबरोबर राजा प्रद्द्युतच्या नगरीकडे निघाला. मनातील विचार कुटीलतेच्या विविध पातळ्या गाठत होते. राजमातेच्या नकाराची राणी आश्लेषानी वैयक्तिक अपमान म्हणून समजूत  करून घेतली असेल हे तो पुरेपूर जाणत होता. दोन स्त्रियांच्या मनातील ईर्षा कोणत्या कारणावरून निर्माण होऊ शकते ह्याचा ठाव घेणे अशक्य आहे हे तो पुरेपूर जाणून होता.
शत्रुघ्नच्या आगमनाने राजा प्रद्द्युत फारसा काही आनंदला नाही. शत्रुघ्नच्या कुटील कारस्थानाचा त्याला हल्ली काहीसा उबग येवू लागला होता. एकंदरीत ह्या सर्व राज्यविस्ताराच्या मोहापासून दूर राहावे अशी त्याची भूमिका होवू लागली होती. अशा मनोवस्थेतच तो शत्रुघ्नबरोबरच्या बैठकीसाठी स्थानापन्न झाला. शत्रुघ्नने सिद्धार्थच्या रणसज्जतेविषयी इत्यंभूत अहवाल सादर केला. सिद्धार्थला पूर्ण सैन्याला युद्धासाठी सज्ज करण्यासाठी किमान एका सप्ताहाचा अवधी लागेल असे त्याचे म्हणणे होते. ह्या अवधीतच सिद्धार्थच्या साम्राज्यावर जोरदार हल्ला करून ते नामशेष करावे असा त्याचा प्रस्ताव होता. राजा प्रद्द्युतची सद्सदविवेक बुद्धी ह्या विचाराला साथ द्यायच्या विरुद्ध होती. ज्या युवराजाचा आताच आपण पाहुणचार स्वीकारून आलो त्याच्याच साम्राज्यावर इतक्या लगेच आक्रमण करावे हे त्यांना अजिबात पटत नव्हते. परंतु शत्रुघ्नाला शब्द तर ते देवून बसले होते आणि कोणत्याही योग्य कारणाशिवाय आपला शब्द फिरवणे योग्य नव्हते. राजा प्रद्द्युतनी सर्व अटींची उजळणी करण्यास शत्रुघ्नाला सांगितले. आपल्या विचारांना काही वेळ द्यावा हाच हेतू त्यामध्ये होता. शत्रुघ्नने सुरुवात केली. त्याच्या बोलण्याकडे प्रद्द्युतचे फारसे लक्ष नव्हतेच. "सिद्धार्थच्या साम्राज्याचा पाडाव करण्यात यश आल्यास त्यातील अर्धे  साम्राज्य राजा प्रद्द्युतच्या राज्यात सामील करण्यात येईल", शत्रुघ्नच्या ह्या वाक्याने मात्र प्रद्द्युत खडबडून जागे झाले.   " मी तर तीन  चतुर्थांश साम्राज्याच्या बोलीवर ह्या योजनेत सामील झालो होतो" राजा प्रद्द्युत ह्यांच्या आवाजातील राग अगदी स्पष्ट प्रकट झाला होता. "वा राजे! सर्व योजना आखायची आम्ही! सर्वांना एकत्र आणायचे आम्ही! आणि मोठा वाटा मात्र तुम्हाला!" शत्रुघ्नचे कुटील रूप आता उघड झाले होते. शब्दाने मग शब्द वाढत गेला. बैठक फिस्कटणार अशीच लक्षणे दिसू लागली होती.
लगोलग ही खबर राणी आश्लेषाच्या दालनापर्यंत जावून पोहोचली. लगबगीने त्या बैठकीत येवून पोहोचल्या. त्यांच्या आगमनाने राजा प्रद्द्युत प्रचंड नाराज झाला तर शत्रुघ्न अत्यंत आनंदी! आपला अंदाज अगदी बरोबर ठरला ह्याचा त्याला मनोमन आनंद झाला. राणी आश्लेषानी प्रथम दोघांची अशा बैठकीतील स्वतःच्या आगमनाबद्दल माफी मागितली. मग त्यांनी एकंदरीत विसंवादाचे कारण जाणून घेतले. त्यांचाही थोडा संताप झालाच, शत्रुघ्नच्या कुटील बुद्धीने! परंतु राजमाता शर्मिष्ठाची मुद्रा डोळ्यासमोर येताच त्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला. "आम्हाला तुमच्या सुधारित अटी मान्य आहेत", राणी आश्लेषा ह्यांच्या उद्गारांनी राजा प्रद्द्युत ह्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ क्रुद्ध मुद्रेने बैठकीतून प्रस्थान केले. त्यांचा राग कसा दूर करायचा हे राणी आश्लेषा बरोबर जाणून होत्या. सध्यातरी त्यांनी मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायचे असे ठरविले. सेनापतींना बैठकीत पाचारण करण्यात आले. बैठक पुढील तीन - चार तास सुरु होती. बैठक संपल्यावर ज्यावेळी शत्रुघ्न बाहेर पडला त्यावेळी तो अत्यंत खुश झाला होता. दोन दिवसातच सिद्धार्थच्या साम्राज्यावर आक्रमणाची योजना अगदी सूक्ष्म तपशिलासहित तयार होती.
सिद्धार्थ, राजमाता, सेनापती, प्रधान ह्यांचीही बैठक सुरु होती. महर्षी अगस्त्य सुद्धा राजमहाली आले होते.  शत्रू नक्कीच प्रबळ होता. आणि हेरांनी आणलेली शत्रुघ्नच्या भेटीच्या बातमीचा अर्थ स्पष्ट होता. आक्रमण अगदी उंबरठ्यावर येवून ठाकले होते. थेट मुकाबला करता करता शत्रूच्या रणनीतीची आतल्या गोटातून बातमी काढणे गरजेचे होते. आणि त्यासाठी कुशल हेरांची आवश्यकता होती. अंशुमत ह्याच्या कारकिर्दीत सैन्यबळ इतके प्रबळ होते की हेरखात्याकडे तसे म्हणावे तर दुर्लक्षच झाले होते. आता वेळ कमी होता. सिद्धार्थने निर्णय जाहीर केला. सर्व सामर्थ्यानिशी शत्रूशी मुकाबला करण्याचा! "मी स्वतः आघाडीच्या तुकडीत सामील असणार!" त्याच्या ह्या उद्गाराने प्रत्यक्ष अंशुमत महाराज समोर ठाकले आहेत असा केवळ शर्मिष्ठा ह्यांना नव्हे तर सर्वांनाच भास झाला.
सिद्धार्थला आशीर्वाद देवून आणि राजमाता शर्मिष्ठेला धीर देवून महर्षी अगस्त्य आश्रमाकडे निघाले. त्यांच्या मनात विचारांचे वादळ सुरु होते. तपोवनात शिरताच सीमंतिनीचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांची काहीशी चिंतीत मुद्रा पाहून ती काळजीत पडली. काही वेळाने ती महर्षीच्या कुटीत शिरली. तिला पाहून महर्षीनी स्मित हास्य केले. महर्षीनी तिला सर्व हकीकत सविस्तर सांगितली. आपल्या मनीच्या राजकुमारावर आलेला हा कठीण प्रसंग ऐकून महर्षी पुढे काय बोलत आहेत ह्यावरील सीमंतिनीचे चित्त उडाले. "सिद्धार्थला कुशल हेरांची गरज आहे" हे एकच वाक्य तिच्या कानात सतत रेंगाळत होते.


निशादेवतेने आश्रमावर आपले पांघरुण पसरविले होते. सुरक्षासेवकांनी सुद्धा एकंदरीत परिस्थिती पाहून निद्राधीन होणे पसंद केले होते. आणि अशा ह्या थंड वातावरणात हळूच एक युवक कोणी पाहत नाही ह्याची खात्री करून घेत बाहेर पडला. अश्वशालेतील एका घोड्याला मोकळे करून त्याने त्या घोड्यावर मांड ठोकली. तो काही फारसा कुशल दिसत नव्हता. पहिल्यादा अडखळला सुद्धा परंतु शेवटी एकदाचा घोड्यावर बसून त्याने घोड्याला भरधाव वेगाने आश्रमाबाहेर पिटाळले. सुरक्षासेवकांची झोप इतकी गाढ होती की हा घोड्यांच्या टापांचा आवाज आपल्या स्वप्नातील असावा अशी त्यांनी स्वतःची समजूत करून घेतली व ते परत निद्राधीन झाले.

शत्रुघ्नने दोन दिवसातच सर्व मोर्चेबांधणी केली होती. सिद्धार्थच्या साम्राज्याच्या दक्षिण सीमेभोवती शत्रूसैन्याने वेढा  घातला होता. तिथे सिद्धार्थची सेना कमकुवत असल्याची बातमी त्यांना मिळाली होती. एकदा का दक्षिण सीमेवरील सिद्धार्थच्या सेनेचे कवच भेदले की थेट राजधानीपर्यंत मुसंडी मारण्याचा शत्रुघ्नचा डाव होता. राजा प्रद्द्युत जरी ह्या मोहिमेत स्वतः सहभागी झाला नसला तरी त्याच्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली पूर्ण सेना ह्यात सहभागी झाली होती.
महर्षी अगस्त्य ह्यांच्या आश्रमातून निघालेला घोडेस्वार थेट राज्याच्या दक्षिण सीमेपर्यंत निघाला होता. सीमारेषेवरील एका गावात त्याने मुक्काम ठोकला होता. युद्धाच्या वातावरणनिर्मितीने गाव तसं ओस पडलं होता. तरीसुद्धा दुसरा काहीच पर्याय नसल्यामुळे काहीजण त्या गावातच राहिले होते. असेच एक वयोवृद्ध जोडपं होत जयदेव आणि आम्रपाली ह्याचं. योगायोगानं घोडेस्वाराच्या नजरेला अंगणात लाकडाच्या काटक्या  वेचणारी वृद्ध आम्रपाली पडली होती.  सततच्या घोडदौडीने दमलेल्या त्या स्वाराने तिथे पायउतार व्हायचे ठरविले. "आजी, पाणी मिळेल का मला घोटभर?" स्वार आम्रपालीला विचारता झाला.  "मिळेल की", आम्रपालीच्या स्वरातील माया घोडेस्वाराला हेलावून गेली. त्यांच्या त्या कुटीत पाणी पिणाऱ्या स्वाराकडे आम्रपाली टक लावून पाहत होती. तिने केलेला रात्रीच्या जेवणाचा आणि मुक्कामाचा आग्रह स्वाराला मोडता आला नाही. आम्रपालीच्या मनात विचारचक्र सुरूच होते. तिने उगाचच जयदेवना काहीतरी निमित्त काढून बाहेर पाठविले. जयदेव बाहेर  गेल्याची खात्री होताच आम्रपाली म्हणाली, "मुली, कशाला इतका जीव घालते आहेस?" "अजून कोणी आहे का इथे?" स्वाराने अगदी दचकून प्रश्न केला. "मी तुझ्याशीच बोलते आहे मुली", आम्रपाली म्हणाली. आता मात्र सीमंतिनीने इतका वेळ धारण केलेला मनोनिग्रह गळून पडला. आम्रपालीच्या अनुभवी नजरेपुढे आपले नाटक चालले नाही ह्याची तिला खात्री पटली. मग तिने आपल्या खऱ्या रुपाची कबुली दिली.
तोवर जयदेव परतले होते. आता त्या दोघांसमोर सीमंतिनीने आपल्या योजनेची माहिती देण्यास सुरुवात केली. एका तरुण स्वाराच्या रुपात शत्रूसैन्यात शिरून शत्रूच्या व्युहरचनेची माहिती मिळवून ती सिद्धार्थपर्यंत पोहोचविण्याचा सीमंतिनीचा विचार होता. तिची ही धाडशी योजनेची माहिती ऐकून त्या दोघांचा जीव हेलावला. आपल्या प्रेमापायी किती धोका पत्करायला तयार झाली होती ती! अचानक जयदेव आपल्या जागेवरून उठले आणि म्हणाले, "मुली, मी सुद्धा येतो तुझ्यासमवेत!" तिथे शत्रूच्या छावणीत जावून काय करायचे ह्याची योजना केव्हाच त्यांनी मनात बनविली होती. पुन्हा स्वाराचा वेष परिधान करून सीमंतिनी जयदेव सोबत जावयास निघाली त्यावेळी अचानक तिच्या मनात आम्रपालीचा विचार आला. आयुष्याच्या संध्याकाळी ही स्त्री आपले सर्वस्व असलेला आपल्या पतीला एका अनोळखी मुलीच्या मदतीसाठी जाऊ द्यायला तयार झाली होती. अशा प्रवासावर की जिथुन परत येण्याची शाश्वती नव्हती. मग तिने पटकन एक निरोप सिद्धार्थसाठी लिहून तो आम्रपालीच्या हाती सोपविला. जर आम्ही दोघ परत येवू शकलो नाहीत तर ही चिठ्ठी सिद्धार्थाच्या हाती सोपविण्यास सांगितलं. त्यातील मुख्य मुद्दा आम्रपालीची काळजी घेण्याविषयीचा होता आणि शेवटी एका वाक्यात सीमंतिनीने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
एव्हाना संध्याकाळ सरत आली होती. थंड वारे वाहू लागले होते. शत्रूसैन्य ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून गप्पा मारीत बसले होते. नक्की युद्ध कधी सुरु होणार ह्याविषयी काहीच माहिती मिळत नव्हती. अचानक जयदेव ह्यांचा खणखणीत आवाज त्या छावणीत दुमदुमला. देवांनी केलेल्या असुरांच्या पराभवाची गाणी गाण्यास त्यांनी सुरुवात केली होती.  त्यांच्या आवाजातील खंबीरतेने सर्व सैन्याचे लक्ष वेधून घेतले आणि हळूहळू सर्वजण त्यांच्याभोवती गोळा होवू लागले. त्यांच्यासोबत असणाऱ्या तरुण मुलाने त्यांना डफलीवर साथ द्यायचा प्रयत्न केला परंतु त्यातील बेसुरतेने वैतागून सैन्याने त्या तरुण मुलास थांबण्यास सांगितले.  जयदेव ह्यांच्या आवाजातील जादूने सैन्यावर मोहिनी पसरली होती. जयदेव ह्यांनी सीमंतिनीला नजरेने एका मुख्य तंबूच्या दिशेने खुणावलं. तो सेनापतीचा तंबू आहे हे कळावयास तिला वेळ लागला नाही. आपल्याकडे कोणाचेच लक्ष नाही हे पाहून सीमंतिनी त्या तंबूच्या दिशेने हळूच निसटली. एव्हाना सेनापती सुद्धा ह्या गायन कार्यक्रमात दाखल झाले होते. आणि त्याचाच फायदा घेत सीमंतिनी त्यांच्या तंबूत शिरली. वेळ फार थोडा होता. तिने भरभर सर्व तंबूतील सामानाची तपासणी करण्यास सुरुवात केली आणि अचानक तिची नजर एका नोंद वहीकडे गेली. त्यातील पहिली एक दोन पाने पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. व्युहरचनेची त्यात पूर्ण माहिती होती. आक्रमणास दुसऱ्या दिवशी पहाटेच सुरुवात होणार होती. ती पूर्ण वही नेण्याचा मोह तिने फार कसोशीने टाळला. त्यातील फक्त व्युहरचनेचे पान फाडून तिने आपल्यासोबत घेतले. तंबूतील विखुरलेल्या गोष्टी तिने जागच्या जागी ठेवल्या. आणि मग तिथूनच मागच्या मार्गाने तिने पलायन केले. योजनेनुसार जयदेव ह्यांनी तिला संधी मिळताच त्यांची वाट न पाहता निघून जाण्यास सांगितलं होते.
जयदेव ह्यांनी बराच वेळ आपला कार्यक्रम सुरु ठेवला. मग भोजनाची वेळ झाली तसे त्यांना सेनापतीने आपल्यासोबत जेवण्याचे निमंत्रण दिले. त्यांना नम्रपणे नकार देवून त्यांनी निघण्याची परवानगी मागितली. एक चांगलीशी बिदागी देवून त्यांना निरोप देण्यात आला. मग रात्रीच्या उशिराच्या प्रहरी शत्रुघ्न सैन्याला येवुन मिळाला तेव्हा युद्ध अगदी जवळ येवून पोहोचले आहे ह्याची सर्वांना खात्री पटली.
सीमंतिनीने आम्रपालीच्या कुटीजवळील आपला घोडा घेतला आणि ती मोठ्या वेगाने राजधानीकडे प्रस्थान करू लागली. राजधानीत सर्व निद्राधीन झाले होते. सिद्धार्थाच्या महालाच्या बाहेर सीमंतिनी घोड्यावरून पायउतार झाली.  सिद्धार्थचा कक्ष कुठे असावा ह्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. अचानक तिचे लक्ष एका मोठ्या खिडकीतून दिसणाऱ्या राजा अंशुमत ह्यांच्या प्रतिमेकडे गेले. हा सिद्धार्थचा कक्ष असावा अशी तिने अटकळ बांधली. सुरक्षारक्षक काहीसे निद्राधीनच होते. त्याचाच फायदा उठवून सीमंतिनीने त्या कक्षात प्रवेश मिळविला. आत सर्व काही शांत होते. एक राजेशाही मंचक कक्षाच्या दुसऱ्या टोकाला होता. स्वाराच्या वेषातील सीमंतिनी त्या दिशेने चालू लागली. अचानक कोणीतरी तिला जोराने बिछान्यावर ढकलले आणि दुसऱ्या क्षणी आपल्या छातीवर असलेल्या तलवारीच्या टोकाने सीमंतिनी भयभीत झाली. तिचे लक्ष आपल्यावर आक्रमण करणाऱ्या युवकाकडे गेले आणि ती हळूच म्हणाली, "मी सीमंतिनी आहे सिद्धार्थ!" राजबिंड्या  सिद्धार्थचे ते मोहक रूप तिला त्याही स्थितीत तिला मोहवून गेले. सिद्धार्थला आवाजाची खुण पटली आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. "सीमंतिनी, तू आणि इथे, ह्या वेळी आणि ह्या अशा वेषात काय करीत आहेस?" सिद्धार्थ विचारता झाला. "तू प्रथम माझ्यावरील तलवार  घेशील तरच मी उत्तर देवू शकीन", सीमंतिनी उत्तरली. सिद्धाथने तलवार तर बाजूला केली. परंतु अजूनही त्याचा संशय पूर्णतः दूर झाला नव्हता. हिचा कोणी कटासाठी वापर तर करून घेत नाहीये ना? असा विचार त्याच्या मनात आला. तोवर सीमंतिनीने आपले  केस मोकळे  केले होते. आणि आपली सर्व वीर कथा त्याला थोडक्यात सांगितली. तिच्या प्रत्येक वाक्यानुसार सिद्धार्थच्या चेहऱ्यावर तिच्याविषयीच्या कौतुकाचे भाव उमटत होते. सीमंतिनीने त्याला व्युहरचनेचे पान सोपवले आणि सिद्धार्थला तिने पार पडलेल्या अमोल कामगिरीचे महत्व समजले. सीमंतिनीला त्याने पाण्याचा एक पेला हाती सोपविला आणि तो व्यूहरचनेचे निरीक्षण करू लागला. काही वेळ निरीक्षण केल्यावर त्याने प्रश्न विचारण्यासाठी सीमंतिनीकडे नजर वळविली. ती तोवर त्याच्या मंचकावर निद्राधीन झाली होती. गवाक्षातून डोकावणारी पहाटेची चंद्राची शीतल किरणे तिच्या चेहऱ्यावर पसरली होती आणि त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. पहाट व्हायला आता जास्त वेळ बाकी राहिला नव्हता. ह्या व्यूहरचनेनुसार शत्रूवर आक्रमण करणे काहीसे सोपे जाणार असले तरी युद्ध किती काळ चालेल ह्याचा भरवसा नव्हता. सिद्धार्थच्या मनात हे सर्व विचारचक्र सुरु असले तरी चंद्रकिरणांनी खुललेल्या सीमंतिनीच्या सुंदर चेहऱ्याकडे बघण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. तिच्या अंगावर त्याने पांघरूण ओढले आणि कक्षाबाहेर जाण्यासाठी त्याची पावले वळली. दोन पावले पुढे जाताच एक विचार त्याच्या मनात आला. हळूच येवून त्याने क्षणभर त्या सौंदर्यवतीच्या ओठावर ओठ टेकविले आणि आपल्या ह्या कृतीने लाजून तो भरभर महालाबाहेर प्रस्थान करता झाला. इथे झोपेचे सोंग  घेतलेल्या सीमंतिनीच्या आनंदाला सीमा उरली नव्हती!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...