मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

पृथ्वीचा आयुष्यकाल



आपण सारे पामर दैनदिन समस्यांनी इतके ग्रासलेले असतो की आपणास वैश्विक समस्यांकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. साधू संत लोक हे ज्या प्रमाणे वैश्विक समस्यांकडे लक्ष देत असतात त्याचप्रमाणे संशोधक हा वर्ग देखील दैनदिन समस्या दुर्लक्षून वैश्विक समस्यावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. मी अशा समस्यांसंबंधित बातम्या ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपण कसे क्षुद्र समस्यांचा विचार करीत आहोत ह्या विचाराने मला काहीसे खजील व्हायला होते.
अशीच एक बातमी आठवड्याच्या मध्यावर वाचण्यात आली. पृथ्वीचा आयुष्यकाल केवळ .२५ बिलियन वर्षे बाकी आहे. बिलियन म्हणजे १००० मिलियन. आणि मिलियन म्हणजे १० लाख. एकंदरीत .२५ गुणिले दहा हजार लाख वर्षांनी पृथ्वी संपुष्टात येणार आहे. आता .२५ बिलियन वर्षांनी होणार तरी काय? तर सूर्याची उष्णता वाढत जावून किंवा सूर्य प्रसरण पावून पृथ्वीला गिळंकृत करणार आहे. ह्या बातमीवर वाचकांच्या प्रतिक्रिया सुद्धा अपेक्षित / विनोदी होत्या.
> मनुष्यजात पृथ्वीला इतके वर्ष सुद्धा ठिकाणावर ठेवणार नाही, त्याआधीच आपण पृथ्वीचा आणि आपल्या स्वतःचा विनाश ओढवून घेवू
> मी एक सदनिका विकत घ्यायचे ठरविले होते पण आता ही बातमी वाचून विचार बदलला!
बातमीत पुढे मनुष्यप्राणी मग पर्यायी ग्रहाचा कसा शोध घेईल आणि आपल्यापुढे असलेले पर्याय कोणते ह्याचा उहापोह करण्यात आला होता. अपेक्षेनुसार मंगळ ग्रह उपलब्ध पर्यायात पहिल्या क्रमांकावर होता. पृथ्वीपासूनचे तुलनात्मक दृष्ट्या कमी अंतर हा एक ह्यात महत्वाचा घटक होता. परंतु अजून काही वर्षांनी (ह्यातील वर्ष मोजण्याचे एकक ओघाने पुन्हा बिलियन मध्येच आले!) मंगळावर सुद्धा हीच परिस्थिती ओढविणार वगैरे वगैरे!
मी ह्यावर अजून विचार करू लागलो.
उष्ण कटिबंधातील (ह्यात आपला भारत आलाच! ) देशांना ह्याची झळ पोहोचण्यास प्रथम सुरुवात होणार. हा भाग मनुष्यवस्तीसाठी अधिकाधिक प्रतिकूल बनत जाणार. मग ह्या भागातील लोक शीत कटिबंधातील भागात स्थलांतर करण्याचा विचार / प्रयत्न करणार जे शीत कटिबंधातील लोकांना नक्कीच आवडणार नाही. मग पृथ्वीवर संघर्षाचे / युद्धाचे बरेच प्रसंग ओढवणार! ह्यात उष्ण कटिबंधातील बलवान लोकांना शीत कटिबंधातील लोकांकडून फितविले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही! फितविले जाणार म्हणजे फक्त त्यांनाच शीत कटीबंधातील देशात प्रवेश देणार आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले जाणार!

उष्ण कटिबंधातील सामान्य लोकांना मग  दुसरे काहीतरी मार्ग शोधावे लागणार. जमिनीखाली वसाहती निर्माण करणे असा बालिश विचार मी केला. सूर्याने पृथ्वीलाच गिळले तर जमिनीखाली तू काय जिवंत राहणार? मनाने मला प्रश्न केला. पण जमिनीखाली अस्तित्व टिकविण्यासाठी काही अधिक (लाखो) वर्षे मिळतील हे मात्र नक्की! मग जमिनीखालील वसाहतीतील आयुष्य कसे असेल ह्याचा विचार करण्यात मी मग्न झालोह्या आयुष्यात माणसाच्या खेळ आणि शारीरिक व्यायामासंबंधित कार्यक्रमावर बंधने येतील हे नक्की. पृष्ठभागावरील वाढलेल्या उष्णतेचा वापर ही जमिनीखालील वसाहत आपल्या गरजा भागविण्यासाठी करील!

असो परत मुख्य मुद्द्याकडे येऊयात. समजा मनुष्य प्राण्याने मंगळ ग्रहाची स्थलांतरासाठी निवड केली तरीही तिथे मनुष्यासाठी योग्य वातावरण नाही हे आपणास माहित आहे आणि लेखातही त्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे जो कोणी मंगळावरील उपलब्ध वायुंचा ऑक्सिजन मध्ये रुपांतर करण्यात यश मिळवेल त्याला नोबल पारितोषक नक्कीच मिळेल! पण हे जमल्यास पृथ्वीवरील वायू प्रचंड प्रमाणात मंगळावर पोहोचवावे लागतील! आता राहता राहिला तो मंगळावर जाण्यासाठी निवड करण्यात येणाऱ्या सुदैवी मानवांचा विषय. ह्यासाठी निकष कोणते लावावेत हा कठीण प्रश्न. धनवान लोक जे ह्या प्रोजेक्टच्या खर्चात मोलाचा वाटा उभारतील त्यांना प्रथम निवडले जाईल. मग बुद्धिवान लोक, कलाकार, खेळाडू, सत्ताधारी लोक ह्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील. मनात अजून एक प्रश्न आला कि पृथ्वीवरील देश रचना पुन्हा तशीच मंगळावर निर्माण होईल काय? पृथ्वीवरील भ्रष्टाचार, अतिरेकी ह्या समस्या तिथेही उद्भवतील का? इतक्यात जाणविले की वर्षाच्या सुरुवातीला जवळपास हाच विषय मी लिहिला होता.

इतक्यात स्वयंपाकघरातून हाक ऐकू आली. "संकष्टी असली म्हणून काय झाले? भाज्या तर आणायच्या आहेत!" .२५ बिलियन वर्षानंतरच्या प्रश्नाचा विचार करण्याचे काही काळ प्रलंबित करून मी बाजारचा रस्ता धरला!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...