मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार / फेररचना


सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेररचना झाली आणि त्याबरोबर विस्तारही झाला.  ज्यावेळी अनेक पक्षांच्या पाठींब्यावर सरकार टिकून असते त्यावेळी सर्वांची मर्जी राखावी लागते. त्यामुळे असे बदल घडत असतात. ह्यातील काही मुख्य मुद्दे
> एकूण मंत्र्यांची संख्या ७७ झाली असे वाचनात आले. खरोखर इतक्या मंत्र्यांची देशाला गरज आहे का? हा वादाचा मुद्दा
> ही बातमी इंटरनेटवर वाचताना मंत्र्याची वये नजरेत भरली. ७१, ८६, ६९, ७८ ही काही प्रातिनिधिक वये. ह्या 'अनुभवी' मंत्र्यांना शपथ देणारे आपले ८० वर्षे वयाचे माननीय राष्ट्रपती 'प्रणवदा'. ह्या वयात हे मंत्री किती कार्यक्षम असणार हे आपण सर्व जाणतोच. बदलत्या काळानुसार मंत्रिपद भूषविण्यासाठी कमाल वयोमर्यादा ( ६५ ते ७०) ठरवून देणे आवश्यक करावे असे माझे मत आहे.
> जातीचे राजकारणही पाहण्यात आले आहे. आणि मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत माघार घ्यावी लागलेले, आधीच्या विस्तारात नाराज झालेले अशा सर्वांची वर्णी आता लावण्यात आलेली आहे.
एकंदरीत काय तर युतीतील साथीदार पक्षांना, पक्षातील उपद्रवमूल्य जास्त असणाऱ्या मंत्र्यांना खुश ठेवण्यात हा विस्तार खर्ची पडला आहे. आता हा विस्तार झाला की त्याच्या अनुषंगाने मंत्र्यांना नवीन निवासस्थाने, गाड्या द्याव्या लागणार. ह्यावर लाखो रुपये खर्ची पडणार. पाच वर्षाच्या कालावधीत किती मंत्रिमंडळ विस्तार होवू शकतात ह्यावर कायद्याने काही मार्गदर्शक तत्वे तरी घालून द्यावीत.
हा पुढील सार्वत्रिक निवडणुकीआधीचा शेवटचा विस्तार ठरण्याची जास्त शक्यता असल्याने, भ्रष्टाचार, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्यांना कटाक्षाने दूर ठेवण्यात आले असावे. एकंदरीत काय आपण सर्वचजण शेवटच्या क्षणी जागे होतो, मग ती परीक्षा असो, कार्यालयातील काम असो वा तब्येतीची कुरबुर असो!
अजून एक मुद्दा, गेल्या काही दशकात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य खूप वाढले आहेत. प्रादेशिक विकासाच्या मुद्द्याला, प्रादेशिक भावनांना हे पक्ष प्राधान्य देतात. हे ठीक आहे परंतु त्याचबरोबर राष्ट्रीय हितासाठी प्रादेशिक पक्षांनी कोणती आचारसंहिता पाळली पाहिजे ह्यावर व्यापक स्वरुपात चर्चा होणे गरजेचे आहे.
भारत सध्या प्रगतीपथावर असल्याचे भासत असले तरी सर्वत्र तात्पुरत्या, कामचलावू उपायांचा वापर केला जात आहे. दूरदृष्टीचा जबरदस्त अभाव आहे. त्यामुळे जर का एखादी गंभीर समस्यांची मालिका अचानक उभी ठाकली तर आपली विकासाची सर्व गृहीतके कोलमडून पडू शकतात!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...