मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

क्रिकेट आणि मी


आमचे कुटुंब तसे प्रातिनिधिक वसईचे कुटुंब. लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळावे, वसई मैदानावर जाऊन होळी विरुद्ध पारनाका या संघातील मे महिन्यातील दोन दिवसांचा अंतिम सामना पाहावा, ऑस्ट्रेलिया मध्ये खेळल्या जाणार्या सामन्यासाठी सकाळी साडेचार वाजता उठून दूरदर्शन समोर जाऊन बसावे (माझे वडील तर सामन्याच्या अर्धा तास आधी उठून चहा बनवून मग TV पुढे बसत), जुन्या जमान्यातील खेळाडूंच्या आठवणी तासंतास काढाव्यात हे काही आमच्या कुटुंबीयांतील पुरुष मंडळींचे गुणधर्म! आमच्या आधीची पिढी (वडील, काका) ही एकदम बिनधास्त, कौटुंबिक शांततेसाठी क्रिकेटचा त्याग करावा असा विचार त्यांच्या मनाला शिवलासुद्धा नाही. पण मी आणि माझा भाऊ मात्र नवीन पिढीतील, आमचे क्रिकेट वेड बदलत्या काळानुसार (सुज्ञानी समजून घ्यावे) आटोक्यात आले. तर अशा या क्रिकेट वेडाच्या या काही आठवणी क्रिकेटची पहिली आठवण पहिलीतील (साल १९७९) , इंग्लंडचा संघ भारतात आलेला, बोथम एकदम जोरदार फॉर्ममध्ये होता पण आपला कपिल सुद्धा त्याच्या तोडीस तोड. साडेचारच्या १० मिनिटांच्या सुट्टीत अनुप बरोबर जाऊन पिंगळे सरांच्या घरांच्या बाहेरून त्यांच्या दिवाणखान्यातील दूरदर्शन संचावरील दिवस अखेरीचा स्कोर बघण्याची मजा काही औरच! त्यावेळी घरी TV नसल्याने सगळा शौक वोल्वच्या रेडिओवर धावते समालोचन ऐकून घेवून भागवावा लागत असे. १९८१ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला असताना तिसर्या कसोटी सामन्यात सुनील गावस्करला चुकीच्या पद्धतीने पंचाने बाद ठरविल्यावर त्याने चेतन चौहानला आपल्यासोबत मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. नशिबाने संघ व्यवस्थापनाने त्याला वेळीच रोखले. आता ही गोष्ट धावते समालोचन ऐकून आम्हाला कळली नाही ती बाब वेगळी. शेवटच्या दिवशी कपिलने वेदनाशामक injection घेवून घावारीच्या मदतीने ऑस्ट्रेलिया संघाला ८३ धावांत गारद केले. हे पूर्ण समालोचन रेडिओवर मी ऐकले. क्रिकेट आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही बहुदा एकत्रच असतात. त्या दिवशी कपिल आणि घावरी ऑस्ट्रेलियाला गारद करत असताना ज्या वेळी आम्ही समालोचन ऐकत होतो त्यावेळी विकेट पडत नव्हती आणि रेडिओ बंद केल्यावर मात्र पटकन विकेट पडायची. त्यामुळे रेडिओ बंद / चालू करत करत आम्ही ऑस्ट्रेलियाचा डाव संपविण्यात मोलाचा हातभार लावला. भारतीय संघाबरोबर आमचे गल्लीतील क्रिकेट सुद्धा जोरात होते. गल्लीतील प्रत्येक घरात एक दोन क्रिकेट वीर होते. माझ्या भावाच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली माझी जडणघडण (?) झाली. आमच्या गल्लीच्या संघाचे मैदान म्हणजे आमचे अंगण. स्टम्पच्या उजव्या बाजूला बाग. बागेतील झाडांना ही मुले कितपत हानी पोहचवतात यावर कडक नजर ठेवून असणारी आजी आणि डाव्या बाजूला चेंडू मारल्यास ओरडणारे शेजारी यामुळे V मध्ये खेळण्याची मला सवय लागली. समोरच आमच्या घरांच्या काचा होत्या. नरेंद्र हिरवानीने सनसनाटी कसोटी पदार्पण केल्यावर मी देखील गल्ली क्रिकेट मध्ये लेग स्पिन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी मला ३-४ विकेट मिळाल्या. परंतु शेवटी आमच्या एका शेजार्याने माझ्या गोलंदाजीवर फटका मारून घराची काच फोडली. त्या फटक्यानंतर त्या दिवशीचा खेळ अकस्मात संपला, त्या नंतर घराच्या तपास समितीपुढे (अध्यक्ष्य आजी), मला आणि माझ्या भावाला हजर करण्यात आले. तिथल्या चौकशीला तोंड देवून बाहेर पडताच माझ्या भावाने माझी कान उघाडणी केली. कशाबद्दल तर लेग स्पिन करून काच फोडण्यास अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरल्याबद्दल! गोलंदाजीच्या टोकाला असणारे आमचे जांभळाचे झाड मे महिन्यात जांभळाच्या भाराने वाकलेले असायचे. ती जांभळे तोडण्याचा बहाणा म्हणून आमचा शेजारी विजय वेगवान गोलंदाज झाला. जाम्बुंचा तोंडात बकाणा भरून जोरात धावत येणाऱ्या विजयला पाहून यष्टीरक्षण करणाऱ्या माझ्या छातीत धडकी भरत असे. विजय आणि मी एका संघात आणि माझा भाऊ आणि विजयचा भाऊ स्टीफन विरुद्ध संघात अशी संघ रचना असे. शाळेत सातवी पर्यंत क्रिकेट खेळले जायचे ते PT च्या तासाला. बर्याच वेळा नारळाच्या झावळीचा थोपा आणि कोनफळ हीच आमची क्रीडा साहित्ये होती. आठवीच्या सुमारास अ विरुद्ध ब वर्गाचे सामने सुरु झाले. हे सामने शनिवारी शाळा सुटल्यानंतर लगेच आयोजित केले जायचे. राकेश आमचा त्यावेळेचा तथाकथित वेगवान गोलंदाज होता. वेगवान अशासाठी कि बर्याच लांबून येवून धावत येवून गोलंदाजी टाकायचा म्हणून. बाकी त्याची ही सवय अजून कायम आहे! राहुल साठेने आठवीत केव्हा तरी या सामन्यात पदार्पण केले आणि त्या दिवशी पहिल्याच ३-४ षटकात ब वर्गाच्या ५ विकेट घेवून त्यांना जोरदार हादरा दिला. का कोणास ठावूक पण मला आघाडीच्या फलंदाजाचे स्थान देण्यात यायचे. डावखुर्या योगेश पाटीलला एक चौकार मारल्यावर दुसर्याच चेंडूवर त्याने माझा उडविलेला त्रिफळा अजून लक्ष्यात आहे. त्या वेळी मी फेकी गोलंदाजी करत असल्याचे आमच्या गल्लीत जाहीर करण्यात आले होते, पण आमच्याच अंगणात खेळले जात असल्याने मी बिनधास्त गोलंदाजी करत असे. शाळेत ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली होती कि नाही हे माहित नाही पण जर सर्व मुख्य गोलंदाज थकले तर माझ्याकडे चेंडू सोपविला जात असे. अश्या एका क्वचित क्षणी सुहास पाटीलचा उडविलेला त्रिफळा हा माझ्या गोलंदाजीच्या कारकिर्दीतला अविस्मरणीय क्षण! १९८३ सालच्या prudential विश्वचषकाच्या वेळी साखळीचे सर्व सामने BBC रेडिओवर मी ऐकले. त्यावेळी ८ संघ विश्वचषक स्पर्धेत भाग घेत. ते दोन गटात विभागले गेले असत. एकाच दिवशी प्रत्येक गटातील २ याप्रमाणे एकूण ४ सामने खेळवले जात. त्या विश्वचषक वेळी मी सहावीत होतो. आणि गानू सरांनी दिलेले हिंदीच्या धड्यावर स्वतःच एका वाक्यातील उत्तरांचे १० प्रश्न आणि १५ गाळलेल्या जागा भरण्याचे गृहपाठ करीत हे सर्व सामने ऐकत होतो. समालोचनासाठी एकच स्टेशन, त्यामुळे प्रत्येक सामन्याचे १५ मिनिटे वर्णन केले जात असे. त्यामुळे रेडिओवर भारताच्या सामन्याची पाळी येण्यासाठी पुन्हा ४५ मिनिटे थांबावे लागत असे. भारतीय संघाचा ८३ सालची कामगिरी कोणालाच अपेक्षित नव्हती अगदी दूरदर्शनला देखील. भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाल्यावर अचानक त्यांना जाग आली आणि थेट प्रक्षेपणास सुरुवात झाली. त्यावेळी आमच्या एकत्र कुटुंबात TV आला. आम्ही सर्व भावंडांनी HALL मध्ये झोपण्यासाठी वास्तव्य केले. उपांत्य आणि अंतिम सामने आम्ही सर्वांनी मध्ये येणाऱ्या दूरदर्शनच्या बातम्या, खंडित होणारा वीजपुरवठा याचा मुकाबला करत पाहिले. भारतीय संघाकडून पराभूत झालेला वेस्ट इंडीज संघ लगेचच १९८३ साली भारतात आला. त्या वेळी पहिलाच सामना श्रीनगर येथे खेळविला गेला. त्या सामन्यात प्रेक्षक चक्क विंडीज संघाला पाठींबा देत होते. त्या मुळे वैतागलेल्या कपिलच्या एका उत्कृष्ट क्षेत्र रक्षणाला ज्यावेळी प्रेक्षकांनी दाद दिली त्यावेळी कपिलने रागाने उलट प्रेक्षकांकडे पाहत टाळ्या वाजविल्या. १९८५ साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन पाकिस्तान संघाचा पराभव करीत बेन्सन आणि हेजेस चषक पटकाविला. हा अंतिम सामना स्कॉलरशिप परीक्षेच्या दिवशी (१० मार्च १९८५) खेळविला गेल्याने मी मोठ्या संकट सापडलो होतो. परंतु माझ्या वडिलांनी त्यावर उत्तम तोडगा काढला. माणिकपूर च्या ऑगसतीन शाळेजवळ असलेल्या त्यांच्या चुलत बहिणीच्या घरी दोन पेपर मध्ये जात आम्ही या सामन्याचा आनंद लुटला. आईच्या होणार्या संतापाकडे आम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्ष्य केले. आठवी / नववीच्या सुमारास शालेय क्रिकेट संघाची स्थापना झाली. सुजित देवकर, मिलिंद पाटील (लेग स्पिनर) हे दिग्गज (?) खेळाडू ह्या वेळी झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत उदयास आले. शाळेचे सामने बघण्यासाठी आम्हाला मैदानवर सोडले जात असे. उपांत्य फेरीच्या सामन्यात पंच आपल्या शाळेच्या गोलंदाजांना कशी गोलंदाजी करावी ह्याचे मार्गदर्शन करतात असा आरोप करीत प्रतिस्पर्धी संघाने काही काळ मैदान सोडले. त्यामुळे थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नंतर शाळेने स्पर्धा जिंकताच मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. नववीत असताना ऑस्ट्रेलिया संघाचे भारतात आगमन झाले. त्यावेळी २ ऑक्टोबर च्या सुट्टीच्या दिवशी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवसाचा सामना असताना भिडे सरांनी भौतिक शास्त्राच्या प्रयोगासाठी बोलाविल्यामुळे आम्हा क्रिकेट रसिकांमध्ये नाखुशीचे वातावरण पसरले होते. ह्याच दौर्यात एक कसोटी सामना टाय झाला. त्या दिवशी शाळा असल्यामुळे आम्ही सर्व बेचैनिनेच शाळेत होतो. दहावीच्या वर्षी माझे गल्ली क्रिकेट पूर्ण बंद झाले (केले गेले). फडके सरांच्या क्लास मध्ये जात असल्यामुळे माझे बर्याच वेळ त्यांच्या घरी अभ्यासासाठी वास्तव्य असे. १९८७चा विश्व चषक याच वेळी असल्याने मोठा दुर्धर प्रसंग ओढावला. गावस्करचे एक दिवशीय सामन्यातील एकमेव शतक, ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवरील लाहोर येथील उपांत्य सामन्यातील अविस्मरणीय विजय अशा न टाळता येणाऱ्या क्षणासाठी क्लासला दांडी मारत फडके सरांचा ओरडा खाण्याचे धाडस मी केले. १९८८ मार्च साली १० परीक्षा संपली. आणि आम्ही तयार झालो आमचे क्रिकेट प्रेम बाह्य जगतात घेवून जाण्यासाठी! दहावीची परीक्षा संपल्यावर क्रिकेट पाचूबंदरच्या समुद्रकिनारी सुरु झाले. संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास आमच्या batch चे साधारणतः १२-१४ जण क्रिकेट खेळण्यासाठी गोळा होत. काही वर्षांनी ह्या सुंदर समुद्रकिनार्याचे डम्पिंग ग्राउंड मध्ये रुपांतर करण्यात आल्यावर मला फार दुःख झाले. अकरावीत रुपारेल कॉलेज मध्ये प्रवेश केल्यावर पहिले सहा महिने क्रिकेटशी संबंध तुटला. आयुष्यात प्रथमच वसईबाहेर वास्तव्य असल्यामुळे मी आधीच काहीसा नाराज होतो आणि त्यातच क्रिकेटही बंद झाले. दिवाळी सुट्टीनंतर मात्र चित्र पालटले. रुपारेलच्या भव्य मैदानात सर्व प्रकारचे खेळ खेळले जाऊ लागले आणि त्यात अर्थात क्रिकेटचाही समावेश होताच. आमच्या डिविजनच्या वर्गाच्या संघात माझी निवड झाली. एक दोन सराव सामन्यात माझी सुंदर फलंदाजी झाली. ती पाहून वर्गातील मुले खुश झाली. काही कारणास्तव आंतरवर्गीय स्पर्धा त्या वर्षी झाल्या नाहीत. त्या वर्षी न्यूझीलंड संघ भारतात आला होता. त्या सामन्यात आमच्या कंपूने बर्यापैकी रस घेतला. बारावीच्या वर्षी मी रुपारेल होस्टेल वर प्रवेश घेतला. माझ्या खोलीसमोर असणाऱ्या वरांड्यात उभे राहिले की समोरच्या मैदानात सुरु असलेले सामने दिसत. आधीच बारावीचे वर्ष आणि त्यात रुपारेल सारखे अभ्यासू आणि बारावीच्या परीक्षेला जीवन मरणाचा प्रश्न मानणाऱ्या मुलांचे होस्टेल. पण अशा होस्टेलवर सुद्धा क्रिकेट मध्ये रस घेणारी मुले होती. त्यांच्या बरोबर उभे राहून मी समोरच्या मैदानात चालणाऱ्या सामान्यांचं इंग्लिश मधून धावते समालोचन करी. हा आमचा एक चांगला विरंगुळा झाला होता. कॉलेज खानावळीत एका कोपर्यात दूरदर्शन संच होता. १९८९ साली भारतीय संघ पाकिस्तानात गेला होता. संजय मांजरेकरच्या काही अविस्मरणीय खेळ्या आणि सचिन तेंडूलकरचे कसोटी सामन्यातील पदार्पण ह्याच दूरदर्शन संचावर आम्ही पाहिले. होस्टेल वर तीन मजले होते. तळमजला पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव होता, पहिला मजला अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरा मजला बारावीच्या विद्यार्थांसाठी! उद्देश्य असा की बारावीच्या मुलांना कमीत कमी त्रास व्हावा. तर ह्या होस्टेलचे देखील आंतर-मजलीय सामने होत. आता पर्यंतच्या माहित असलेल्या इतिहासात पदवीच्या विद्यार्थानीच ह्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. परंतु आमच्या संघाने मात्र दोन्ही संघांचा पराभव करीत ह्या स्पर्धेचे विजेतपद पटकावले. मी आमच्या संघाचा आघाडीचा फलंदाज होतो. बारावीत दिवाळीनंतर आम्ही कॉलेजला जाणे बंद केले. भारतीय संघ न्यूझीलंड दोर्यावर गेला होता. अझहरुद्दीनची संघाच्या कप्तानपदी आश्चर्यकारकरित्या निवड झाली होती. दिलीप वेंगसरकरचा हा शेवटा दौरा होता. हे सामने आम्ही सकाळी उठून अभ्यास करता करता रेदिओवर ऐकले. बारावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी वसईत असूनही आम्ही क्रिकेट का खेळलो नाहीत हे मला आठवत नाही. बारावीचे वर्ष संपले आणि अभियांत्रिकी अभ्यासासाठी मी सरदार पटेल कॉलेज महाविद्यालयात प्रवेश केला. ह्या कॉलेजमध्ये सुद्धा मी होस्टेल मध्ये प्रवेश केला. पावसाळ्यानंतर क्रिकेटचे वारे महाविद्यालयात वाहू लागले आणि एके दिवशी संघनिवडीसाठी आम्ही भवन्स कॉलेजच्या भव्य मैदानावर कूच करते झालो. आमच्या वर्गात सचिन कन्नडकर नावाचा उत्तम खेळाडू होता आणि त्याने बारावीत त्याच्या कॉलेजचे क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्या दिवशी नंबर पडताना त्याने शेवटचा नंबर मागून घेतला आणि बाकीचे नंबर पडण्यास सांगितले. माझा नंबर पहिला आला. मी त्याच्यासमोर फलंदाजीसमोर उभा राहिलो. मी बिनधास्तपणे त्याच्या गोलंदाजीचा मुकाबला केला आणि पुढे जाऊन चेंडू उंचावरून टोलवले देखील. ह्या एका खेळीच्या जोरावर मी पुढील चार वर्षे वर्गाच्या संघात राहिलो. ह्या चार वर्षातील सामन्याविषयी आणि कॉलेज होस्टेल संघातील माझ्या कामगिरीविषयी पुढील भागात! सचिन कन्नडकर निर्विवादपणे उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. जलद गोलंदाजी करायचा आणि जबाबदारीने फलंदाजी सुद्धा करायचा. एकंदरीत त्याची क्रिकेटची जाण उत्तम होती. चौथ्या वर्षी मी खेळलो नाही पण बाकीच्या तिन्ही वर्षात मी दर वर्षी आमच्या वर्गाच्या संघातर्फे सलामीला खेळलो. गुण्या (श्रीनिवास खरे) हा गुणी डावखुरा फलंदाज माझा सलामीचा साथीदार होता. हे सामने फेब्रुवारीमध्ये खेळले जात. आमच्या संघांची निवडप्रक्रिया जानेवारीत सुरु होई. मी ह्या निवड सामन्यात उत्तम फलंदाजी करीत असे. त्यामुळे सचिन मला नेहमी संघात घेई. आमच्या संघाच्या बर्याचशा जागा सहजपणे निवडल्या जात. पण यष्टीरक्षकाच्या जागेसाठी थोडी कुरबुर होई. सुगंध आफळे हा आमचा क्रमांक १ चा यष्टीरक्षक होता. आणि सतीश भाटवडेकरचा ही जागा पटकाविण्याचा फार मानस होता. त्यामुळे सुगंध यष्टिरक्षण करताना सतीशबरोबर सीमारेषेवरून सामने बघण्यात मजा येई. सतीश पार्ले टिळकचा विद्यार्थी असल्याने शुद्ध मराठीतील त्याची टिप्पणी धमाल असे. सीमारेषेवरून आलेला थ्रो सुगंध हमखास चुकवीत असे आणि मग सतीश 'असे चेंडू मी हमखास अडविले असते' असे बोलत असे. मला एकंदरीत दोघा तिघांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. गिरीश गरोडिया जो आमचा तिसर्या क्रमाकांचा फलंदाज असे तो एकदा म्हणाला होता की आदित्याची बॅट कशी सरळ रेषेतून येते. तसेच एकदा एक सीजन चेंडूचा सामना चालू होता त्यावेळी एक फलंदाज बऱ्याच वेळ बचावात्मक फलंदाजी करीत होता, त्यावेळी नितीन अम्बुरे म्हणाला 'अरे जर फक्त चेंडू अडवायचेच असतील तर आदित्य काय वाईट आहे'. ह्या माझ्या फलंदाजीवरील स्तुतीपर प्रतिक्रिया वीस वर्षापलीकडे काळ लोटला तरी मी लक्षात ठेवल्या आहेत. सचिनला नाणेफेक जिकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्यास आवडे. मला का कोणास ठावूक लेगअम्पायर च्या मागे क्षेत्ररक्षण करण्यास ठेवले जाई. सचिन आम्हाला सुरुवात चांगली करून देई पण नंतरचे आमचे गोलंदाज त्यावर पाणी फिरवीत. केतन बेलसरे हा नो बॉल टाकण्यासाठी प्रसिद्ध होता. त्यानंतर समित वर्तक, संतोष पाटील, अक्षय सूर्यवंशी हे गोलंदाज गोलंदाजी करीत. तर प्रतिस्पर्धी संघ १२ षटकात ७५ - ८० च्या आसपास मजल मारे. मग आम्ही पटकन सरदार पटेल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जावून पाणी पिवून येत असू आणि फलंदाजीला उतरत असू. गुण्या चेंडू तटवून एकेरी दुहेरी धावा काढण्यात पटाईत होता. मी ही तसे फारसे चेंडू वाया जावून देत नसे. परंतु अशा १० - १२ धावून काढल्यावर माझी दमछाक होई. मग मी धावा धावून काढण्याऐवजी एखादा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होई. मग नंतर समित, केतन, इम्रान आणि कप्तान सचिन मिळून आम्हाला धावसंख्येपर्यंत पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. पहिल्या वर्षी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात तृतीय वर्षाच्या वर्गाशी आमचा सामना होता. त्यात निर्मल अरोरा हा प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज अगदी वेगवान गोलंदाजी करीत होता. ७६ धावांचा पाठलाग करताना ६ षटकात आम्ही १९ धावांचीच सलामी देवू शकलो. पाचव्या आणि सहाव्या षटकात बाद होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत होतो. सहाव्या षटकाच्या शेवटी बाद झाल्यावर मी आणि संघाने सुटकेचा निश्वास टाकला. मंगेश केळकर हा लॉंग ऑनला उभा असे. त्याने तिथे एकदा अगदी सीमारेषेच्या टोकाला सुंदर झेल घेतला होता. पहिल्या वर्षी फिरोज शेख आमच्या संघात होता. त्याने आमचा पहिलाच सामना जो दुसऱ्या का तिसऱ्या वर्षीच्या विद्युत शाखेच्या संघाशी होता तो एकदम बिकट परिस्थितीतून जिकून दिला होता. हा फिरोज तसा एकदम मन का राजा होता. पहिल्या वर्षीच्या सुट्टीत त्याला चित्रपट सृष्टीत शिरण्याचे वेध लागले. तो रणजीत स्टुडीओत जावून आला. त्यानंतर मला आणि संजेशला भेटून त्याने त्याची आगामी चित्रपटासाठी नायक म्हणून निवड झाल्याची खुशखबरी सुद्धा दिली. त्याच्या म्हणण्यानुसार आयेशा झुल्का त्याची नायिका असणार होती. त्यानंतर ना त्याचा चित्रपट आला ना तो कधी आम्हाला भेटला. मी पहिल्या वर्षी सरदार पटेल कॉलेजच्या वसतिगृहात राहत असे. तिथे संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर शैलेश सापळे, संजय फडके, संजेश चौधरी (वसई), फिरोज आणि आमचा कंपू क्रिकेट खेळत असू. तिथेसुद्धा माझी होस्टेलच्या संघात निवड झाली. त्यावर्षी माझ्या बहिणीचे लग्न होते. विवाह सोहळा घरीच असल्याने धावपळ सुरु होति. होळीचा सण होता आणि मला अभ्यास करायचा असल्याने मी हॉस्टेलवरच थांबण्याचे ठरविले. होस्टेलवर होळी साजऱ्या करण्याच्या पद्धतीविषयी मी बर्याच गोष्टी ऐकून असल्याने मी सकाळीच माझ्या खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि तळमजल्यावर असलेल्या माझ्या खोलीच्या बाल्कनीतून उडी मारून गुपचूप येवून खोलीत बसलो. हद्द म्हणजे मी आंघोळ सुद्धा केली होती. सकाळी सात वाजता टोळी सर्व खोल्यातील जनतेला उठविण्यास निघाली.झोपलेल्या अथवा झोपेचे सोंग घेतलेल्या मुलास खोलीबाहेर आणून त्याच्या अंगावरून थंड पाण्याची बादली ओतून त्याची झोप उडविली जात होती. प्रथम आलेल्या संतापाची मग खुन्नसने घेवून हा मुलगा तत्काळ बाथरूमकडे बादली भरण्यास धावे. अशा प्रकारे टोळीची संख्या फुगत चालली होती. कुलुपबंद खोलीतून मी हा सर्व प्रकार ऐकत होतो. काहीवेळाने टोळी माझ्या खोलीबाहेर आली. माझ्या खोलीला कुलूप पाहून अचंबा व्यक्त करण्यात आला. अरे आदित्य तर रात्री मेसमध्ये जेवायला होता, शैलेश बोलता झाला. अनुभवी टोळी होती ती! एका मिनिटात त्यातील दोघेजण गॅलरीतून डोकावते झाले. मग मला कुलूप फोडण्याची धमकी देण्यात आली. होळीचा दिवस असल्याने आणि त्यातील एकेकाचा इतिहास माहित असल्याने ह्या धमकीच्या खरेपणाविषयी संशय घेण्याचे काहीच कारण नव्हते. मी दरवाजा उघडल्यावर मला सन्मानपूर्वक होस्टेलच्या प्रवेशद्वाराशी नेण्यात आले. तिथे तीन चार बादल्या पाणी समोरील मातीत ओतून मला त्या चिखलात झोपविण्यात आले. त्यानंतरचे दोन तास मीही टोळीचा अग्रगण्य सदस्य बनून दंगा केला. हे थोडे विषयांतर झाले! अशाच अजून सुट्टीच्या दिवशी मी अभ्यासाचा प्रयत्न करीत असताना शैलेश धावत आला. मागच्या D. N. नगरातील संघाने आम्हाला सामन्याचे आव्हान दिले होते. शैलेशसारख्याला हे आव्हान स्वीकारल्याशिवाय कसे राहणार? भवन्सच्या मैदानावर सामना सुरु झाला. मी आणि अमित माटी सलामीस गेलो. त्यादिवशी माझी फलंदाजी सुंदर होत होती. सरळ बॅटने सुरुवातीला एकेरी दुहेरी धावा काढल्यावर मी एक पॉईंटच्या डोक्यावरून चौकार मारला. त्याने आत्मविश्वास बळावल्यावर मी गोलंदाजाच्या डोक्यावरून दोन चौकार ठोकले. समोरून अमितही सुंदर फलंदाजी करीत होता. आम्ही सहा षटकाच्या आतच पन्नासची मजल मारली. मग मी वाहवत गेलो आणि लॉंग लेगला झेल देवून बाद झालो. आम्ही एकूण शंभरच्या आसपास मजल मारली . प्रतिस्पर्धी संघाला हे आव्हान काही झेपले नाही आणि आम्ही आरामात सामना जिंकला. सामन्याच्या गप्पा मारता मारता दुपारी अभ्यास केला पाहिजे हे मी ठरवीत होतो. साडे तीन वाजता स्वराज पुन्हा धावत आला. अरे वो लोग वापस आ गये हैं! नकार देण्याची सोय नव्हती. परंतु शत्रू मोठ्या तयारीनिशी आला होता. त्यांनी त्यांच्या संघात दोन तीन व्यावसायिक आणले होते. दुर्दैवाने नाणेफेक त्यांनी जिंकली. सुस्तावलेल्या आम्हाला त्यांनी ठोक ठोक ठोकले. त्यांनी सुद्धा शंभरच्या आसपास मजल मारली. तरीही सकाळच्या कामगिरीमुळे आम्ही आशावादी होतो. परंतु एक खतरनाक गोलंदाज सलामीला आला. त्याने पहिल्याच षटकात प्रथम माझी आणि मग अमितची यष्टी वाकवली. तंबूत सन्नाटा पसरला. परंतू शैलेश, स्वराजने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही लक्ष्य मोठे होते आणि हा सामना आम्ही वीसेक धावांनी हरलो. सुट्टीच्या दिवशी हॉस्टेलवर अभ्यासासाठी थांबण्यात काही अर्थ नाही हा धडा मी वरील दोन घटनांवरून शिकलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...