मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

सरलता



मध्येच एका कार्यालयीन कामकाजात एका संज्ञेने माझे लक्ष वेधून घेतले. 'KISS - KEEP IT SIMPLE SILLY'. गोष्टी जितक्या सोप्या ठेवता येतील तितक्या त्या सोप्या ठेवाव्यात असं एकंदरीत म्हणण होत. त्यात एक मेख अशी आहे गोष्ट सोपी बनविण्याच्या नादात त्या गोष्टीच्या मूळ अर्थाला, हेतूला धक्का लागता कामा नये.
नेहमीप्रमाणे मी व्यवहारात त्याची उदाहरणे शोधू लागलो. लगेचच अमेरिकेत असतानाचा माझा मित्र कल्याण मला आठवला. एकदम साधा आणि शिस्तबद्ध माणूस. वेळापत्रक आखून त्याप्रमाणे वागणारा. शनिवारी सकाळी कपडे धुण्यासाठी सार्वजनिक धुलाईयंत्रात जाणार. त्यानंतर आठवडाभराचे किराणामालाचे सामान भरणार, दर क्ष दिवसांनी गाडीत पेट्रोल भरणार, सकाळी सव्वाआठ नंतर वाहतूक वाढते म्हणून पावणेआठलाच निघून कार्यालय गाठणार. मी त्याचे बारकाईने निरीक्षण करायचो. एकदा मी त्याला ह्यावरून छेडले. तो म्हणाला, आदित्य आयुष्यात अशा बऱ्याच क्लिष्ट गोष्टी आहेत त्याबाबतीत मी काही करू शकत नाही. ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत त्या सोप्या ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. कल्याण आणि त्याचे हे म्हणणे माझ्या कायम लक्षात राहिले.
ह्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो आणि तो म्हणजे त्या परिस्थितीचे आपणास पूर्ण किंवा बऱ्यापैकी आकलन असले पाहिजे. आपण आपली उर्जा / शक्ती परिस्थितीच्या पृथ्थकरणात खर्च केली पाहिजे. एकदा का आपल्याला त्यात यश आले की उपलब्ध असलेल्या मार्गांमधील आपल्याला उद्दिष्टांच्या जवळपास घेवून जाणारा सरलसोपा मार्ग निवडावा. सर्वात पहिले उदाहरण डोळ्यासमोर येते ते आपण ज्यांच्याबरोबर सदैव वावरतो अशी कार्यालयातील, घरातील माणसे आणि त्यांचे स्वभाव. आपल्या आणि त्यांच्या स्वभावातील काही गोष्टी कोणीच बदलू शकत नाही, ह्या गोष्टी ओळखल्या की मग कोणत्या गोष्टीत त्यांच्याशी डोकेफोड करायची आणि कुठे कानाडोळा करायचा हे ठरावयास मदत होते.
हल्ली प्रत्येकासमोर कामाचा व्याप भारी असतो. आपण सर्वच एका गोष्टीवर कधी ना कधी अडखळतो आणि ती म्हणजे महत्वाच्या गोष्टींवर प्रथम लक्ष देणे! ह्यातला kiss घटक म्हणजे प्रथम कामाची यादी बनवून त्या सर्वांना प्राधान्य नेमून देणे! उदाहरणे अनेक असतात, सर्वांनी एकत्रित भोजनाचा आनंद घ्यायचा असे ठरविल्यावर उपहारगृहाची निवड करण्यात बराच वेळ जातो, आणि एखादे उत्तम पण दूरचे उपहारगृह निवडले जाते. मग होते काय की तिथे पोहचता पोहचता बराच वेळ लागतो आणि मग प्रतीक्षायादी ह्यात आपला मूळ मुद्दा बाजूला राहतो!
एकंदरीत काय kiss अमलात आणताना डोक्याचा कीस पडला की!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...